कूटप्रश्न : (रिडल्स). कूटप्रश्न म्हणजे शब्दार्थाची चमत्कृती साधून तयार केलेले कोडे. त्यातील प्रश्न, त्याचा आशय यात गूढता असते व त्याचे उत्तरही प्रथमदर्शनी गूढच भासते. ðउखाणा  हा कूटप्रश्नाचाच एक प्रकार आहे. कूटप्रश्नांनी ज्ञान व मनोरंजन हे दोन्ही हेतू साधले जातात व बुद्धीला चालनाही मिळते.

प्राचीन काळापासून सुसंस्कृत व असंस्कृत अशा दोन्ही समाजांत कूटप्रश्नांचा उपयोग केला जाई. कूटप्रश्नात प्रश्न असतो व त्यातच साधारणतः त्याचे सूचक पण गर्भित उत्तर असते. बायबल, कुराण, प्राचीन भारतीय वाङ्‍मय यांत अनेक महत्त्वाच्या प्रसंगी कूटप्रश्नांचा उपयोग केल्याचे आढळते. अनेक लौकिक विषयांत, तत्त्वज्ञानात व उपदेशात्मक वाङ्‍मयात कूटप्रश्न आढळतात. महाभारतातील वनपर्वात यक्षाने धर्मराजाला अनेक अवघड कूटप्रश्न विचारले व धर्मराजाने त्यांची समर्पक उत्तरे दिल्याचा उल्लेख आहे.

पूर्वी विद्वानांमध्ये कूटप्रश्नांच्या स्पर्धा चालत. वैदिक वाङ्‍मयातील कूटप्रश्नांची लोकप्रियता पाहून बौद्ध वाङ्‍मयातही त्यांचा वापर केलेला आढळतो. कूटवाङ्‍मयाला कालांतराने कूटकथा, परीकथा यांची जोड मिळाली. वर्णनात्मक कोडी जगभर विविध भाषांत आढळतात. एका जर्मन दंतकथेत स्पिंक्स नावाच्या राक्षसाने ओडियसला एक वर्णनात्मक कोडे घातले ते असे : असा कोण की ज्याला एक आवाज आहे, जो सकाळी चार पायांवर चालतो, दुपारी दोन पायांवर चालतो व संध्याकाळी तीन पायांवर चालतो? ओडियसने त्यास मनुष्य असे समर्पक उत्तर दिले. ग्रीक वाङ्‍मयातही अनेक गूढ असे कूटप्रश्न आहेत. उदा., सर्वांत कठीण गोष्ट कोणती? याचे सर्वसामान्य उत्तर लोखंड असे येते. परंतु ते नाही. कारण लोहार हा लोखंडाला नरम करतो. मग लोहार असे उत्तर असावे असे वाटते. पण तेही बरोबर नाही. शेवटी प्रेम हे उत्तर समर्पक ठरते. कारण प्रेम हे लोहारालाच काय पण कोणालाही नरम करते.

महाराष्ट्रात शाहिरी वाङ्‍मयातील भेदिक लावण्यांत कूटप्रश्नांसारखे सवालजबाब करणारे अनुक्रमे कलगीवाले व तुरेवाले असे दोन पक्ष आढळत. सर्वसामान्य माणसेही एकमेकांना गंमतीदार कूटप्रश्न विचारून गोंधळात टाकतात.

प्रश्न : हिंग जिरे मसाला, चार शिंगे कशाला?

उत्तर : लवंग. 

प्रश्न : एवढासा गडू, त्यात बत्तीस लाडू?

उत्तर : तोंड व दात. 

इंग्रजी भाषेतही अनेक काव्यात्मक कोडी आहेत. त्यांपैकी एकाचा मराठी अनुवाद खालीलप्रमाणे : 

छोटी नॅन्सी एटीकोट 

तिचा पांढरा पेटीकोट 

तिचे नाक लालच लाल 

उभे राहते फार काल 

झिजता झिजता होतात हाल

ही पांढऱ्‍या फ्रॉकची नॅन्सी कोण ?

उत्तर : मेणबत्ती.

  

गणितासारख्या विषयातही अनेक प्रकारचे कूटप्रश्न रचता येतात. उदा., ९ हा आकडा ४ वेळा वापरून बेरीज १०० करून दाखवा. उत्तर : ९९ ९/९. अशा रीतीने कूटप्रश्न अनेक विषयांत विचारले जातात व रचले जातात.                               

शहाणे, शा. वि.