फ्रीड्रिख हेब्बेल

हेब्बेल, फ्रीड्रिख : (१८ मार्च १८१३–१३ डिसेंबर १८६३). जर्मन नाटककार व कवी. जन्म, त्यावेळी डॅनिश सत्तेखाली असलेल्या शेल्सविग होलस्टाइनमधील वेस्सेलब्यूरेन ह्या गावात. त्याचे वडील गरीब गवंडी होते. वडिलांच्या निधनानंतर (१८२७) एका स्थानिक अधिकाऱ्याकडे सात वर्षे त्याने कारकुनी केली. त्या अधिकाऱ्याच्या ग्रंथसंग्रहातील अनेक पुस्तके त्याने वाचली. त्या वाचनातून त्याला साहित्याची–विशेषतः कवितेची–आवड निर्माण झाली. त्याच्या कविता एका स्थानिक वार्तापत्रातून आणि हँबर्गच्या एका मासिकातून प्रसिद्ध होऊ लागल्या. ह्या मासिकाच्या संपादकाने त्याला विद्यापीठीय शिक्षण घेण्यासाठी हँबर्गला यावे, असे सुचविले. त्यानुसार तो तेथे गेला (१८३५). तेथे असताना तो दैनंदिनी लिहू लागला. त्याच्या दैनंदिनी, पत्रव्यवहार, संस्मरणिका हा त्याच्या जीवनातील लेखनकार्याचा एक महत्त्वाचा भाग ठरला. आज हे लेखन म्हणजे त्याची कलानिर्मिती आणि त्याच्या वाङ्मयीन प्रणाली त्यांच्या संबंधीच्या माहितीचा एक महत्त्वपूर्ण स्रोत ठरलेला आहे. पुढे हेब्बेलने हायड्लबर्ग विद्यापीठात कायद्याच्या अभ्यासासाठी प्रवेश घेतला पण वाङ्मयाच्या ओढीने त्याने ते शिक्षण सोडले. मात्र हेब्बेलचे कवितालेखन अखंड चालू होते; तथापि अनेक प्रयत्न करूनही त्याच्या कविता प्रसिद्ध होत नव्हत्या. त्यानंतर तो म्यूनिक विद्यापीठात तत्त्वज्ञान, इतिहास आणि साहित्य ह्या विषयांचा अभ्यास करण्यासाठी गेला. त्याचा हा काळ आर्थिक दृष्ट्या खडतर होता; तथापि ह्या काळात एलिस लेन्सिंग ह्या शिवणकाम करून अर्थार्जन करणाऱ्या स्त्रीने यांच्या आयुष्यात प्रवेश केला. ती दोघे एकत्र राहू लागली. तिचा आर्थिक आधारही त्याला मिळाला. पुढे तो हँबर्गला परतला आणि युडिथ (१८४०) ह्या आपल्या नाट्यकृतीवर काम करू लागला. बायबलमधल्या युडिथच्या सुप्रसिद्ध कथेवर ही नाट्यकृती आधारलेली आहे. हँबर्ग आणि बर्लिनमध्ये तिचे प्रयोग झाल्यानंतर हेब्बेलला मोठी कीर्ती प्राप्त झाली. १८४१ मध्ये गेनोव्हेव्हा हे नाटक त्याने पूर्ण केले; परंतु त्याला पैशाची विवंचना होतीच; तथापि डॅनिश राजाने त्याला पॅरिस आणि इटलीमध्ये एक एक वर्ष व्यतीत करण्यासाठी अनुदान दिले. पॅरिसमध्ये असताना मारिआ माग्डालेना (१८४४) ही आपली वास्तववादी शोकात्मिका त्याने लिहिली. कुटुंबाबद्दलच्या प्रेमापेक्षाही आपली सार्वजनिक अप्रतिष्ठा होऊ नये, ह्यासाठी दक्ष राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय माणसाची ही शोकात्मिका आहे. १८४५ मध्ये अभिनेत्री क्रिस्टाइन एंगहाउस हिच्याशी त्याची भेट झाली. १८४६ मध्ये त्या दोघांनी विवाह केला. वैवाहिक जीवनात त्याला शांतता मिळाली; परंतु संधिवाताच्या दुखण्याने तो दुर्बल झाला होता. इटलीतून परतल्यानंतर तो व्हिएन्ना येथे स्थायिक झाला होता. अनेक सन्मान त्याला मिळाले. १८६० मध्ये बव्हेरियाच्या राजाने डी नीबेलुंगेन (१८६१) ह्या नाट्यकृतीसाठी ऑर्डर ऑफ मॅक्समिलन हा सन्मान बहाल केला. १८६२ मध्ये हे नाटक प्रकाशित झाले. त्यानंतर वर्षभरानेच तो व्हिएन्ना येथे निधन पावला. त्याच्या निधनाच्या अल्पकाळ आधी प्रतिष्ठेचा शिलर पुरस्कार प्रशियाच्या राजाकडून त्याला प्रदान करण्यात आला होता. 

हेब्बेलची ग्रंथसंपदा विपुल असून उपर्युक्त नाटकांखेरीज हेब्बेल यांची आणखी काही नाटके अशी : हेरोडेस उंड मारिआम्न (१८५०, इं. शी. ‘हेरोड अँड मारिआम्न’), गायगेस उंड झाइन रिंग (१८५६, इं. शी. ‘गायगेस अँड हिज रिंग’), आग्नेस बेर्नाडअर (१८५२) अशा काही नाटकांचा समावेश होतो. हेरोडेस… मध्ये संशयी, पाशवी वृत्तीचा पुरुष आणि स्वाभिमानी स्त्री ह्यांच्यातील संघर्ष ह्या नाटकात दाखविला आहे. गायगेस… मध्ये र्‍होडाप या राणीचे चित्रण आहे. आपल्या स्त्रीत्वाची प्रतिष्ठा जपणाऱ्या या निष्पाप स्त्रीचे हेब्बेलने जे व्यक्तिरेखन केले आहे, त्यावरून हेब्बेलची स्त्री-स्वभावाची जाणकारी किती खोल होती, त्याचा प्रत्यय येतो. आग्नेस… ही पंधराव्या शतकातील बव्हेरियामधील एक ऐतिहासिक शोकात्मिका. अकालीच एका तरुण ड्यूकशी विवाह करणाऱ्या आग्नेसला राजकीय कारणासाठी मृत्यूदंड ठोठावला जातो आणि ती आज्ञा त्या तरुण ड्यूकच्या पित्यालाच काढावी लागते. 

अभिजात नाटक आणि आधुनिक नाटक ह्यांच्या मधली नाटके असे हेब्बेलच्या नाटकांबद्दल म्हणता येईल. स्वच्छंदतावाद्यांची काही वैशिष्ट्येही त्याच्या नाटकांत आढळतात. त्याच्या नाटकांत निसर्गवादाची आणि नियतीवादाचीही बीजे आहेत. मानसशास्त्रीय वास्तववादाचा प्रत्यय त्याच्या नाटकांतून येतो. तोइब्सेनच्या अलीकडचा असला, तरी काही समीक्षक त्याला आधुनिक समस्या-नाट्याच्या निर्मितीचे श्रेय देतात.हेगेलच्या इतिहासाच्या तत्त्वज्ञानाने त्याची नाटकाची संकल्पना प्रभावित झाली होती, असेही काही समीक्षकांनी दाखवून दिले आहे. 

त्याच्या गेडिश्ट (१८४२) ह्या काव्य संग्रहात त्याच्यातला थोर आणि समर्थ भावकवी प्रत्ययास येतो. 

गुडेकर, विजया म.