राधाकमल मुकर्जी

मुकर्जी, राधाकमल : (? १८८९–२४ ऑगस्ट १९६८). प्रसिद्ध भारतीय अर्थतज्ञ. जन्म पश्चिम बंगाल राज्यातील बेऱ्हमपूर येथे. त्यांचे वडील गोपालचंद्र मुकर्जी हे बेऱ्हमपूरचे प्रसिद्ध वकील आणि तेथील वकील संघाचे प्रमुख होते. गोपालचंद्रांची नेमणूक कलकत्ता विद्यापीठाच्या टागोर विधी प्राध्यापकपदासाठीही झाली होती. तथापी त्या पदावर काम करू लागण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. ख्यातनाम भारतविद्यावंत राधाकुमुद हे राधाकमल ह्यांचे बंधू होत.

कलकत्ता विद्यापीठातून पदवी संपादिल्यानंतर बेऱ्हमपूर येथील एका महाविद्यालयात ते अर्थशास्त्राचे अध्यापन करू लागले. तेथे असतानाच शेतकरी, कामकरी वर्गाच्या समस्यांच्या अभ्यासात गुंतले. द फाउंडेशन्स ऑफ इंडियन इकॉनॉमिक्स (१९१६) हा त्यांचा पहिला ग्रंथ ह्या अभ्यासातूनच उभा राहिला. १९१५ साली लाहोरच्या सनातन धर्म महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९१७ साली ते कलकत्त्यास परतले आणि कलकत्ता विद्यापीठात अध्यापन करू लागले. पुढे १९२१ साली लखनौ विद्यापीठात ते प्राध्यापक झाले व १९५१ मध्ये तेथूनच सेवानिवृत्त झाले. ह्या काळात अनेक भारतीय, तसेच परदेशी विद्यापीठांतून त्यांनी आर्थिक समस्यांवर भाषणे दिली. १९५५–५७ ह्या कालखंडात ते लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू होते तसेच लखनौ विद्यापीठाच्या ‘जे. के. इन्स्टिट्युट ऑफ सोशिऑलॉजी अँड ह्यूमन रिलेशन्स’ ह्या संस्थेचे ते तहहयात संचालक होते. अर्थशास्त्रविषयक अनेक परिषदांमध्ये-विशेषतः लोकसंख्या परिषदांत त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असे. आंतरराष्ट्रीय मजूर संघटना, अन्न व शेती संघटना यांसारख्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय संघटना व संस्था तसेच महत्त्वाचे आयोग व समित्या यांवर त्यांनी काम केले.

अर्थशास्त्रीय विषयांवर तर त्यांनी मोलाची ग्रंथरचना केलीच परंतु समाजशास्त्र, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, धर्म, कला, इतिहास अशा अन्य अनेक विषयांवरही त्यांनी लेखन केले. त्यांच्या उल्लेखनीय ग्रंथांपैकी रूरल इकॉनॉमी ऑफ इंडिया (१९२६), लँड प्रॉब्लेम्स ऑफ इंडिया (१९३३), मायग्रंट एशिया (१९३५), फूड प्लॅनिंग फॉर फोर हंड्रेड मिल्यन्स (१९३८), द पोलिटिकल इकॉनॉमी ऑफ पॉप्युलेशन (१९४२), द इंडियन वर्किंग क्लास (१९४५) हे अर्थशास्त्रविषयक, तर डेमॉक्रसीज ऑफ द ईस्ट (१९२३), थिअरी अँड आर्ट ऑफ मिस्टिसिझम (१९३७), सोशल इकॉलॉजी (१९४०), डायनॅमिक्स ऑफ मॉरल्स-ए सोशिओ-सायकॉलॉजिकल थिअरी ऑफ एथिक्स (१९५०), फिलॉसफी ऑफ सोशल सायन्स (१९६०) असे विविध विषयांवरील ग्रंथ होत.

राधाकमल मुकर्जी यांचा मौलिक भारतीय अर्थशास्त्रज्ञांमध्ये समावेश करण्यात येतो. साक्षात संशोधनाच्या साहाय्याने वैचारिक सिद्धांत आणि सत्यस्थिती या दोहोंची सांगड घालणारे मुकर्जी हे पहिले अर्थशास्त्रज्ञ होत. द फाउंडेशन्स ऑफ इंडियन इकॉनॉमिक्स (१९१६) या वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी (अल्पवयात) लिहिलेल्या व सर्वोत्कृष्ट कृती म्हणून नावाजण्यात आलेल्या या आपल्या पहिल्या ग्रंथात मुकर्जींनी जाती आणि विकेंद्रीकरण या दोहोंवर आधारित अशा मोठ्या, लहान आकाराच्या व कुटीर उद्योगांचा विकास होण्याकरिता ज्या काही सुयोग्य व विधायक सूचना केल्या आहेत (मांडलेल्या आहेत) त्यांचा काही किरकोळ दुरुस्त्या करून राष्ट्रीय नियोजन आयोगाने देशाच्या पंचवार्षिक योजनांसाठी विचार व स्वीकार केला आहे. अर्थशास्त्रीय सिद्धांतावरील त्यांच्या प्रिन्सिपल्स ऑफ कंपॅरेटिव्ह इकॉनॉमिक्स (१९२३), बॉर्डरलँड्स ऑफ इकॉनॉमिक्स (१९२५) आणि द इन्स्टिट्यूशनल थिअरी ऑफ इकॉनॉमिक्स (१९४०) या ग्रंथांचे अवलोकन केल्यास त्यांचा समाजशास्त्र, जीवविज्ञान, मानसशास्त्र, नीतिशास्त्र, तत्त्वज्ञान या इतर शास्त्रांमधील गाढा अभ्यास लक्षात येतो. १९३६ मध्ये भरलेल्या लोकसंख्या परिषदेत भयानक वेगाने वाढत चाललेल्या लोकसंख्या वाढीकडे जनतेचे लक्ष वेधणारे ते पहिले भारतीय अर्थशास्त्रज्ञ होत. या परिषदेत त्यांनी सामाजिक-शैक्षणिक योजनेच्या पार्श्वभूमीवर कुटुंब नियोजन धोरणाचे कळकळीने आवाहन केले. ‘फॅमिली प्लॅनिंग’ (कुटुंबनियोजन) ही संज्ञा त्यांनी प्रथम वापरात आणल्याचे मानले जाते. राष्ट्रीय नियोजन समितीच्या लोकसंख्या उपसमितीचा अध्यक्ष या नात्याने सादर केलेल्या अहवालात मुकर्जींनी ही संज्ञा प्रथम वापरली. आपल्या लिखाणातून सामाजिक नियोजनावर त्यांनी मोठ्या प्रमाणावर भर दिला आहे. ‘प्रादेशिक अर्थशास्त्र’ ह्या संकल्पनेचा त्यांनी केलेला ऊहापोह ही अर्थशास्त्रातील मोठी कामगिरी मानली जाते. मुकर्जींना केवळ भारतातच नव्हे, तर परदेशांतही लोकसंख्या समस्यांवरील एक अधिकारी व्यक्ती म्हणून ओळखण्यात येते. त्यांनी परिस्थितिकीय लोकसंख्या सिद्धांत मांडला. कोरादो गिंट या इटालियन प्राध्यापकांनी मायग्रंट एशिया या मुकर्जींच्या पुस्तकाला दिलेल्या आपल्या प्रस्तावनेत ‘मुकर्जी हे पूर्वेकडील अत्यंत नामवंत विद्वानापैकी एक असून भारताच्या आर्थिक व जनांकिकीय समस्यांवरील अधिकारी व तज्ञ व्यक्तींमध्ये त्यांची गणना होते’, अशा शब्दांत मुकर्जींना गौरविले आहे. फ्रंटिअर्स ऑफ सोशल सायन्स (१९५५) या मुकर्जींच्या गौरवार्थ प्रसिद्ध केलेल्या ग्रंथात विविध समाजशास्त्रज्ञांनी लेख लिहून त्यांच्या समाजशास्त्रा-विषयीच्या व्यासंगाचा आदर केला आहे.

गद्रे, वि, रा.