लूटव्हिख, ओटो : (१२ फेब्रुवारी १८१३-२५ फेब्रुवारी १८६५). जर्मन साहित्यिक. बेरा नदीवरील आइसफेल्ट येथे जन्मला. त्याचा मूळ ओढा संगीताकडे होता. विख्यात संगीतकार मेंडेल्सझोन ह्याच्याकडे तो संगीत शिकला. तथापि पुढे तो लेखनाकडे वळला. त्याचे आरंभीचे लेखन स्वच्छंदतावादी वळणाचे असले, तरी पुढे तो वास्तववादाकडे वळला. डेअर एर्बफोयर्स्टर (इं. शी. द हिरेडिटरी फॉरेस्टर) ह्या त्याच्या नाट्यकृतीने त्याला चांगले यश मिळवून दिले. डी माक्काबेयर (१८५४, इं. शी माक्काबिअन्स) हे त्याचे आणखी एक उल्लेखनीय नाटक. त्याच्या नाट्यकृतींवर प्राचीन ग्रीक शोकात्मिकांचा आणि फ्रीड्रिख हेब्बेल ह्या जर्मन नाटककाराचा प्रभाव दिसून येतो. शाक्सपिआर स्टुडिएन (१८७१, इं.शी. शेक्सपिअर : ए स्टडी) ह्या शेक्सपिअरच्या नाट्यतंत्राची छाननी करणाऱ्या ग्रंथावर त्याने आपली शक्ती अधिक केंद्रित केल्यामुळे त्याचे नाट्यलेखन मागे पडले. आज लेखक म्हणून त्याची कीर्ती मुख्यतः अधिष्ठित आहे, ती त्याच्या नाट्यलेखनापेक्षा त्याच्या वास्तववादी कथांवर. ह्या कथांत डी हायटराय (१८५४) आणि त्स्विशेन हिमेल उण्ड एर्ड (१८५६, इं. भा. बिट्वीन हेवन अँड अर्थ, १९२८) ह्यांचा समावेश होतो. पहिल्या कथेत विनोद, भावनिर्भरता आणि बहुरंगीपणा आढळतो. घरे शाकारण्याचा धोक्याचा व्यवसाय करणाऱ्या दोन भावांची कहाणी बिट्वीन हेवन अँड अर्थ मध्ये सांगितली आहे.

ड्रेझ्डेन येथे तो निधन पावला.  

महाजन, सुनंदा