भारद्वाज"

भारद्वाज : (कुकुडकुंभा). पक्षी वर्गाच्या क्युक्युलिडी कुलातील हा पक्षी आहे. कोकिळ, चातक, पावशा वगैरे पक्ष्यांचाही याच कुलात समावेश केलेला आहे. या पक्ष्याचे शास्त्रीय नाव सेंट्रोपस सायनेन्सिस आहे. सबंध भारत, श्रीलंका व ब्रह्मदेशात हा आढळतो. हिमालयात साधारणपणे १,८३० मी. उंचीपर्यंत हा आढळतो. दाट झुडपे असलेला प्रदेश, माळराने, शेते, बागा, मनुष्यवस्तीच्या आसपासची झाडी इ. ठिकाणी भारद्वाज राहतो.

भारद्वाज डोमकावळ्याएवढा असून त्याची लांबी सु. ४८ सेंमी. असते. पंखआखूड व तांबूस-पिंगट रंगाचे असतात बाकीच्या शरीराचा रंग काळा असून त्यात हिरव्या, निळ्या व जांभळ्या रंगांची तकाकी असते. शेपटी लांब, रुंद, काळ्या रंगाची व निमुळती असते चोच काळी व किंचित बाकदार असते डोळे किरमिजी रंगाचे आणि पाय काळे असतात. नर आणि मादी दिसण्यास सारखीच असतात. हे पक्षी एकेकटे किंवा जोडप्याने हिंडत असतात.

सुरवंट, मोठे किडे, सरडे, उंदराची पिल्ले, लहान साप आणि पक्ष्यांची अंडी व पिल्ले हे यांचे भक्ष्य होय. झुडपांखाली जमिनीवर हळूहळू एकेक पाऊल टाकीत किंवा झुडपांच्या अथवा झाडांच्या फांद्यावर उड्या मारीत ते शांतपणे आपले भक्ष्य शोधीत असतात. हा पक्षी कूप, कूप, कूप असा मोठा व घुमणारा आवाज काढतो. पुष्कळदा दोन भारद्वाज जवळपास असले आणि एकाने ओरडायला सुरूवात केली की, दुसराही आवाज काढून त्याला उत्तर देतो व त्यांची ही उत्तरे प्रत्यत्तरे बराच वेळ चालू राहतात.

भारद्वाजांचा प्रजोत्पादनाचा काळ फेब्रवारीपासून सप्टेंबरपर्यंत असतो. घरटे घुमटाच्या आकाराचे व बरेच मोठे असून ते काटक्या, पाने, गवत यांचे बनविलेले असते. काटेरी झुडपांच्या जाळीच्या मध्यभागी बेताच्या उंचीवर अथवा झाडाच्या फांदीच्या दुबेळक्यात ते बांधलेले असते. त्यांचे दार एका बाजूला असते. मादी एका खेपेस तीन ते चार पांढऱ्या रंगाची अंडी घालते. सर्व प्रापंचिक कामांत नर व मादी दोघेही भाग घेतात.

भारद्वाज पक्षी सकाळी दिसणे हा भरतात एक शुभ शकुन मानलेला आहे.

कर्वे, ज. नी.