स्वीडिश भाषा : स्वीडनची राष्ट्रीय भाषा. ती ⇨ इंडोयूरोपियन भाषाकुटुंबातील व उत्तर जर्मानिक भाषासमूहातील एक प्रमुख भाषा होय. स्वीडनमध्ये आणि फिनलंडच्या अनेक भागांत, फिनिश भाषेच्या बरोबरीने एक राष्ट्रभाषा म्हणून ती बोलली जाते. दुसऱ्या महायुद्धापर्यंत ती इस्टोनिया व लॅटव्हियातील काही प्रदेशांत बोलली जात असे. नॉर्वन आणि डॅनिश भाषांबरोबर या भाषेची परस्परबोधकता उत्तम आहे. किंबहुना भाषावैज्ञानिक परिप्रेक्षातून डॅनिश-नॉर्वन-स्वीडिश यांचे वर्णन स्कँडिनेव्हियनचे (उत्तर जर्मानिक) अखंड बोलीक्षेत्र म्हणून करता येईल. इंडो-यूरोपियन भाषाकुलातील या भाषेचा ऐतिहासिक प्रवास हा इंडो-यूरोपियन-जर्मानिक-उत्तर जर्मानिक-पूर्व स्कँडिनेव्हियन आणि स्वीडिशया मार्गाने मांडता येतो. ही भाषा स्वीडनची राजभाषा असून तीअंदाजे आठ ते नऊ दशलक्ष भाषकांकडून मातृभाषा म्हणून बोललीजाते. फिनलंडमध्ये साधारणतः ३,००,००० भाषक प्रथम भाषा म्हणून ही भाषा बोलतात. स्कँडिनेव्हियन काळापासून (६००—१०५०) ते १२२५ पर्यंतचा स्वीडिश भाषेचा इतिहास मुख्यत्वे ⇨ रूनिक लिपीतील कोरीव लेखांद्वारे (सु. २,४०० लेख) ज्ञात होतो. या लेखांपैकी बहुसंख्य लेख अपलँड (पूर्व स्वीडन) मध्ये आढळले. यांतील लक्षणीय असा, रॉकस्टोन (लेख) ऑस्टर गॉटलंडमध्ये सापडला असून तो नवव्या शतकातील आहे. या रूनिक लेखाव्यतिरिक्त अन्य स्वीडिश साहित्य उपलब्ध नाही. प्रमाण स्वीडिशचा उगम सेंट्रल स्वीडिश बोलींमधून (स्वीडनच्या मध्य-भागात बोलल्या जाणाऱ्या बोलींमधून) एकोणिसाव्या शतकाच्या आसपास झाला. विसाव्या शतकाच्या प्रारंभी ती प्रमाणभाषा म्हणून प्रस्थापित झाली. या भाषेच्या काही बोली अजूनही स्वीडनमधील ग्रामीण भागात बोलल्या जातात पण त्या प्रमाण स्वीडिशबरोबर बोधक्षम नाहीत. या ऐतिहासिक प्रवासाचे ढोबळमानाने पुढीलप्रमाणे वर्णन करता येईल. इ. स. च्या नवव्या शतकात प्राचीन नॉर्समधून दोन शाखा निघाल्या : प्राचीन पश्चिम नॉर्स (नॉर्वे आणि आइसलँड) आणि प्राचीन पूर्व नॉर्स (स्वीडन आणि डेन्मार्क ). बाराव्या शतकात डेन्मार्क आणि स्वीडिशमध्ये बोलल्या जाणाऱ्याबोली अलग होऊ लागल्या. तेराव्या शतकाच्या प्रारंभी प्राचीन डॅनिशआणि प्राचीन स्वीडिश अशा दोन भाषा अस्तित्वात आल्या. मध्ययुगातया सर्व भाषांवर मध्ययुगीन निम्नस्तरीय जर्मन भाषेचा प्रभाव होता. तेराव्या शतकापर्यंत या भाषा प्राचीन नॉर्समधील रूनिक लिपीमध्ये लिहिल्याजात असत. त्यानंतर स्वीडिश भाषेतील प्राचीनतम वाङ्मय म्हणून Vastgotalagan (इं. शी. ‘लॉ ऑफ वेस्ट गॉटलंड’) या विधिसंहितेचा उल्लेख करावा लागेल. त्यानंतर चौदाव्या-पंधराव्या शतकांतील मध्ययुगीन स्वीडिश भाषेतील अज्ञातकर्तृक बॅले हे रोमँटिक वाङ्मय प्रसिद्ध आहे. पुष्कळसे भाषावैज्ञानिक आधुनिक स्वीडिशचा उगम १५५६ मध्ये झाला असे मानतात कारण त्या वेळी बायबलच्या ‘नव्या करारा’चा (न्यू टेस्टामंट) अनुवाद प्रथम मुद्रित झाला होता. गस्टाव्ह व्हासा या राज्यकर्त्याने बायबलचा स्वीडिश भाषेत अनुवाद करवून घेतला होता. तिसरा गस्टाव्ह व्हासा याने १७८६ मध्ये स्वीडिश ॲकॅडेमीची स्थापना केली. आजही ही संस्था स्वीडिश भाषेची शुद्धता राखण्याकरिता तत्पर असून शब्दकोशांची निर्मिती करते. तसेच जागतिक वाङ्मयातील सर्वश्रेष्ठ साहित्यकृतीला नोबेल पुरस्कारही वितरित करते. १९६० च्या आसपास तत्कालीन सामाजिक सुधारणांच्या अंगाने या भाषेत एक रोचक घडामोड घडली. व्यक्तिविशेषांना संबोधताना औपचारिक आणि अनौपचारिक असा भेद केला जात असे. त्यामुळे समाजातील सामान्य किंवा प्रतिष्ठित लोकांना औपचारिक बिरुदाने किंवा आडनावाने संबोधले जात होते पण १९६० मध्ये du-reformen (you reforms) ही चळवळ उदयास आली आणि पूर्वी औपचारिक संबोधनांना मिळणारे अवाजवी महत्त्व हद्दपार झाले. Du (you) हा कमी औपचारिक शब्द प्रमाण म्हणून स्वीकारला गेला.

ध्वनिव्यवस्था : स्वीडिश भाषेतील ध्वनिव्यवस्था ही बऱ्याचअंशी प्रमाण भाषेसारखी आहे. स्वीडिश बोलींमध्ये साधारणतः १७ किंवा १८ स्वरस्वनीम असतात. ९ दीर्घ आणि ९ ऱ्हस्व. इंग्रजीसह अन्य बऱ्याचशा जर्मानिक भाषांप्रमाणेच या ऱ्हस्व-दीर्घ स्वरांच्या जोड्या आहेत. ब, ए, इ, ओ, उ या जोड्या स्वरांच्या प्रत्येकी दोन जोड्या आहेत. एक पश्चजिहवीय स्वरस्वनीम (बॅक व्हावेल) आहे. जे <å> असे लिहिले जाते आणि [ο] असे उच्चारले जाते. त्याशिवाय अन्य तीन स्वरांच्या ऱ्हस्व-दीर्घ जोड्या आहेत. या भाषेत द्विस्वर नाहीत. १८ व्यंजनस्वनीम आहेत. प, ब (ओष्ठ्य) त, द (दंत्य) क, ग (तालुच्छदीय) ध्वनी आहेत. पैकी प, त, क हे स्पर्शध्वनी आहेत. ब, द, ग हे स्पर्श आणि संनिकटी ध्वनींच्या मधले ध्वनी आहेत. ल (दंत्य, संनिकटी), तर ह (कंठद्वारीय, संनिकटी) व्यंजन आहे. घर्षक ध्वनींमध्ये फ (दंत्योष्ठ्य), स (दंत्य ), र (दंतमूलीय), च (तालव्य) अशी साधारण व्यवस्था आहे. स्वीडिशमध्ये अघोष जिव्हापृष्ठीय तालव्य आणि तालुच्छदीय ध्वनी आहेत पण त्यांचे उच्चारण हे बोली आणि भाषकाची सामाजिक प्रतिष्ठा यांनुसार बदलते. त्यांशिवाय म (ओष्ठ्य नासिक्य), न (दंत्य नासिक्य) आणि तालुच्छदीय नासिक्य अशी तीन व्यंजने आहेत. बलयुक्त अक्षरांमध्ये दोन सूर असतात. या दोन सुरांमुळे स्वीडिश भाषेला तिचे विशिष्ट ध्वनी मिळतात. पराखंडकीय स्वनगुणांच्या भेदावरून बोलींमधला फरक ओळखला जातो.

शब्दसंग्रहआणिपदिमविचार : या भाषेतील शब्दसंग्रह हा मुख्यत्वे जर्मनसारखा आहे. जर्मन, इंग्लिश आणि फ्रेंच भाषेतून आलेले पुष्कळ शब्द स्वीडिशमध्ये आहेत. उदा., जर्मन शब्द – mus (mouse), kung (king) इत्यादी. अठराव्या शतकात फ्रेंच भाषेतील पुष्कळ शब्दांचा शिरकाव स्वीडिशमध्ये झाला. अंतिम अक्षरावर येणाऱ्या आघातामुळेफ्रेंच शब्द ओळखता येतात. उदा., niva (फ्रेंच-Niveau-level) किंवा affar (shop-affair). त्याशिवाय धार्मिक आणि शास्त्रीय शब्दसंग्रहांचा पुष्कळसा भाग हा लॅटिन आणि ग्रीक मुळाचा आहे.

अन्य जर्मानिक भाषांप्रमाणेच समासप्रक्रियेने नवीन शब्द घडवता येतात. उदा., Nagellackborttagningsmedel (Nail-polish-remover). समासाचे लिंग हे समासातील शेवटच्या रूपिमावरून ठरवले जाते. त्या शब्दांवरून भिन्नप्रक्रियांव्दारे साधितरूपे करता येतात. उदा., नामांचे क्रियापदात रूपांतर करताना -a हा प्रत्यय नामाला लावला जातो. Bill (Car) and bil-a म्हणजे (travel by car).

वाक्यविन्यास : स्वीडिश भाषा ही क्रियापदद्वितीय (व्हीटू) भाषा आहे. वाक्यामध्ये अभिहित क्रियापदापूर्वी (काळ, पुरुष, वचन यांनी युक्त असे क्रियापद) कर्ता, कर्म किंवा क्रियाविशेषण यांपैकी काहीही एकचयेऊ शकते. क्रियापदाचे स्थान हे वाक्यातील पदक्रमात दुसरेच असते, म्हणून हिला आपण क्रियापदद्वितीय भाषा म्हणू शकतो. पदानुक्रम कर्ता, कर्म, क्रियापद असा आहे पण काही पदांवर किंवा पदबंधावर आघात देण्यासाठी त्यात बदल केला जाऊ शकतो. पदविचार बराचसा इंग्लिश-प्रमाणे आहे. विभक्तिप्रत्ययांचा वापर अत्यंत मऱ्यादित प्रकारचा आहे. प्रथमा आणि षष्ठी या दोन विभक्तींचा वापर केला जातो. द्वितीया आणि चतुर्थी या विभक्ती प्रथमा विभक्तीतच समाविष्ट झाल्या आहेत. स्त्रीलिंग आणि पुल्लिंग असा वेगळा प्रकार अस्तित्वात नाही त्यामुळे नपुंसक आणि तद्भिन्न असे दोनच प्रकार अस्तित्वात आहेत. नामांना जोडला जाणारा शब्दोत्तर प्रत्यय हे स्वीडिशसहित सर्वच नॉर्डिक भाषांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. सामान्यलिंगाची रूपे -en हा शब्दोत्तर प्रत्यय किंवा नपुंसकलिंगी शब्दांची रूपे -ett हा शब्दोत्तर प्रत्यय लावून होतात.

विशेषणांचा वापर करताना en gron stol (A green chair), ett grout hus (A green house) अशी रूपे केली जातात.

संदर्भ : 1. Beite, A. M. and others, Basic Swedish Grammer, 1963.

2. Mc Clean, R. J. Teach Yourself Swedish : A Grammer of the Modern Language, 1950.

बिदनूर, जान्हवी