गहमरी, गोपालराम : ( १८६६–१९४६). हिंदी साहित्यातील ‘जासूसी उपन्यासा’चे ( गुप्तपोलिसांच्या अथवा रहस्यप्रधान कादंबऱ्यांचे ) प्रवर्तक. जन्म उत्तर प्रदेशाच्या गाझीपूर जिल्ह्यातील गहमर या गावी झाला, म्हणून ‘गहमरी’ नावाने प्रसिद्ध. ते अष्टपैलू लेखक होते. काव्य, कथा, कादंबरी, नाटक, निबंध इ. प्रकारांत त्यांनी विपुल लेखन केले. सुरुवातीस त्यांनी काही बंगाली नाटके व कादंबर्‍यांचे हिंदी अनुवाद केले. नंतर मात्र ते रहस्यप्रधान कथा-कादंबऱ्यांकडे वळले. १८९३ मध्ये त्यांची चतुर चंचला  ही पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली आणि तेव्हापासून १९४६ पर्यंत त्यांच्या सु. २०० लहानमोठ्या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या ह्या कादंबर्‍यांना वाङ्‍मयीन दृष्टीने विशेष दर्जा नसला, तरी त्यांचा वाचकवर्ग फार मोठा होता व त्या लोकप्रियही होत्या. १९०० मध्ये त्यांनी जासूस  नावाचे मासिक गहमर येथे सुरू करून, त्यातून दरमहा आपली एक कादंबरी प्रसिद्ध केली.द्‍भुत लाश (१८९६), गुप्तचर (१८९९), मायाविनी (१९०१), क्‍करदार चोरी (१९०१), द्‍भुत खून (१९०२), गुप्तभेद (१९१३), जासूस की ऐय्यारी (१९१४) इ. त्यांच्या कादंबर्‍या विशेष उल्लेखनीय होत.

हिंदी साहित्यातील जासूसी उपन्यासाच्या क्षेत्रात गहमरींचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यांच्या सामाजिक निबंधांतून दर्जेदार व वक्रोक्तिपूर्ण गद्यशैलीचे दर्शन घडते. गहमर येथे त्यांचे निधन झाले.

बांदिवडेकर, चंद्रकांत