किन्नर -२ : हिमाचल प्रदेशातील एक अनुसूचित जमात. तिला किन्नर उर्फ कनवरी अगर कनौरा असेही म्हणतात. किन्नौर जिल्ह्यात, सतलज नदीच्या दोन्ही काठांवर त्यांची वस्ती आहे. त्यांची लोकसंख्या १९६१ च्या जनगणनेनुसार २७,२५१ होती. वर्षातून बहुतेक महिने हा भाग हिमाच्छादित असतो. त्यामुळे त्याच्याशी दळणवळण बहुधा तुटलेले असते. सतलज, हांगरांग व संगला ही तिन्ही खोरी दुर्गम आहेत आणि म्हणून त्यांच्याशी संपर्क येणे कठीण जाते.

हिंदू पुराणकथांतून गाननृत्यप्रिय किन्नरांचे स्वर्गातील एक जमात म्हणून वर्णन केले जाते. आर्यांनी दासांना हरविल्यानंतर ते हिमालयाच्या पायथ्याशी आले आणि आजचे किन्नर त्यांपैकी होत, असे म्हणतात. किन्नर हे गोरेपान व सुंदर असतात. त्यांचा पेहरावदेखील वैशिष्ट्यपूर्ण व आकर्षक आहे. त्यांच्यात बहुपतित्वाची पद्धत रूढ आहे. त्यांचा धर्म बौद्ध म्हणजे लामांचा आहे. त्यांची भाषाही हिमालयातील इतर भाषांहून निराळीच आहे. त्यांचे व्यवसाय डोंगरउतारावर शेती करणे आणि शेळ्या-मेंढ्या पाळणे हे आहेत. लोकरीचा धागा काढणे आणि कापड विणणे हा यांचा मुख्य कुटीरोद्योग आहे. परंतु आता सरहद्‌दीपलीकडे तिबेटात या व्यवसायाला अधिक उठाव मिळाल्यामुळे किन्नरांचा धंदा बसत चालला आहे.

संदर्भ : Govt.of India, Report of the Scheduled Areas and Scheduled Tribes Commission, Delhi, 1961 

भागवत, दुर्गा