फ्रीड्रिख हल्डरलीन

हल्डरलीन, फ्रीड्रिख : (२० मार्च १७७०–७ जून १८४३). जर्मन भावकवी. संपूर्ण नाव योहान ख्रिस्टिआन फ्रीड्रिख हल्डरलीन. जन्म नेकार नदीच्या काठी वसलेल्या एका लहानशा स्वाबिअन शहरात. त्याचे वडील मरण पावल्यानंतर (१७७२) त्याच्या आईने दुसरा विवाह केला आणि ती न्यूर्टिंजन ह्या शहरी राहा-वयास आली त्यामुळे हल्डरलीन तिथल्या शाळेत शिकू लागला तथापि त्याच्या आईचा हा दुसरा नवराही मरण पावला (१७७९). फ्रीड्रिखने चर्चच्या सेवेत शिरावे अशी त्याच्या आईची इच्छा होती कारण त्यामुळे त्याला शिक्षण मोफत मिळाले असते. हल्डरलीनसारख्या बुद्धिमान, पण गरीब मुलासाठी अशी संधी सोडणे योग्य नव्हते. त्यामुळे तो डेंकनडॉर्फ आणि मॉलब्रॉन येथील ख्रिस्ती मठशाळांतून शिकला. त्यानंतर ट्यूबिंजन विद्यापीठात ईश्वर-विद्या शिकविणाऱ्या सेमिनरीत तो शिकला. तेथून त्याने उच्च पदवी प्राप्त केली आणि दीक्षाधारक होण्याची पात्रता मिळवली. मात्र धर्मोपदेशक होण्याची त्याच्या मनाची तयारी नव्हती. तत्कालीन प्रॉटेस्टंट ईश्वरविद्या ही श्रद्धा आणि विवेक ह्यांच्यातील एक अस्वस्थ करणारी तडजोड वाटत असल्याने, त्याला सुरक्षित आध्यात्मिक आधार मिळत नव्हता. शिवाय ख्रिस्ती पुराणकथांशी त्याचे एक भावनिक नाते जडलेले होते. ग्रीक देवदेवता खरोखरीच्या शक्ती असून त्यांचे अस्तित्व सूर्य, पृथ्वी, समुद्र, आकाश यांसारख्या महान अस्तित्वांतून माणसांच्या प्रत्ययास येते, अशी त्याची धारणा होती. निष्ठांमधले हे द्वंद्व त्याच्या मनात कायम होते परंतु आपण स्वीकारलेल्या धर्मकार्याविषयी त्याची जाणीव उत्कट होती. कवी होणे म्हणजे देव आणि माणूस ह्यांच्यात धर्मकार्याच्या रूपाने मध्यस्थ होणे, असे त्याला मनोमन वाटत होते.

 

१७९३ मध्ये जर्मन कवी, नाटककार आणि समीक्षकयोहान क्रिस्टोफ फ्रीड्रिख फोन शिलर (१७५९–१८०५) ह्याच्याशी झालेला परिचय हल्डरलीनला फलदायी ठरला. शिलरने त्याला शिक्षकाची नोकरी मिळवून दिली तसेच त्याच्या कविताही शिलरने आपल्या Neue Thaliaह्या नियतकालिकात वेळोवेळी प्रसिद्ध केल्या. त्याचप्रमाणे हल्डरलीनच्या ह्युपेरिओन ह्या कादंबरीचा काही भागही वाचकांपुढे आणला. ह्या कादंबरीत एका ग्रीक तरुणाची कथा आहे. तुर्कांच्या जोखडातून आपल्या मातृभूमीला मुक्त करण्यासाठी तो लढत असतो पण त्याच्या वाट्याला भ्रमनिरास येतो.

 

हल्डरलीनला फ्रँकफुर्टमध्ये एका बँकरच्या घरात शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. तेथे असताना त्या बँकरच्या सुसेट ह्या लावण्यसंपन्न पत्नीबरोबर त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले परंतु लवकरच तिच्या नवऱ्याच्या लक्षात ही गोष्ट आली आणि हल्डरलीनला फ्रँकफुर्ट सोडावे लागले.

 

शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या हल्डरलीन पार ढासळला होता. तरीही त्याचे लेखन मात्र चालूच होते. डेअर टोड डेस एम्पेडोकलेस (१८०२, इं. भा. द डेथ ऑफ एम्पेडोकलेस) ह्या शोकात्मिकेवरही तो काम करीत होता. १७९८ मध्ये फ्रँकफुर्टहून परतल्यानंतर तीव्र मानसिक अस्वस्थता अनुभवीत असतानाही १८०१ पर्यंत त्याची सर्जनशीलता तल्लखपणे काम करीत होती. १८०१ मध्ये तो शिक्षकाच्या नोकरीसाठी स्वित्झर्लंडला गेला पण तेथे त्याची निराशा झाली. शिलरच्या ओळखीने येना येथे ग्रीक साहित्याचा प्राध्यापक म्हणून नोकरी मिळवण्याचा त्याचा प्रयत्नही असफल झाला. पुन्हा त्याने शिक्षकाची नोकरी धरली ती फ्रान्समधील बोर्दो येथे तथापि तो जिच्यावर प्रेम करीत होता, ती सुसेट १८०२ मध्ये निधन पावली. हल्डरलीनने एकाएकी बोर्दो सोडले आणि पूर्ण विपन्नावस्थेत पायीच आपल्या न्यूर्टिंजन येथील घरी यावयास निघाला आणि छिन्नमानस स्थितीत (स्किझोफ्रेनिक) न्यूर्टिंजन येथे आला. घरी आल्यावर त्याला आपुलकीची वागणूक मिळाली. त्यामुळे तो त्या अवस्थेतून बाहेर पडला आहे, असे वाटत होते. १८०२–०६ पर्यंतच्या काळात त्याने–सर्व इं. शी.–‘सेलिब्रेशन ऑफ पीस’, ‘द ओन्ली वन’ आणि ‘पॅटमॉस’ सारख्या कविता लिहिल्या. ह्या कवितांतून तो वेडसर होण्याच्या मार्गावर असल्याचे जाणवते पण सर्जनाची त्याची धडपड चालूच होती. प्राचीन ग्रीक नाटककारसॉफोक्लीझ ह्याच्या अँटिगॉन आणि ईडिपस टिरॅनस ह्या नाटकांची त्याने भाषांतरे केली (१८०४) तथापि त्याला वेडाचे झटके येतच राहिले. ट्यूबिंजन येथील एका मनोरुग्णालयात त्याने काही काळ काढला. अखेरीस एका सुताराच्या घरात त्या सुताराच्या देखरेखीखाली त्याला ठेवण्यात आले. तेथेच (ट्यूबिंजन) तो मरण पावला.

 

आपल्या हयातीत दुर्लक्षिल्या गेलेल्या हल्डरलीनला विसाव्या शतकाच्या साहित्यसमीक्षकांकडून मोठी मान्यता मिळाली. आज जर्मनीच्या श्रेष्ठ भावकवींमध्ये त्याची गणना केली जाते. त्याच्या काव्यशैलीच्या अनन्यसाधारण अशा अभिव्यक्तिक्षमतेचा गौरव केला जातो. अभिजात ग्रीक काव्यप्रकार त्याने जर्मन साहित्यात आणले. प्रॉटेस्टंट ख्रिस्ती धर्मश्रद्धा आणि प्राचीन ग्रीकांची धर्मश्रद्धा ह्यांच्यात समन्वय साधण्याच्या प्रयत्नाने त्याचे मन व्यापून टाकले होते. एका उत्कट समर्पित भावनेने तो आपल्या सर्जनशीलतेकडे पाहत होता तथापि त्याच्या अतिसंवेदनशीलतेने त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले.

 

संदर्भ : 1. Peacock, Ronald, Holderlin, 1938.

           2. Salzberger, L. S. Holderlin, 1952.

           3. Stahl, E. L. Holderlins Symbolism, 1945.

          4. Stanfield, Agnes, Holderlin, 1944.

  

कुलकर्णी, अ. र.