रस गंगाधर : संस्कृतातील एक श्रेष्ठ कवी व काव्यशास्त्राकार ⇨जगन्नाथपंडित (सतरावे शतक) ह्याने रचिलेला काव्यशास्त्रविषयक विख्यात ग्रंथ. १६४१ ते १६५० ह्या काळात जगन्नाथपंडिताने ह्या ग्रंथाची रचना केली, असे मानले जाते.

साहित्यशास्त्र आणि अलंकारशास्त्र यांवरील रसगंगाधर हा अखेरचा व सर्वोत्तम आकरग्रंथ आहे. ध्वन्यालोक आणि काव्यप्रकाश यांच्या जोडीचे रसगंगाधराचे स्थान आहे असे मानले जाते. जगन्नाथ हा अभिनवगुप्ताचा ध्वनिवाद उचलून धरतो, पण तो त्याचे किंवा कोणाचेच अंधानुकरण करीत नाही. तो स्वतंत्रप्रज्ञ आहे. त्याने जणू साहित्यशास्त्राचे पुनर्लेखन केले आहे.

रसगंगाधराची मांडणी कारिका, वृत्ती व उदाहरणे या प्रकारची आहे. या ग्रंथाची मुळात पाच प्रकरणे किंवा ‘आनने’ होती व तो जगन्नाथाने पूर्ण केला होता, असे काही अंतर्गत पुरव्यांवरून म्हणता येते. परंतु दुसऱ्या आननातील उत्तर या अलंकाराच्या विवरणाबरोबर आज उपलब्ध असलेला ग्रंथ संपतो. नागेशभट्टांनी ह्या ग्रंथावर लिहिलेली मर्मप्रकाश ही टीकाही येथेच अचानक थांबते. ग्रंथाचा उर्वरित भाग आज अनुपलब्ध आहे.

पहिल्या आननात पुढील विषय येतात : काव्याची व्याख्या. पूर्वसुरींनी केलेल्या काव्यव्याख्यांचे जगन्नाथ समर्थपणे खंडन करतो आणि ‘रमणीयार्थप्रतिपादकः शब्दः काव्यम्’ ही काव्याची स्वतःची व्याख्या सांगतो. काव्यात शब्दालंकारांचा अतिरेक असेल, पण अर्थचमत्कृती नसेल, तर अशा पद्यांना काव्य म्हणताच येणार नाही अशी त्याची शब्दचित्रकाव्यावर टीका आहे. प्रतिभा हाच काव्याचा मूलस्रोत आहे, असे तो ठाम सांगतो. काव्याचे चार प्रकार पाडून जगन्नाथ ‘गुणीभूतव्यंग्य’ या काव्यप्रकारात अर्थालंकारयुक्त काव्याचा अंतर्भाव करतो (मम्मटाने अर्थालंकारयुक्त पद्यांना अधम काव्य म्हटले होते). काव्याचे गुण कोणते त्याची सविस्तर चर्चा तो करतो. रस, भाव इत्यादींचे त्याने केलेले विवेचन मार्मिक व मूलग्राही आहे. रसनिष्पत्ती कशी होते, हे विशद करण्यात त्याची तर्कशुद्ध विचारसरणी प्रतीत होते. तरांची या बाबतीतली मते देऊन जगन्नाथ त्यांची मानसशास्त्रीय दृष्टिकोणातून चिकित्सा करून त्यांचे समर्पक खंडन करतो आणि स्वतःचे शास्त्रपूत मत अभिनिवेशाने मांडतो. खंडनमंडनाची त्याची शैली अपूर्व आहे. दुसऱ्या आननात ध्वनिप्रकार, अनेकार्थ शब्दाचा वाच्यार्थ नियंत्रित करणारी संयोगादि साधने, अभिधा व लक्षणा यांचे उपभेद आणि उपमा इ. सत्तर अलंकारांचे विवरण जगन्नाथ करतो.

जगन्नाथाने दिलेली उदाहरणे त्याने दुसऱ्यांची उसनी घेतलेली नाहीत. ती स्वरचित आहेत. ही सर्व उदाहरणे सोप्या, प्रवाही व प्रसादयुक्त संस्कृतात आहेत आणि त्यांवरून जगन्नाथाची अलौकिक कवित्वशक्ती लक्षात येते. माधुर्य किंवा श्रवणरमणीयत्व हा गुण तर त्याच्या रचनेत ओतप्रोत भरलेला आहे आणि त्याने केलेल्या काव्याच्या उपर्युक्त व्याख्येशी हे सुसंगतच आहे. शब्दालाच तो काव्याचे शरीर मानतो. एकंदरीत काव्यशास्त्रावरील हा सर्वांगपरिपूर्ण, विद्वत्ताप्रचुर व न्यायघटित ग्रंथ म्हणजे संस्कृत साहित्यातील अजोड ठेवा आहे.

कोपरकर, द. गं.