'मॅडोना देल प्रातो' (१५०६) : मॅडोनाचे (मेरीचे) रॅफेएलकृत चित्र.मेरी (व्हर्जिन मेरी) : ‘नव्या करारा’त सात मेरीं (मारीया) पैकी एकीचाच ‘कुमारी’ असा उल्लेख आहे. तीच ⇨ येशू ख्रिस्ताची माता. ती डेव्हिड राज्याच्या घराण्यातील जोसेफ (योसेफ) नावाच्या पुरुषाची वाग्दत्त वधू होती. देवाने मेरीकडे पाठवलेला गॅब्रिएल दूत तिला म्हणाला, ‘देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल त्याचे नाव येशू ठेव.’ मेरी म्हणाली ‘हे कसे होईल ? कारण मला पुरुष ठाऊक नाही’. देवदू ताने उत्तर दिले, ‘पवित्र आत्मा येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल.’

आपल्याशी समागम होण्यापूर्वी मेरी गरोदर राहिली हे जोसेफच्या लक्षात आल्यावर जोसेफने मेरीला गुप्तपणे सोडून देण्याचा विचार केला. परंतु देवदूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन मेरीला पत्नी म्हणून स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले. त्याप्रमाणे जोसेफने मेरीला पत्नी म्हणून स्वीकारले. पुढे त्यांनी संतती झाल्याचा ही उल्लेख आहे. येशू १२ वर्षांचा असताना आपल्या आई-वडि लांबरोबर वल्हांडण सणानिमित्त जेरूसलेमला गेला. सणानंतर आई-वडील परतले. परंतु येशू मागे राहिला. त्याच्या शोधार्थ मेरी व जोसेफ परत जेरूसलेमला गेले. त्यावेळी मेरी येशूला म्हणाली ‘तुझा बाप व मी कष्टी होऊन तुझा शोध करीत आलो.’ मेरीचे हे वाक्य उद्‌बोधक आहे. वयात येऊन स्वतःच्या कार्याला आरंभ करेपर्यंत येशू आई-वडि लांबरोबर कुटुंबातील एक म्हणून वाढला. आणि शेवटी क्रू सावर मरणयातना सोसत असता, वधस्तंभाजवळ इतरांबरोबर उभ्या असलेल्या मेरीला पाहून योहान या आपल्या शिष्याला तो म्हणाला, ‘पहा, ही तुझी आई.’ त्यावेळेपासून त्या शिष्याने तिला आई म्हणून आपल्या घरी नेले. यावरून येशू सारख्या थोर द्रष्ट्याला आपल्या जन्माची घटना ठाऊक नसावी हे ग्राह्य धरणे अवघड आहे.

रोमन कॅथलिक चर्च कुमारी मेरीला ‘देवाची आई’ अशी संज्ञा वापरते व तिची आराधना करते. प्रेसबिटेरियन पंथियांना मात्र हा विचार मान्य नाही. प्रोटेस्टंट व तत्सम पंथीय, प्रेक्षितांचा मतांगिकार (अपॉसल्स क्रीड) हा ख्रिस्ती धर्माचा मुख्य वैचारिक आधारस्तंभ मानतात व उपासनेच्या वेळी हा मतांगिकार उभे राहून म्हणतात. त्यात ‘येशू जो कुमारी मेरीच्या उदरी जन्मास आला, त्यावर मी (आम्ही नव्हे) विश्वास ठेवतो,’ हा वैयक्तिक व सामुदायिक विश्वास असतो. सध्याच्या तांत्रिक युगात अशा विश्वासाला काय स्थान असणार हा प्रश्न निदान प्रोटेस्टंट ख्रिश्चन धर्मशास्त्रवेत्त्यांनी डावलेला नाही. न्यू यॉर्क येथील धर्मशास्त्राचे प्राध्यापक जे. व्ही. कॅसर्ली यांना आपल्या द व्हर्जिन बर्थ : अ हँडबुक ऑफ ख्रिश्चन थिऑलॉजीमध्ये याबाबत फक्त दोन पानांचा (३६०–३६१) प्रस्ताव मांडला आहे. त्यांच्या मते ‘व्हर्जिन बर्थ’ ऐवजी ‘व्हर्जिनल कन्सेप्शन’ ही संज्ञा या संदर्भात वापरणे अधिक उचित ठरेल. म्हणजे ‘कुमारी पुत्रा’ – ऐवजी त्याला कौमार्य सुरक्षित राहून म्हणजे पुरुषसमागमाशिवाय झालेला गर्भसंभव किंवा अनिषेक वा असंगमक जनन (पार्थिनोजेनेसिस) म्हणणे योग्य ठरेल. त्यांचा हा खुलासा पटण्यासारखा आहे.

‘ब्लेसेड व्हर्जिन मेरी’, ‘सेंट मेरी’, ‘मॅडोना’ इ. नावांनीही मेरीचा निर्देश केला जातो. ‘नव्या  करारा ’त तिच्या जीवनाविषयी फारशी माहिती नाही. ॲना व जोआकिम यांची ती कन्या असा निर्देश काही ग्रंथांत (ॲपोक्रिफल गॉस्पेल्स) आहे. येशूला क्रू सावर चढवल्यानंतर ती जॉन समवेत इफेसस येथे राहत होती तेथेच तिचे निधन झाले व तेथेच तिचे दफन झाल्याचे एका परंपरेनुसार मानले जाते तर दुसऱ्या एका परंपरेनुसार तिचे जेरूसलेमला निधन झाले ऑलिव्ह पर्वताच्या पायथ्याशी तिला दफन केले आणि जेव्हा अपॉसल्स तिसऱ्या दिवशी तिच्या कबरीजवळ गेले तेव्हा त्यांना तिचे मृत शरीर आढळले नाही. तर त्यांना अत्यंत मधुर असा सुगंध जाणवला. असे सांगितले जाते.

‘मॅडोना’ हे ‘माय लेडी’ या अर्थाचे, कुमारी माता मेरीच्या चित्र-शिल्पादी कलांतील प्रतिमेस दिलेले इटालियन नाव असून, हे कलाक्षेत्रात रूढ झाले आहे. कुमारी माता व मेरी बालरूप ख्रिस्त हा विषय ख्रिस्ती धार्मिक कलेत फार महत्त्वाचा असून तो वारंवार प्रकटला आहे. आद्य ख्रिस्ती भूमिगत थडग्यांतून (इ. स. सु. दुसरे ते चौथे शतक) आढळणारी मॅडोनाची चित्रे सर्वांत जुनी मानली जातात. बायझंटिन काळातील मॅडोनाचा साचा साधारणपणे १२०० पर्यंत गिरवला गेला. पुढे आद्य प्रबोधनकाळात (तेरावे शतक) मॅडोना–चित्रणाची एक नवी शैली उदयास आली. त्यात पार्श्वभूमीदाखल निसर्गदृश्ये रंगवलेली असत. उदा. जोव्हान्नी चिमाबूएची मॅडोनाचित्रे. उत्तर प्रबोधनकाळात (पंधरावे-सोळावे शतक) कुमारी माता व बाल-ख्रिस्त हा विषय फार लोकप्रिय ठरला. अनेक चित्रकार-शिल्पकारांनी या विषयावर उत्तमोत्तम कलाकृती निर्माण केल्या. ⇨ रॅफेएलने काही श्रेष्ठ, अजरामर मॅडोना-चित्रे काढली. उदा., सिस्टाइन मॅडोना (१५१५) मॅडोना डेल ग्रँड्युका (सु. १५०५ पहा : मराठी विश्वकोश, खंड २ चित्रपत्र ४३). या व्यतिरिक्त आलेस्यो बालदोव्हिनेत्ती, जोव्हान्नी बेल्लीनी, लिओनार्दो दा व्हींची, जोर्जोने फ्रा फिलिप्पो लिप्पी, आंद्रेई देल सार्तो, तिशन इ. मॅडोना-चित्रकार ख्यातनाम आहेत. मायकेलअँजेलोचे मेदीची मॅडोना हे संगमरवरी शिल्प (सु. १५२१–३१) उत्कृष्ट आहे. पक्वमृदा, हस्तिदंत माध्यमांतही कुमारी माता व बाल-येशूची शिल्पे आहेत.

संदर्भ : 1. Brown, R. E. Ed. Mary in the New Testament, Philadelphia, 1978.

            2. Graef, H. C. Mary : A History of Doctrine and Devotion, 2.Vols., New York, 1963, 1966.

            3. Warner, Marina, Alone of All Her Sex : The Myth and Cult of the Virgin Mary, New York, 1976.

आयरन, जे. डब्ल्यू. (इं) साळवी, प्रमिला (म.)