बार्बारोसा, खैरुद्दीन बार्बारोसा, खैरुद्दीन : (? १४८३-? १५४६). ऑटोमन तुर्की साम्राज्याचा नौसेनासंघटक व सेनापती. बार्बारोसामुळे अल्जीरिया व ट्युनिशियावर तुर्की अंमल बसला. याचे मूळ नाव खिज्र व घराणे आल्बेनियी तुर्की. खिज्र (खिजर) ऐवजी खैरुद्दीन हे नाव त्याने घेतले. त्याचे तांबूस केस व दाढी यांवरून ख्रिश्चन लोक त्यास बार्बारोसा म्हणत. प्रथम भूमध्य समुद्रातील जेर्बा या बेटावरून तो चाचेगिरी करीत असे. सोळाव्या शतकाच्या आरंभी मूर सुलतानांच्या कमकुवतपणामुळे मेर्स-एल् काबीर, ओरान, बूझी व ट्रिपोली इत्यादींवर स्पेनने कबजा केला. मूर, तुर्क यांच्या साहायाने स्पॅनिश व ख्रिश्चनांचे भूमध्य समुद्रतटावरील वर्चस्व नष्ट करण्याच्या ध्येयाने बार्बारोसा व त्याचा वडील भाऊ अरुज यांनी नाविक कारवाया करून मील्याना, मेडेआ, टेनेस व ट्लेमसेन ही बेटे काबीज केली परंतु अल्जीरिया हे छोटे बेट घेण्यास ते असमर्थ ठरले. १५१८च्या सुमारास तुर्की सम्राट पहिला सलीम याचे त्याने स्वामित्व पत्करले. सलीमने बार्बारोसाला अल्जीरियामध्ये ‘बेलरबे’ हा किताब देऊन नेमले. १५१८ ते १५३० या काळात त्याने स्पॅनिशांना अल्जीरियामधून हाकलले आणि तेथे भूमध्यसागरावरील चाचेगिरीला अनुकूल नाविक तळ उभारला. १५३४ मध्ये त्याने ट्युनिशियाचे राज्य जिंकून ते तुर्की साम्राज्यास जोडले. तेव्हा सम्राट सुलेमानने त्याला तुर्की नौसेनेचा सरसेनापती नेमला. सोळाव्या शतकाच्या आरंभी कोकण किनाऱ्यावर चौलपाशी पोर्तुगीज आरमाराशी झालेल्या लढायांत हिंदी आरमाराच्या बाजूने तुर्की आरमार लढले होते. बार्बारोसाने गलबत नावाची वल्ही व शिडाच्या नव्या प्रकारच्या युद्धनौका बांधून घेतल्या. १५३७ सालापासून भूमध्य समुद्रात तुर्की आरमार मुक्तपणे संचार करू लागले. इजीअन समुद्रातील बेटे तुर्की आरमाराने घेतली. १५३८ मध्ये त्याने प्रेव्हेझा बेटापाशी व्हेनिसच्या आरमाराचा पराभव केला व पुढे फ्रेंचांचे सहकार्य घेऊन इटली आणि स्पेनवर सागरी दरारा बसविला. त्याच्या नाविक व चाचेगिरी कार्यामुळे भूमध्य समुद्रावर तुर्कांचा वरचष्मा झाला तसेच त्यांचा राजकीय परिणाम एकोणिसाव्या शतकापर्यंत टिकला.

 

दीक्षित, हे. वि.