गर्नार्ड(ट्रिग्‍ला)

गर्नार्ड : ट्रिग्‍लिडी मत्स्यकुलातील सगळ्या माशांना सामान्यत: गर्नार्ड मासे म्हणतात. उष्ण कटिबंधातील आणि समशीतोष्ण प्रदेशांतील सर्व समुद्रांत हे आढळतात. सामान्यत: हे किनाऱ्याच्या जवळपास राहणारे आहेत, पण काही जाती २०० मी. खोलीवरही राहतात. यांचे चार वंश असून त्यांत सु. ५० जाती आहेत. काही भडक तर काही आकर्षक रंगाच्या असतात. यांच्यापैकी करडा गर्नार्ड (ट्रिग्‍ला गर्नार्डस) आणि तांबडा गर्नार्ड (ट्रिग्‍ला क्युक्युलस) हे उपयुक्त खाद्य मत्स्य आहेत.

या माशांची लांबी ६० सेंमी.पर्यत असते डोके मोठे व अस्थिवर्माने (अस्थीच्या ढालीसारख्या संरचनेने) पूर्णपणे झाकलेले असून त्यावर कंटक असतात शरीर लहान, गुळगुळीत किंवा काटेरी खवल्यांनी झाकलेले असते डोक्याची रूपरेखा अवतल (अंतर्गोल) असून मुस्कटाचा वरचा काठ गोलसर अथवा उतरता असतो डोळे मोठे असतात प्रत्येक बाजूला दोन नाकपुड्या असतात. यांचे एक विशेष लक्षण म्हणजे अंसपक्षातील (छातीच्या भागातील परातील, पर म्हणजे हालचालीसाठी व तोल सांभाळण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या त्वचेच्या स्नायुमय घड्या) पुढचे तीन अर (परांना आधार देणारे अस्थिमय कंटक) वेगळे होऊन त्यांचे बोटांसारख्या प्रवर्धांत (वाढींत) रूपांतर झालेले असते. समुद्राच्या तळावर अन्न (लहान कवचधर आणि इतर प्राणी ) शोधण्याच्या आणि कधीकधी तळावर हळूहळू चालण्याच्या कामी त्यांचा उपयोग होतो.

डॅक्टिलॉप्टेरिडी या मत्स्यकुलातील माशांनाही गर्नार्ड म्हणतात. हे उडणारे गर्नार्ड होत. यांच्या चार जाती असून त्या सर्व डॅक्टिलॉप्टेरस  वंशाच्या आहेत. अटलांटिक आणि हिंदी महासागराच्या उष्ण कटिबंधीय विभागांत त्या आढळतात. त्यांचे अंसपक्ष मोठे असून त्यांच्या योगाने ते एक्झॉसीटस  माशांप्रमाणे थोड्या अंतरापर्यंत उडू शकतात.

पहा : उडणारे मासे.                                                                    

यार्दी, ह. व्यं.