टॉलस्टॉय, लीओ : (९ सप्टेंबर १८२८–२० नोव्हेंबर १९१०). सुप्रसिद्ध रशियन लेखक, तत्त्वज्ञ, प्रचारक आणि सुधारक. त्याचा जन्म तूला प्रांतातील यास्नया पल्याना या जहागिरीच्या ठिकाणी एका श्रीमंत सरदार घराण्यात झाला. कझॅन विद्यापीठात १८४४ ते १८४७ पर्यंत शिक्षण झाल्यावर त्याने कॉकेशसमध्ये सैन्यात नोकरी केली. क्रिमियन युद्धात सिव्हॅस्तपोलच्या लढाईत त्याने भाग घेतला. त्यानंतर तो मुख्यतः मॉस्को व पीटर्झबर्ग येथील आपल्या घराण्याच्या जहागिरीच्या ठिकाणीच राहिला. १८६२ मध्ये त्याचा सोन्या (सोफ्या) ह्या मध्यम वर्गीय मुलीशी विवाह झाला होता. विवाहोत्तर पहिली १५ वर्षे सुखाची गेली. ह्या काळात त्याला १३ अपत्येही झाली. तथापि त्याने स्वीकारलेल्या विशिष्ट धार्मिक–नैतिक जीवननिष्ठेमुळे त्याच्या कौटुंबिक जीवनात ताण निर्माण झाले. १८५२ मध्ये प्रकाशित झालेली टॉलस्टॉयची पहिली लेखनकृती द्येत्स्त्व (इं. शी. चाइल्डहूड) ही त्याच्या आत्मचरित्रात्मक ग्रंथत्रयीचा पहिला भाग होती ह्या कृतीतून तरुण टॉलस्टॉयच्या बुद्धीची व विचारांची प्रगल्भता लगेच नजरेस येते.

लीओ टॉलस्टॉय

आत्मचरित्राचे दुसरे दोन भाग, ओत्रोचिस्त्व (इं. शी. बॉयहूड) आणि यूनत्स् (इं. शी. यूथ), अनुक्रमे १८५४ व १८५६ मध्ये प्रसिद्ध झाले. या त्रयीत, त्याचप्रमाणे उत्रो पमेश्शिका (इं. शी. मॉर्निंग ऑफ अ लँडलॉर्ड) आदी आपल्या आधीच्या लेखनकृतींतून टॉलस्टॉयने सामान्य माणसाचे जीवन आणि सरदार-जमीनदार आदींशी त्याचा संघर्ष यांचे चित्रण करण्यावरच आपले लक्ष केंद्रित केले आहे. क्रिमियन युद्धात याने प्रत्यक्ष भाग घेतल्यामुळे आपल्या सिवास्तोदील्‌स्कीये रस्काझी (इं. शी. सिव्हॅस्तपोल स्टोरीज) मध्ये सदर युद्धाचे यथार्थ चित्र रेखाटण्यास त्यास मदत झाली. युद्धासंबंधीचा लेखी पुरावा या दृष्टीने या कथांचे महत्त्व आहेच पण त्याशिवाय या कथांतून सदर युद्धातील वीरांच्या मनोव्यापारांचे ठळक विश्लेषणही केलेले दिसते. हाच प्रकार १८६३ साली तरुण टॉलस्टॉयने लिहिलेल्या कझाकी (इं. शी. कोसॅक्स) या महत्त्वाच्या कादंबरिकेबाबतही प्रत्ययास येतो. शिक्षण आणि शिक्षणशास्त्र यांवर तरुण टॉलस्टॉयची निश्चित मते होती. आपले विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी यास्नया पल्याना येथे १८४९ मध्ये त्याने शेतकऱ्‍यांच्या मुलांसाठी एक शाळा सुरू केली आणि यास्नया पल्याना याच नावाच्या नियतकालिकात त्याने १८६२–६३ या काळात अनेक लेख लिहिले.

१८६३ ते १८६९ ह्या काळात टॉलस्टॉयने आपली राष्ट्रीय महत्त्वाची प्रदीर्घ कादंबरी व्हय्‌ना इ मीर् (इं. शी. वॉर ॲड पीस) ही लिहिली. ह्या कादंबरीत १८०५ ते १८२५ चा प्रदीर्घ कालखंड घेतला असला आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्व कालपटावरील रशियन माणसाचे चित्र त्यात असले, तरी नेपोलियनशी झालेले युद्ध ही मध्यवर्ती घटना म्हणून त्यात चित्रित झाली आहे. ह्या कादंबरीत तत्कालीन समाजाच्या उच्च स्तरावरील लोकांची अहंमन्यता, स्वार्थ व नीचपणा यांच्या विरोधात देशाला विजय मिळवून देणाऱ्‍या सामान्य जनतेचा जाज्वल्य देशाभिमान उठून दिसतो. तत्कालीन रशियन समाजाच्या विविध स्तरांतील लोकांच्या आध्यात्मिक जीवनाचे ठळक चित्रण हे ह्या कादंबरीचे लक्षणीय वैशिष्ट्य म्हणावे लागेल. टॉलस्टॉयने हे दाखविले आहे की, कादंबरीतील महत्त्वाचे व्यक्तिविशेष आन्द्रेय् बल्कोन्स्की, नताशा रस्तोवा, पियर बिझूखफ् यांना जनसामान्यांत ते जेव्हा मिसळून जातात तेव्हाच समाधान व मुक्ती लाभते. या महान कादंबरीतील टॉलस्टॉयचा मुख्य संदेश हाच आहे आणि यातच राष्ट्राचे भविष्य घडविण्यातील आणि ऐतिहासिक घटनांना वळण देण्यातील व्यक्तीच्या कर्तृत्वाबद्दलचे लेखकाचे तात्त्विक विचारही साठवलेले आहेत. टॉलस्टॉयचा असा विश्वास होता, की असल्या गोष्टींत व्यक्तींना काही महत्त्व नसते त्या अगदी नेपोलियन आणि कुतूझफ्‌सारख्या सेनानींइतक्या महत्त्वाच्या व शक्तिमान असल्या तरीही.

इतिहासाकडून टॉलस्टॉय ॲना करेनिना (१८७५–७७) या आपल्या पुढील कादंबरीत समकालीन समाजाकडे वळलेला दिसतो. या कादंबरीत सरदार घराण्यात जन्मलेल्या परंतु महत्त्वाकांक्षा आणि वैयक्तिक अहंभावाने पछाडलेल्या उच्चभ्रू समाजाच्या ढोंगी नीतिमत्तेविरुद्ध लढा देणाऱ्‍या एक रशियन स्त्रीची करुण कहाणी आहे. सामाजिक अंतर्विरोधांवर अचूक बोट ठेवून टॉलस्टॉयने हे दाखवून दिले आहे, की ॲनासारख्या संवेदनशील, उत्साही व चैतन्यशील जीवाचा तत्कालीन रशियन समाजातील परिस्थिती व भेदक वास्तवता कसा कोंडमारा करून टाकते. ॲनाचे आत्यंतिक दुःख आणि करुण शेवट यांमागचे प्रमुख कारण हेच होते. एक माता व प्रणयी स्त्री या नात्यांनी तिच्या मनात होणाऱ्‍या झगड्याचे टॉलस्टॉयचे वर्णन अत्यंत हेलावून सोडणारे आहे. लेविन् हे या कादंबरीतील दुसरे महत्त्वाचे पात्र. त्याच्या तोंडून केवळ जमीनदार आणि शेतकरी यांच्या परस्परसंबंधांबाबत स्वतःच्या विचारांशी टॉलस्टॉयने चर्चा केली आहे. एवढेच नव्हे, तर शारीरिक श्रमानेच जीवनातील खरा आनंद मिळतो, हा आपला आवडता विचारही त्याने त्यात वदविला आहे.

वस्क्रिसेनिये (इं. शी. रेसरेक्शन) ही टॉलस्टॉयची तिसरी अतिशय महत्त्वाची कादंबरी १८९९ मध्ये प्रकाशात आली. तीत वैचारिक गोंधळ बराच असला, तरी ती टॉलस्टॉयच्या वास्तव चित्रणाचा आणखी एक अप्रतिम नमुना म्हणून दाखविता येईल. निष्ठुर आणि घृणास्पद अशा सामाजिक व नैतिक न्यायपद्धतीशी संबद्ध अशा मूलग्रामी प्रश्नांचा या कादंबरीत ऊहापोह आहे. काउंट नेख्‌ल्यूदव हा सरदार व कात्यूशा नावाची गरीब मुलगी–जिला प्रथम तो भ्रष्ट करतो व नंतर आपल्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून सायबीरियासारख्या प्रदेशात तिच्या मागून जातो–या दोघांच्या जीवनाचे चित्रण करण्यात लेखकाने तत्कालीन परपुष्ट जमीनदारकी, सरदारकी आदींची वैगुण्ये वेशीवर टांगली आहेत.


टॉलस्टॉयच्या अन्य महत्त्वाच्या लेखनकृतींत ष्मेर्त इवाना इलिचा (१८८०, इं. शी. द डेथ ऑफ इवान इलिच), क्रेश्तसरोवा सनाता (१८८७–८९, इं. शी. द क्राइट्सर सोनाता), हाजी मुरात (१९०४), पोस्लि बाला (१९०३, इं. शी. आफ्टर द बॉल) व अन्य कृतींचा अंतर्भाव होतो. टॉलस्टॉय हा उत्तम नाटककारही होता. १८८६ मध्ये रशियन खेड्याबद्दल त्याने व्लास्त तमी (इं. शी. द पॉवर ऑफ डार्कनेस) या नावाचे एक उत्कृष्ट नाटक लिहिले. प्लदी प्रस्विश्शेनिया (१८९०, इं. शी. द फ्रूट्स ऑफ एन्‌लाय्‌टन्‌मेंट) या कृतीत शेतकऱ्याची व्यवहारी बुद्धी आणि परपुष्ट जीवन जगणाऱ्या जमीनदाराबरोबर काम करतानाही त्याची चित्तवृत्ती यांचा अंतर्विरोध दर्शविला आहे. १९०० मध्ये टॉलस्टॉयने झिवोय् त्रूप् (इं. शी. द लिव्हिंग काँर्प्स) या नावाने एक मनोरंजक नाटक लिहिले. त्यात न्यायपद्धतीतील ढोंगबाजी व निष्ठुरता वेशीवर टांगली आहे.

टॉलस्टॉय हा एक मोठा तत्त्वज्ञ होता. १८८० ते १८८९ या दशकात त्याने अनेक लेख व कथा लिहिल्या. त्यांतून त्याने या कल्पनेचा प्रसार केला की, पापाचा मुकाबला ताकदीच्या जोरावर केला जाऊ नये. त्याची शांततावादी ध्येये गांधीजींच्या शांततामय असहकार आणि सत्याग्रह या कल्पनांशी मिळतीजुळती आहेत. या शतकाच्या सुरुवातीच्या काळात भारत व रशिया या देशांच्या या थोर विचारवंतांत काही पत्रव्यवहारही झाला होता. रशियातील अधिकृत धर्मपीठाशी टॉलस्टॉयचा झगडा हा त्याच्या विशिष्ट धर्मकल्पनांतूनच उद्‌भवला. जुन्या पोथीनिष्ट धर्मातील कडकपणाला आणि अन्य वैगुण्यांना त्याचा विरोध होता. १९०१ मध्ये त्याला धर्माबाहेर टाकण्यात आले व तो पाखंडी ठरला. प्रत्यक्षात तर असे म्हटले जात असे की, रशियात दोन झार आहेत एक पीटर्झबर्गमध्ये आणि दुसरा यास्नया पल्यानमध्ये. यावरून आपल्या समकालीनांत टॉलस्टॉयबद्दल किती आदर व कौतुक होते हे स्पष्ट व्हावे.

टॉलस्टॉयची कला-साहित्यविषयक भूमिका ही त्याच्या धार्मिक–नैतिक भूमिकेचीच दुसरी बाजू म्हणता येईल. धार्मिक कला तो सर्वश्रेष्ठ मानतो. ईश्वरप्रेम आणि मानवप्रेम ह्यांतून ती प्रेरित झालेली असते, अशी त्याची धारणा होती. त्याच्या ह्या भूमिकेचे ठाशीव प्रतिपादन त्याच्या ‘व्हॉट इज आर्ट?’(१८९८) ह्या इंग्रजी शीर्षकार्थाच्या प्रबंधात आले आहे. त्याचा मराठी अनुवाद साने गुरुजींनी कला म्हणजे काय? (१९४३) ह्या नावाने केलेला आहे.

टॉलस्टॉयच्या लेखनाकृती म्हणजे जागतिक वाङ्‌मयातील वास्तववादी चित्रणाच्या प्रगतीचा कळस आहेत. जीवनाचे खरे सारसर्वस्व त्यात चित्रित केलेले दिसते. तो कादंबरीलेखनतंत्राचा अप्रतिम किमयागार आहे. टॉलस्टॉयच्या कलेने रशियन वाङ्‌मयीन इतिहासात एक संपूर्ण युग निर्माण केले आहे. लेनिन टॉलस्टॉयला ‘रशियन क्रांतीचा आरसा’ असे म्हणत असे ते बहुधा यामुळे असावे. १९०५ ते १९१७ मध्ये रशियात ज्या घटना घडल्या त्यामागची सामाजिक कारणे समजण्यास टॉलस्टॉयच्या लेखनाकृतींची आपल्याला मदत होते. टॉलस्टॉयच्या ललितकृतींनी रशियन वाङ्‌मयाची कीर्ती अनेक पटींनी वाढवली आहे. एकोणिसाव्या शतकातील जगातील प्रत्येक महान लेखकावर टॉलस्टॉयच्या बुद्धिमत्तेचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम झाला आहे. रवींद्रनाथ टागोर, प्रेमचंद आदी महान भारतीय लेखकांच्या बाबतींतही हे खरे आहे. रशिया व रशियाबाहेरील नंतरच्या सर्व वास्तववादी लेखकांना टॉलस्टॉयची शिकवण आणि मार्गदर्शन मिळाले आहे. प्रत्येक रशियनास अभिमान वाटावा असा हा टॉलस्टॉयचा वाङ्‌मयीन वारसा आहे. अद्यापही प्रत्येक दिवशी हजारो रशियन व परदेशी पाहुणे यास्नया पल्यानाला भेट देतात आणि या थोर लेखक-तत्त्वज्ञ-संताच्या स्मृतीस अभिवादन करतात. १० नोव्हेंबर १९१० रोजी टॉलस्टॉय आपल्या जहागिरीचा गुपचुपपणे त्याग करून निघून गेला. त्यामागे विसंवादी वैवाहिक जिण्याबद्दलचे तीव्र वैफल्य होते. त्याच अवस्थेत आता लीओ टॉलस्टॉय नाव पडलेल्या अस्तपोक या रेल्वे स्थानकावर अचानक आलेल्या आजारातच त्याचा अंत झाला.

संदर्भ :

1. Derrick, Leon, Tolstoy, His Life and Works, London, 1944.

2. Dmitri, S. Tolstoy as Man and Artist, New York, 1902.

3. Dole, N. H. The Life of Lyof N. Tolstoi, New York, 1911.

4. Larvin, Janko, Tolstoy : A Psychocritical Study, London, 1924.

5. Philipson, Morris, The Count Who Wished He Were a Peasant, New York, 1967.

6. Rolland, Romain, The Life of Tolstoy, New York, 1911.

7. Tolstaia, Aleksandra, The Tragedy of Tolstoy, New Haven, 1933.

८. देवस्थळे, सुमति, टॉलस्टॉय – एक माणूस, पुणे, १९७४.

पांडे, म. प. (इं.) राजाध्यक्ष, द. य. (म.)