कुमारसंभव : संस्कृतातील पंचमहाकाव्यांपैकी एक. कालिदास  हा त्याचा कर्ता. कुमार कार्तिकेयाच्या जन्माची कथा त्यात आहे. आज उपलब्ध असलेल्या कुमारसंभवाच्या प्रतींत एकूण सतरा सर्ग आढळतात. तथापि मुळात ह्या महाकाव्याचे सर्ग किती असावेत, ह्याविषयी विद्वानांत मतभेद आहेत. ते बावीस होते, असे काहींचे मत आहे, तर काहींच्या मते उपलब्ध सतरा सर्गांपैकी फक्त पहिले आठच कालिदासाने लिहिलेले आहेत. मल्लिनाथ, अरुणगिरिनाथ ह्यांसारख्या टीकाकारांच्या टीका कुमारसंभवाच्या पहिल्या आठ सर्गांवरच आहेत. ह्या महाकाव्याच्या सातव्या आणि आठव्या सर्गांत शिवपार्वतीच्या रतिक्रीडेचे वर्णन आहे. ह्या वर्णनामुळे पार्वतीचा कोप झाला आणि तिने शाप दिल्याने कालिदासाचे हे महाकाव्य पूर्ण होऊ शकले नाही, अशी एक आख्यायिका अरुणगिरिनाथाने आपल्या टीकेत नमूद केली आहे. हे वर्णन आनंदवर्धनासारख्या साहित्यशास्त्रकारांनाही प्रशस्तवाटलेले नाही. कदाचित कालिदासाच्या समकालीनांनाही ते अनुचित वाटले असावे आणि त्यामुळे कालदासाने हे काव्य अर्ध्यावरच सोडून दिलेही असेल. नऊ ते सतरा हे सर्ग कलादृष्ट्याही पहिल्या आठ सर्गांच्या तुलनेने उणे आहेत, असेही काही अभ्यासकांना वाटते. उपर्युक्त दोन्ही मते बाजूला ठेवून आज उपलब्ध असलेल्या या महाकाव्याचे सतरा सर्ग हेच संपूर्ण महाकाव्य असून ते सर्व कालिदासानेच रचलेले आहे, असेही मत पुढे आलेले आहे.

कुमारसंभवाच्या उपलब्ध सतरा खंडांत आलेली कथा थोडक्यात अशी :

तारकासुराचा देवांना फार त्रास होत होता. तथापि त्याला ब्रह्मदेवाचा संरक्षक वर असल्यामुळे त्याचे पारिपत्य ब्रह्मदेवालाही करता येत नव्हते. शिवपार्वतीचा विवाह जमवून आणावा, त्यांना होणारा पुत्र तारकासुराच्या त्रासातून सर्वांस मुक्त करील, असे ब्रह्मदेवाने देवांना सांगितले. त्यानुसार शंकराच्या मनात पार्वतीविषयी प्रेम निर्माण करण्याच्या कामगिरीवर इंद्राने मदनाला पाठविले. तथापि शंकराच्या रोषाला बळी पडून मदन भस्मसात झाला. त्यानंतर शंकराच्या प्राप्तीसाठी पार्वतीने उग्र तपश्चर्या केली. त्यामुळे प्रसन्न होऊन एका ब्रह्मचाऱ्याच्या रूपाने शंकर तिच्यासमोर प्रगटला. ह्या ब्रह्मचाऱ्याने शंकराची खूप निंदा करून पार्वतीला शंकराशी विवाह करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला परंतु पार्वतीचा निश्चय अढळ राहिला.  हे पाहून शंकराने आपल्या खऱ्या स्वरूपात प्रगट होऊन तिच्याशी विवाह करण्याचे मान्य केले. विवाहानंतर बराच काळ लोटल्यावर इंद्राने अग्नीला कबुतराच्या रूपाने शंकराकडे पाठविले. त्याला पाहून शंकराला प्रथम राग आला. तथापि अग्नीने आपण देवांकडून कशासाठी आलो आहोत, ह्याची कल्पना दिल्यानंतर शंकराने आपले वीर्य अग्नीत सोडले. त्या वीर्याचा दाह सहन न झाल्याने अग्नीने ते स्वर्गंगेत टाकले.  स्वर्गंगेलाही ते असह्य वाटल्याने तिने तिच्यात स्नान करण्यासाठी आलेल्या सहा कृत्तिकांच्या शरीरांत ते सोडून दिले. त्या कृत्तिका मग गर्भवती झाल्या. परंतु ह्या गर्भाचा भार न सोसल्याने त्यांनी तो वेतसवनात काढून ठेवला. तेथे एका तेज:पुंज बालकात त्याचे रूपांतर झाले. त्याच सुमारास शंकरपार्वती विमानातून चालले होते. त्यांनी त्याला ओळखून स्वगृही नेले. हा मुलगा केवळ सहा दिवसांतच शस्त्रास्त्रविद्या शिकला. पुढे देवांचा सेनापती होऊन त्याने तारकासुराशी युद्ध केले व त्याला ठार मारले.

कुमारसंभवातील कथेचा आधार कालिदासाने कोठून घेतला असावा, ह्याविषयी विद्वानांत मतभेद आहेत. काही समान कल्पनांच्या आधारावर ही कथा स्कंद  आणि शिव  पुराणांतून घेतली असावी, असे काहींचे मत आहे. तथापि एकंदर पुराणांचा बराच भाग कालिदासोत्तर असल्यामुळे कालिदासाचेच अनुकरण पुराणांनी केले असल्याची शक्यता आहे, असे मत विंटरनिट्‌ससारख्या विद्वानांनी व्यक्त केले आहे.  नऊपासून पुढील सर्ग मात्र अन्य कोणी कवीने लिहिले असून त्याने त्यासाठी स्कंदपुराणाचा आधार घेतला असावा, असेही विंटरनिट्‌स ह्यांना वाटते.

वाल्मीकि रामायणाच्या बालकांडात विवाहोत्तर शंकर तपस्या करीत असता मदनाने त्याच्यावर शरसंधान करावयाचा यत्न केला व म्हणून शंकराने त्यास अनंग केले, अशी कथा येते. ही कथा कालिदासाला ठाऊक असण्याची शक्यता आहे. परंतु तसे असल्यास हा प्रसंग शंकराच्या विवाहापूर्वीच घडलेला दाखवून खऱ्या प्रेमाला खडतर अवस्थेतून जावे लागते, असे दाखवून कालिदासाने पार्वतीच्या शिवप्रेमाला उदात्त पार्श्वभूमी प्राप्त करून दिली आहे.

तपोभूमी अशा हिमालयाचे स्वर्गतुल्य वैभव, वसंत ॠतूच्या सौंदर्याचा रम्याविष्कार, मदनदाहाच्या प्रसंगातील करुण-भीषण नाट्य, पंचाग्निसाधनामागील पार्वतीच्या प्रेमाची अढळ निष्ठा ह्यांच्या वर्णनांनी ह्या महाकाव्याच्या सौंदर्यात विशेष भर घातलेली आहे. शृंगार, करुण, अद्‌भुत, हास्य, भयानक आदी रसांची निर्मिती हे या महाकाव्याचे एक वैशिष्ट्य.

संदर्भ : 1. Suryakant, Kalidasa’s Vision of Kumarsambhava, Delhi, 1963.

             2. मिराशी, वा. वि. कालिदास, पुणे, 1957.  

भट, गो. के.