फिन्सन, नील्स रायबर्ग : ( १५ डिसें. १८६०-२४ सप्टेंबर १९०४ ). डॅनिश वैद्य. त्वचारोगांवरील उपचारांमध्ये विशेष प्रगती केल्याबद्दल १९०३ सालच्या वैद्यक किंवा शरीरक्रियाविज्ञान विषयाच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते.

त्यांचा जन्म टॉर्सहाउन ( फेअरो बेटे, डेन्मार्क ) येथे झाला. १८९० मध्ये त्यांनी कोपनहेगन विद्यापीठाची वैद्यकाची एम्. डी. पदवी मिळविली. ते राहत असलेल्या उत्तरेकडील भागात वर्षातून काही काळ सूर्यप्रकाश दिवसाचे अठरा तास टिकून राहत असल्यामुळे जिवंत प्राण्यांवर प्रकाशामुळे होणाऱ्या परिणामांच्या अभ्यासाकडे ते आकर्षित झाले. त्यांनी प्रकाशासंबंधी काही प्रयोग केले. देवी या रोगाच्या रोग्यांना फक्त तांबड्या प्रकाशातच ठेवले (म्हणजेच प्रकाशातील निळे, जांभळे व जंबुपार-जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्यकिरण वगळून उरलेल्या प्रकाशात ठेवले), तर त्यांच्या अंगावरील फोडांत पू होत नाही, असे त्यांना आढळून आले व या विषयावर त्यानी १८९३ मध्ये एक प्रबंध प्रसिद्ध केला. १८९४ पर्यंत सूर्यप्रकाशात काही औषधी गुण असल्याची त्यांची खात्री झाली होती. प्रकाशातील रासायनिक विक्रियाशील किरण (ॲक्टिनिक किरण) सूक्ष्मजंतुनाशक असतात, हेही त्यांच्या लक्षात आले होते. सूक्ष्मजीवांवरील प्रकाशकिरणांच्या परिणामाविषयीचा आपला सिद्धांत त्यांनी १८९५ मध्ये प्रसिद्ध केला. याच सुमारास त्यांनी त्वचाक्षय (लूपस व्हल्गॅरिस) या अतिशय चिकट व विद्रूपताजनक त्वचारोगावर जंबुपार किरणांचा प्रथम उपचार केला. याकरिता त्यांनी विद्युत् कार्बनी प्रज्योतीचा प्रखर प्रकाश भिंगामधून रोगट त्वचा भागावर पाडला. त्यामुळे जंबुपार किरण त्या ठिकाणी एकत्रित पडून रोग बरा होई. या विषयावर ‘ट्रीटमेंट ऑफ लूपस व्हल्गॅरिस बाय कॉन्सेन्ट्रेटेड केमिकल रेज’ हा निबंध लिहून १८९७ मध्ये प्रसिद्ध केला. अशा प्रकारे त्यांनी प्रकाश-चिकित्सेचा पाया घातला.

कोपनहेगन येथे त्यांच्या उपचारांचे एवढे स्वागत झाले की, या विषयाच्या खास अभ्यासाकरिता फिन्सन इन्स्टिट्यूट १८९६ मध्ये स्थापन करण्यात आली.

शरीर प्रकृती ठीक नसूनही त्यांनी संशोधनात खंड पडू दिला नाही. हृदयविकाराने पछाडल्यानंतरही स्वतःवर काही प्रयोग त्यांनी केले. या प्रयोगांमुळे या रोगातील द्रव व लवण कमी असलेल्या आहाराकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. ते कोपनहेगन येथे मरण पावले.

भालेराव, य. त्र्यं.