बोआ :  बोइडी कुलाच्या बोइनी उपकुलातील सापांना बोआ म्हणतात. हे अजगरांचे निकटचे नातेवाईक आहेत परंतु काही बाबतींत ते अजगरांपेक्षा वेगळे आहेत. उदा., अजगर अंडी घालतात, तर बोआ हे जरायुज म्हणजे पिलांना जन्म देणारे आहेत. हल्लीच्या सापांमधील हे आदिम प्रकारचे साप आहेत म्हणजे त्यांचा क्रमविकास (उत्क्रांती) फारसा झालेला नाही. दोन फुप्फुसे व मागील पायांची अवशेषांगे (अपूर्ण वाढ झालेली व अवशेषरूपात राहिलेली अंगे) ही त्यांच्या आदिमपणाची, तसेच त्यांच्या सरड्यांबरोबरच्या नातेसंबंधाची निदर्शक आहेत.बोआंच्या ४० ते ६० जाती असून त्या सर्व विषारी नाहीत. यांची लांबी ६० सेंमी. ते ७.६ मी. असून काही जाती सापांच्या सर्वांत लांब जातींपैकी आहेत. उदा., ⇨ॲनॅकाँडाची यूनेक्टिस  म्युरिनस  व बोआची कॉन्स्ट्रिक्टर कॉन्स्ट्रिक्टर, बोआंचे शरीर जाड व शेपूट काहीसे आखूड असते रंग तपकिरी, हिरवा वा पिवळा असून त्यावर चौकोनी, गोल ठिपके, पट्टे, रेषा इत्यादींची नक्षी असून पुष्कळांना रात्री चांगले दिसते. काहींना ओठावरील खवल्यांवर एक खळगा असतो. तापमानात होणाऱ्या बदलाची संवेदना या खळग्याने होत असावी. त्यामुळे पूर्ण काळोखातही असे साप भक्ष्य प्राण्याच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या उष्णतेद्वारे त्याचा मागोवा घेऊ शकतात. बोआं पैकी पुष्कळ साप जमिनीवर, काही अंशतः पाण्यात आणि थोडे वृक्षावर राहणारे आहेत. बोआंचे दात सामान्यतः आत वळलेले असून वृक्षवासी सापांना पक्षी पकडण्याला सोयीचे असे लांब दात असतात. पक्षी व लहान प्राणी हे यांचे भक्ष्य असून यांची भक्ष्य मारण्याची पद्धती वैशिष्ट्यपूर्ण आहे. काही शेपटीने फांदीला लोंबकळत राहून भक्ष्याची टेहळणी करतात. काही भक्ष्यावर हल्ला केल्यावर प्रथम त्याला चावतात. बहुतेक साप भक्ष्याच्या छातीभोवती आपल्या शरीराचे २-३ विळखे घालतात व त्याला आवळतात. यामुळे भक्ष्याच्या हृदयावर व फुप्फसांवर दाब पडतो. भक्ष्याच्या उच्छ्‌वासामुळे छातीचा पिंजरा आकुंचन पावून सैल झालेला विळखा साप घट्ट करतो असे तीन-चार वेळा केल्यावर भक्ष्याच्या छातीचा पिंजरा प्रसरण पावणे म्हणजे श्वसन थांबते. अशा तऱ्हेने चुरडल्याने नव्हे तर गुदमरल्याने प्राणी मरतो. नंतर साप त्याला गिळून टाकतो. काही साप भक्ष्य गिळल्यावर सात-आठ दिवस पडून राहून ते पचवितात(तर काही अन्नावाचून बराच काळ राहू शकतात. हे साप मुख्यत्वे उबदार प्रदेशांत आढळतात. वेस्ट इंडीज, मध्य व दक्षिण अमेरिका, दक्षिण आशिया आणि आफ्रिकेचा उत्तर व पूर्व भाग या उष्ण कटिबंधीय प्रदेशांत यांची जास्त वस्ती आहे. हे साप चांगले माणसाळू शकतात आणि दक्षिण अमेरिकेत काही ठिकाणी उंदीर-घुशींचा बंदोबस्त करण्यासाठी हे पाळण्यात येतात.बोआंपैकी कॉन्स्ट्रिक्टर कॉन्स्ट्रिक्टर (पूर्वीचे नाव बोआ कॉन्स्ट्रिक्टर) ही जाती महत्त्वाची आहे. विशेषतः व्हेनेझुएला, गियाना, ब्राझील आणि पेरुचा ईशान्य भाग येथे हा साप आढळतो. कोरड्या जागेतील बिळात, कड्यांच्या कपारीत किंवा झाडांच्या ढोलीत हा राहतो. हा वरचेवर पाण्यात जात नाही. नवीन जगात आढळणाऱ्या मोठ्या सर्पांत याचा दुसरा क्रंमाक लागतो. याची लांबी ३.३० ते ५.५५ मी. असते. हा एक देखणा साप आहे. शरीराचा सर्वसाधारण रंग फिकट तपकिरी असून त्याच्यावर गर्द रंगाचे सु.१८ आडवे पट्टे असतात आणि ते बहुधा जास्त गर्द रंगाच्या उत्तर-पार्श्व (पाठीच्या कडांवरील) रेषांनी जोडलेले असतात.पाठीवरील मोठे अंडाकार ठिपके या पट्‌ट्यांनी व रेषांनी वेढलेले असतात. दोन्ही बाजूंवर गर्द तपकिरी रंगाच्या मोठ्या ठिपक्यांची एकेक ओळ असते. शरीराचा खालचा भाग पिवळसर रंगाचा असून त्यावर काळे ठिपके असतात. डोक्यावरचे खवले लहान असतात. याचे दात आत वळलेले असतात.

आ.१. बोआ (कॉन्स्ट्रिक्टर कॉन्स्ट्रिक्टर)

 ससे, खारी, उंदीर, घुशी, मोठे सरडे, कोंबड्या, बदके इ. प्राण्यांवर हा उपजीविका करतो. मादीला एका वेळी २१-६४ पिले होतात. बंदिस्त स्थितीत ठेवलेल्या या सापाचे आयुर्मान सु. १५-२० वर्षे असल्याचे आढळले आहे.

एरिक्स वंशाचे साप वाळूत बिळे करतात. यांच्या सात जाती असून त्या उतर आफ्रिका, मध्य व दक्षिण आशिया या प्रदेशांत आढळतात. यांची लांबी ०.६ ते १.२५ मी. असते. यांचे डोके लहान व काहीसे टोकेदार, शरीर दंडगोलाकार आणी शेपटी आखूड व जाड असते. यांचा रंग तपकिरी वा काळपट तपकिरी असतो. ⇨ कांडर (एरिक्स कोनिकस) व ⇨ दुतोंड्या साप (ए. जॉनाय) ह्या जाती भारतात, तर स्पॉटेड सँड बोआ (ए. जॅक्युलस) ही जाती आशिया मायनरमधील शुष्क वाळवंटी भागात आढळते.


आ. २. बोआंचे प्रकार : (१) दुतोंड्या साप, (२) कांडर.

एपिक्रेटस  वंशाचे साप दक्षिण अमेरिका व वेस्ट इंडीज येथे आढळतात. रेनबो वा रिंग्ड बोआ (एपिक्रेटस सेंक्रिस) ही आकर्षक रंगाची जाती कोस्टा रीका ते अर्जेंटिनापर्यंतच्या प्रदेशात आढळते. या सापांची लांबी सव्वा मीटरपर्यंत असते. क्यूबातील क्यूबन बोआ (ए. अँग्युलीफर, लांबी ३.५ मी. पर्यंत) तसेच बहामा व सांतो दोमिंगो येथे आढळणारा बहामन बोआ (ए. स्ट्राॲटस, लांबी २.५ मी.पर्यंत) हे या वंशातील मोठे साप होत.

एमराल्ड किंवा ग्रीन ट्री बोआ (बोआ कॅनिना) ही हिरवट, पिवळ्या रंगाची जाती वृक्षवासी असून ब्राझील, गियाना इ. प्रदेशांत आढळते. या सापांची लांबी १.८ मी. पर्यंत असते पक्षी व माकडे यांवर ते उपजीविका करतात. रबर बोआ (कॅरिना बोटी) या जातीचे साप रबरासारखे दिसतात व त्यांचा स्पर्शही रबरासारखा जाणवतो. यांची लांबी सु. ४५ सेंमी. असून हे बिळात राहतात. उत्तर अमेरिकेच्या पश्चिम भागापासून ते ब्रिटिश कोलंबियापर्यंतच्या भागात हे आढळतात. तपकिरी रंग व त्यावर बहुधा गुलाबी पट्टे असणारी रोझी बोआ (लिकान्युरा ट्रिव्हिव्हगॅटा) ही जाती दक्षिण कॅलिफोर्निया, ॲरिझोना ते मेक्सिकोपर्यंतच्या प्रदेशात आढळते. या सापांची लांबी सु. ९० सेंमी असते. मॅलॅगॅसीत (मादागास्करात) आढळणारे बोआ मादागास्करेन्सिस जातीचे साप २ मी. पर्यंत लांब असतात.

पहा : अजगर.

संदर्भ : Raymond, L. D. Snakes of the World, New York, 1957

कर्वे, ज. नी. ठाकूर, अ. ना.