कॅरेट: जपानी भाषेत कॅरेट म्हणजे मोकळे हात. त्यादृष्टीने शस्त्रादी कोणत्याही बाह्य साधनाचा वापर न करता केवळ मनगटाच्या जोरावर आत्मसंरक्षण व चढाई करण्याच्या या तांत्रिक खेळास पडलेले हे नाव उद्बोधक आहे.

कॅरेटचा एक डाव

निशःस्त्र स्थितीत आत्मसंरक्षण कसे करावयाचे व सशस्त्र आक्रमकावर चढाई कशी करावयाची याचे शिक्षण घेता घेता कॅरेट या खेळाचा प्रथम चीनमध्ये उदय झाला, असे मानन्यात येते. इ. सनाच्या पाचव्या-सहाव्या शतकांत दारुमा तैशी नावाच्या भारतीय बौद्ध भिक्षूने ही विद्या चिनी लोकांना शिकविली.

रिऊक्यू बेटावरील ओकिनावा भागातील आक्रमक हे असाहाय्य लोकांवर सशस्त्र हल्ले करीत. अशा हल्लेखोरांपासून बचाव करण्याच्या गरजेतून सतराव्या शतकापासून कॅरेटचा विकास घडून आला. १९१६ पासून जपानमध्ये कॅरेटचे तंत्र विशेषत्वाने प्रगत झाले. फुनाकोशी गिचिन(१८६९—१९५७) यांना आधुनिक कॅरेटचा जनक मानण्यात येते.

जपानमध्ये हा खेळ चार प्रकांरानी खेळला जातो. शोटोकान, वाडो-यु, गोजु-यु व शिटो-यु हे ते चार प्रकार होत. येथे या खेळाच्या नाकायामा राष्ट्रीय स्पर्धाही भरतात. हीरोकाझ कानाझावा, मासाटोशी व यामागुची गोगेन हे तीन कॅरेटपटू प्रसिद्ध आहेत.

कोणत्याही शस्त्राचा वा अन्य साधनांचा आधार न घेता केवळ मनगटाचा, बुक्कीचा, कोपराचा व पायाचा वापर करुन प्रतिपक्षावर हल्ला करावयाचा आणि वेळप्रसंगी याच मार्गाने स्वतःचा बचावही करावयाचा, असे खेळाचे प्रमुख तंत्र आहे. कॅरेटपटूंच्या मनगटात वीट फोडण्याइतकी ताकद असते. कॅरेटचे तंत्र अवगत करण्यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाची गरज असते. हल्ली भारतातही हा खेळ लोकप्रिय होत आहे.

संदर्भ : Nishiyama, H. Brown, R. C. Karate, Tokyo, 1968.

पंडित, बाळ ज.