रुई : (१) फुलोऱ्यासह फांदी, (२) केसरदले व टोकास किंजल्क, (३) फळ , (४) उकललेले फळ, (५) बी.रूई : (हिं. अक, मदार गु.आकडो क. एकमेले, अर्कगिड, यक्क सं. अर्क इं. जायंट मिल्कवीडलॅ. कॅलॉट्रॉपिस जायगँशिया कुल-ॲस्क्लेपीएडेसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पती, आवृतबीज उपविभाग] सु. २-३ मी. उंचीचे हे वहुवर्षांयू (अनेक वर्षे जगणारे) झुडूप महाराष्ट्रात सर्वत्र, पडीक पण रूक्ष जागी वाढलेले आढळते. शिवाय भारतातील उष्ण ठिकाणी व श्रीलंका, मलाया, द. चीन, आफ्रिका इ. प्रदेशांत सापडते. रूईच्या कॅलॉट्रॉपिस या प्रजातीत सहा जाती असून भारतात त्यांपैकी फक्त तीन आढळतात. रूईची साल पिवळट पांढरी असून खोडावर साधी, समोरासमोर, जाड, १०−२०×९−१० सेंमी., फार लहान देठाची, तळाशी खोडास काहीशी वेढून राहणारी, हृदयाकृती व लंबगोल पाने असतात. सर्वच भागांवर मऊ, पांढरी लव असते. पानांच्या बगलेत चवरीसारखा फुलोरा [कुंठित चामरकल्प⟶पुष्पबंध] फेब्रुवारी ते जुलैमध्ये येतो व त्यावर फिकट जांभळट किंवा पांढरी, बिनवासाची फुले येतात पाकळ्या पसरट असतात नंतर सु. ९−१० सेंमी. लांब पेटिका (पेटी सारखी) फळे येतात त्यात पिंगट, ६×५ मिमी. चपटी, हलकी, शिखालू (नरम केसांचा झुबका असलेली), लंबगोल व विपुल बीजे असून ती फळ तडकल्यावर वाऱ्याने पसरविली जातात. फुलांची संरचना व वनस्पतीची इतर शारीरिक लक्षणे ⇨ॲस्क्लेपीएडेसी  अथवा रुई कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.

भारतीय वैदिक वाङ्‌मय व वेदोत्तर वाङमयादी संस्कृत ग्रंथांत ‘अर्क’ या नावाने रुईचा उल्लेख बराच आला आहे. उदा., कौशिक सूत्र, महाभारत, कौटिलीय अर्थशास्त्र, सुश्रुतसंहिता इत्यादी.      

उपयोग : मुळाची साल स्वेदकारी (घाम आणणारी), कफोत्सारी (कफ बाहेर काढणारी), वांतिकारक (ओकारी करणारी) असून रक्तामांश (रक्तमिश्रित आव) व हस्तपादरोग यांवर उपयुक्त असते. पानांचा उपयोग पाळीच्या तापावर होतो. फुलांचे चूर्ण सर्दी, कफ, दमा व अपचन इत्यादींवर देतात.⇨चीक रेचक असून तो कातडी कमाविण्यास वापरतात.खोडाच्या सालीपासून धागे व लाकडापासून कोळसा मिळवितात. बियांवरील नरम, हलक्या, रेशमी व तलम केसांचा (रुईच्या कापसाचा) उपयोग उश्या व गाद्या भरण्यासाठी करतात.                 

मांदार : प. व म. भारतातील रुईच्या प्रजातीतील ही दुसरी जाती (लॅ. कॅ. प्रोसीरा इं. स्वॅलोवर्ट सं. अलर्क हिं. अकडा) असून रुईपेक्षा ते झुडूप लहान असते त्याची खोडे सु. १·८−२·४० मी. उंच असतात. अनेक लक्षणांत या झुडपांचे रुईशी साम्य असते. याच्या कळ्या गोलसर (रुईमध्ये लंबगोल) असून याची फुले लालसर व त्यांवर जांभळे ठिपके असतात. ती सुगंधी असतात व त्यांच्या पाकळ्या उभट असतात. चीक, कापूस, धागे व औषधी गुणधर्म यांबाबत रुईच्या झुडपात व मांदारात फारसे फरक नाहीत. मांदार अनेकदा शेतजमिनीत तणाप्रमाणे वाढते तथापि योग्य तणनाशकाने त्याचे नियंत्रण करता येते. या वनस्पतीला ‘रुईमांदार’ असेही म्हणतात पण मंदार आणि मांदार भिन्न आहेत. हिंदुधर्मशास्त्रात श्री हनुमानाची पूजा रुईच्या पानांनी करावी, असे सांगितले आहे.

पहा : पांगारा पारिजातक.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. II, New Delhi, 1950.

           २. काशीकर, चिं. ग. भारतीय वनस्पतींचा इतिहास,नागपूर १९७४.  

           ३. पदे, शं. दा. वनौषधी गुणादर्श, मुंबई, १९७३. 

घन, सुशीला प. परांडेकर, शं. आ.