त्स्वाइख, आर्नोल्ट : (१० नोव्हेंबर १८८७–२६ नोव्हेंबर १९६८). जर्मन ज्यू कादंबरीकार. ग्रोस्झ–ग्‍लोगाऊ, सायलिशीआ येथे जन्म. डेअर श्ट्राइट उम डेन सेर्जाआंटेन ग्रिशा (१९२७, इं. भा. द केस ऑफ सार्जंट ग्रिशा , १९२७) ह्या विख्यात कादंबरीचा लेखक म्हणून तो मुख्यतः ओळखला जातो. ग्रिशा नावाच्या एका रशियन युद्धकैद्याच्या व्यक्तिरेखेतून आर्नोल्टने प्रशियन लष्करी नोकरशाहीच्या यंत्रणेवर विदारक प्रकाश टाकला आहे. पहिल्या महायुद्धानंतर युद्ध ह्या विषयावर जर्मन भाषेत लिहिल्या गेलेल्या श्रेष्ठ कादंबऱ्यांत वरील कादंबरीचा अंतर्भाव होतो. त्याच्या अन्य उल्लेखनीय कादंबऱ्यांत युंग फ्राऊ फोन १९१४ (१९३१, इं. शी. यंग वूमन ऑफ १९१४), डे व्ह्‌रींट केट हाइम (१९३२, इं. भा. डे व्ह्‌रींट गोज होम, १९३३), एर्झीहुंग व्होर व्हेर्दून (१९३५, इं. भा. एज्युकेशन बिफोर व्हेर्दूम, १९३६) ह्यांचा समावेश होतो.

नाझींनी आर्नोल्टचे जर्मन नागरिकत्व रद्द केले होते. त्यानंतर काही वर्षे (१९३३–४८) तो पॅलेस्टाइनमध्ये राहिला. १९४८ पासून पूर्व जर्मनीत त्याचे वास्तव्य होते. पूर्व बर्लिनमध्ये तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.