मान, टोमास :(६ जून १८७५–१२ ऑगस्ट १९५५). आंतराराष्ट्रीय कीर्तीचा थोर जर्मन कादंबरीकार. जन्म ल्यूबेक शहरी. मानचे वडील श्रीमंत व्यापारी होते. १८९१ मध्ये त्यांचा मृत्यू झाला व्यापारी ढासळला. त्यानंतर मान कुटुंब म्यूनिक शहरी आले. म्यूनिक येथील वास्तव्यात काही काळ एका विमा कंपनीत मानने काम केले एका नियतकालिकातील एका संपादकीय पदावरही तो होता. त्यानंतर मात्र आपला वडील बंधू हाइन्रिख मान (१८७१–१९५०) ह्याच्याप्रमाणेच त्याने स्वतःला साहित्य सेवेस वाहून घेतले. डेअर क्लाइन हेअर फ्रीडमान (इं. शी. लिट्ल हेअर फ्रीडमान) हा त्याच्या अगदी आरंभीच्या कथाचा संग्रह १८९८ मध्ये प्रसिद्ध झाला. सर्जनशील कलावंतांच्या समस्यांभोवती मानच्या सुरुवातीच्या बऱ्याचशा कथा केंद्रित झालेल्या आहेत. शोपेनहौअर, नीत्‌शे ह्या तत्त्वज्ञांचा, तसेच रिखार्ट व्हाग्‌नर ह्या संगीतकाराचा त्याच्यावर असलेला प्रभावही त्याच्या आरंभीच्या कथांतून दिसून येतो. तथापि मानला विशेष कीर्ती मिळाली, ती त्याच्या बुड्‌डेन ब्रुक्‌स (१९०१) ह्या कादंबरीमुळे. एके काळी अतिशय समृद्ध असलेल्या एका व्यापारी कुटुंबाचा एकेका पिढीबरोबर होत गेलेला ऱ्हास ह्या कादंबरीत मानने दाखविलेला आहे. कलात्मक वृत्ती व व्यापारासाठी आवश्यक असलेला व्यवहारवाद ह्यांच्यातील विरोध, कलाप्रवृत्तीमुळे व्यक्तिमत्त्वात येणारा दुबळेपणा ह्यांचेही चित्रण मानने ह्या कादंबरीत केलेले आहे. टोनिओ क्रोयगर (१९०३), ट्रिस्टान (१९०३) आणि डेअर टोड इन व्हेनेडिग (१९१३) ह्या मानच्या तीन कादंबरिकाही उल्लेखनीय आहेत. त्यांतही कलावंतांचे असामान्य जीवन, त्यांतील ताण आहेतच. कोय्‌निग्लिश होहाइट (१९०९, इं. शी. रॉयल हाय्‌नेस) ही कादंबरी मानच्या वरील कथात्मक लेखनापासून वेगळी उठून दिसते. ह्या कादंबरीचा सूर आनंदाचा आहे. स्वतःवर विश्वास असलेला, आपल्या असामान्यत्वामुळे वाट्याला आलेल्या एकाकीपणाचा निरास भोवतालचे जग आणि जीवन ह्यांच्याशी प्रेमाचे नाते जोडून करणारा नायक ह्या कादंबरीत दिसतो.

टोमास मान

पहिले महायुद्ध सुरू झाल्यानंतर एक जर्मन राष्ट्रवादी म्हणून मानला जर्मनीचा युद्धातील सहभाग उचित वाटला. युद्धाचे त्याने समर्थन केले : इंग्लंड आणि फ्रान्स ह्या लोकशाहीवादी राष्ट्रांवर टीका केली. जर्मनीच्या प्राधिकारवादाचेही (ऑथॉरिटेरिअनिझम) त्याने समर्थन केले, ‘रिफ्लेक्शन ऑफ अ नॉन पोलिटिकल मॅन’ (१९१८, इं. शी.) हा त्याचा ग्रंथ ह्या संदर्भात उल्लेखनीय आहे. पहिल्या महायुद्धाच्या काळातील मानच्या राजकीय विचारांमुळे त्याचा वडील बंधू हाइन्रिख ह्याच्याशी त्याचे संबंध दुरावले होते. पुढे वायमार प्रजासत्ताकाची स्थापना झाल्यानंतर मानचे विचार लोकशाहीकडे झुकले. मानच्या दृष्टिकोणात झालेला हा बदल डेअर त्साउबरबेर्ग (१९२४, इं. शी. द मॅजिक माउंटन) ह्या कादंबरीतून प्रत्ययास येतो. ‘गटे अँड’ टॉलस्टॉय’ (इं. शी) आणि ‘द जर्मन रिपब्लिक’ (इं. शी) हे दोन निबंधही ह्या संदर्भात लक्षणीय आहे.

‘डिसॉर्डर अँड अर्ली सॉरो’ (१९२६, इं. शी) आणि ‘मारिओ अँड मॅजिशिअन’(१९३०, इं. शी) ह्या त्याच्या दोन उल्लेखनीय कादंबरिका ‘मॅजिक माउंटन’ नंतरच्या. त्यांपैकी ‘मारिओ अँड मॅजिशिअन’ – मध्ये त्याने फॅसिस्ट मनोवृत्तीचे प्रभावी विश्लेषण केले आहे. १९३० नंतर त्याने नाझी तत्त्वज्ञानावर हल्ला चढवला. १९३३ मध्ये जर्मनीची सत्ता हिटलरच्या हाती गेली, तेव्हा मान आपल्या पत्नीसह स्वित्झर्लंडमध्ये होता. म्यूनिक येथे असलेल्या त्याच्या मुलांनी, जर्मनीत न परतण्याची सूचना त्यालाकेली. ती मानून तो पाच वर्षे स्वित्झर्लंडमध्ये राहिला. १९३६ मध्ये त्याचे जर्मन नागरिकत्व रद्द करण्यात आले. बॉन विद्यापीठाने त्याला १९१९ मध्ये बहाल केलेली सन्माननीय डॉक्टरेटही ह्याच वर्षी त्या विद्यापीठाने काढून घेतली. १९३८ मध्ये तो अमेरिकेत स्थायिक झाला. १९४४ मध्ये त्याला अमेरिकन नागरिकत्व देण्यात आले. अमेरिकेतील वास्तव्यात मानने–सर्व इं.शी.– ‘द बिलव्हेड रिटर्न्‌स’ (१९३९), ‘डॉक्टर फाउस्टुस’ (१९४७) आणि ‘द होली सिनर’ (१९५१) ह्या कादंबऱ्या पूर्ण केल्या. जगप्रसिद्ध जर्मन कवी गटे ह्याच्या प्रतिभेचे सखोल विश्लेषण ‘द बिलव्हेड रिटर्न्‌स’ मध्ये आढळते, तर ‘डॉक्टर फाउस्टुस’ मध्ये एका कलावंताच्या प्रतीकात्मक व्यक्तिरेखेतून जर्मनीचा ऱ्हास चित्रित केलेला आहे. सैतानाशी करार करून सामर्थ्य आणि यशस्वी होणारा संगीतकार आड्रिआन लेव्हरक्यून ह्याची अखेरही दु:खदच होते त्याला वेड लागते. आड्रिआन व्यक्तिरेखा हिटलरचा जर्मनी, त्याने प्राप्त केलेले राक्षसी सामर्थ्य आणि त्याचा झालेला दारुण पराभव ह्यांचे स्मरण करून देते. ‘द होली सिनर’ एका मध्ययुगीन आख्यायिकेवर आधारलेली कादंबरी आहे.


योसेफ उण्ट झाइनब्यूडर (४ खेड, इं. शी. जोसेफ अँड हिज ब्रदर्स) ही कादंबरी मानची एक श्रेष्ठ कलाकृती होय. द टेल्स ऑफ जेकब (१९३३, इ. भा. १९३४), यंग, जोसेफ (१९३४, इं. भा. १९३५), जोसेफ इन ईजिप्त (१९३६, इं. भा. १९३८) आणि जोसेफ द प्रोव्हायडर (१९४३, इं. भा. १९४४) हे ह्या कादंबरीचे ४ खंड होत. बायबलमधील जोसेफच्या कथेचा पुन्हा अन्वयार्थ लावण्याचा मानचा प्रयत्न ह्या कादंबरीत दिसतो. ह्या कादंबरीचे संकल्पन १९३३ पूर्वीच, म्हणजे मानला परागंदा अवस्थेत देशाबाहेर राहण्याची वेळ येण्याआधीच, झालेले होते तथापि परागंदा माणसाच्या मनःस्थितीचे प्रतिबिंब तीत पडलेले आढळते. आपल्या समकालिनांसाठी एक प्रभावी मिथ्यकथा देण्याचा मानचा प्रयत्नही तीतून दिसून येतो. अप्रकट मनासंबंधीच्या फ्रॉइडप्रणीत उपपत्तींचा प्रभाव ह्या कादंबरीवर पडलेला आहे.

द कन्‌फेशन्स ऑफ फेलिक्ल क्रूल कॉन्‌फिडन्स मॅन (१९५४, इ. भा. १९५५) ही मानची एक विनोदी कादंबरी. निरनिराळ्या माणसांना खेळवणाऱ्या आणि त्यांचा अनुग्रह प्राप्त करून घेणाऱ्या एका धूर्त माणसाची ही कहाणी आहे.

मानने लिहिलेल्या निबंधांत गटे, टॉलस्टॉय, शोपेनहौअर, रिखार्ट व्हाग्‌नर, फ्रॉइड आणि शिलर ह्यांच्यावरील निबंध अंतर्भूत आहेत. १९४०–४२ ह्या कालखंडात, जर्मन जनतेला उद्देशून बी.बी.सी. वरून त्याने जी व्याख्याने दिली, त्यांपैकी काहींचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झालेला आहे (लिसन, जर्मनी! व्टेंटी फाइव्ह रेडिओ मेसेजिस टू द जर्मन पीपल….१९४३).

मानने आत्मचरित्रात्मक असे काही लेखन केले आहे. त्यात ए स्केच ऑफ माय लाइफ (१९३०, इं. भा. १९३०) आणि जेनेसिस ऑफ अ नॉव्हेल (१९४९, इं. भा. १९६१) ह्या दोन निबंधांचा समावेश आहे.

मानला १९२९ मध्ये साहित्याचे नोबेल पारितोषिक देऊन त्याच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला. झुरिकजवळील किल्चबर्ग येथे तो निधन पावला.

संदर्भ : 1. Blume, Bernhard, Thomas Mann and Goethe, Bern, 1949.

            2. Brennan, J. G. Thomas Mann’s World, Columbia, 1942.

            3. Burgin, Hans : Mayer, Hans-Otto, Eng. Trans., Thomas Mann: A Chronicle of His life, 1969

            4. Feuerlicht, Ignace, Thomas Mann, Twayne, 1968.

            5. Hatfield, Henry, Thomas Mann: An Introduction to His Fiction, London, 1952

            6. Hatfield Henry, Ed., Thomas Mann: A Collection of Critical Essays, Prentcie-Hall, 1964.

            7. Heller, Erich,The Ironic German: A Study of Thomas Mann, Little, 1958.

            8. Hollingdale, R. J. Thomas Mann: A Critical Study, Bucknell Univ. Press, 1971.

            9. Reed, T. J.The Uses of Tradition. Oxford, 1974.

          10. Thomas R. H. Thomas Mann, the Meditation of Art, Oxford, 1956.

कुलकर्णी, अ. र.