ट्राक्ल, गेओर्ख : (३ फेब्रेवारी १८८७–३ नोव्हेंबर १९१४). ऑस्ट्रियन कवी. सॉल्झबर्ग येथे जन्मला. औषधविक्रीचा त्याचा व्यवसाय होता आणि तत्संबंधीचे शिक्षण त्याने घेतले होते. तथापि ट्राक्ल हा एक मज्जाविकृत (न्यूरॉटिक) होता. आत्यंतिक संवेदनशीलतेमुळे वास्तव जगाला सामोरे जाण्याची शक्ती त्याच्यात नव्हती त्यामुळे मद्य आणि औषधे ह्यांच्या आधारावरच तो जगत होता. पहिल्या महायुद्धात प्रथमोपचार पथकात त्याने काम केले. युद्धातील भीषण, पाशवी घटनांचा त्याच्या मनावर परिणाम झाला. कसले तरी औषध प्रमाणाबाहेर घेतल्यामुळे क्रेको येथील लष्करी इस्पितळात त्याला मृत्यू आला. त्याने आत्महत्या केली असावी, असेही म्हटले जाते.

गेडिस्ट (१९१३, इं. शी. पोएम्स), सेबास्टिआन इन ट्राउम (१९१४, इं.शी. सिबॅस्‌चन इन् ड्रीम), आउस गोल्डनेम केल्श (१९३९, इं. शी. आउट ऑफ गोल्डन कप) हे ट्राक्लचे काही उल्लेखनीय काव्यसंग्रह. त्याच्या सर्व कविता गेसामेल्टे वेर्के (३ खंड) यात प्रसिद्ध झाल्या आहेत (१९४९).

ट्राक्लला जाणवणारी सृष्टी शोकात्म असून त्याला सर्वत्र मृत्यूच्या व विनाशाच्या खुणा दिसतात. त्याच्या मनातील अस्वस्थता, एकाकीपणा, दुःख, मृत्यू, सौंदर्याची आणि अर्थपूर्ण जीवनाची ओढ विविध रूपांतून आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमांतून त्याच्या कवितेत अवतरलेली आहे. ट्राक्लच्या कवितेचे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे अभिव्यक्तिवादी काव्याच्या पूर्वखुणा तीतून प्रत्ययास येतात. 

देव, प्रमोद