शॉलखॉव्ह, म्यिखईल :(२४ मे १९०५– २१ फेब्रुवारी १९८४). विख्यात रशियन कथा-कादंबरीकार. म्यिखईल शॉलखॉव्हजन्म रशियातील डॉन कॉसॅक प्रदेशातील व्हेशेन्‌स्काया ह्या गावी. रशियातील यादवी युद्धामुळे त्याचे शिक्षण खंडित होऊन त्याला अनेक प्रकारच्या नोकऱ्या कराव्या लागल्या. काही काळ मॉस्कोत असताना तरुण लेखकांच्या एका गटातही तो सहभागी झाला. १९२४ साली मारिआ पेत्रोव्ह्‌ना ग्रेमोस्लाव्ह्‌स्काया हिच्याशी त्याचा विवाह झाला. १९२६ च्या अखेरीअखेरीस तो आपल्या गावी येऊन राहिला.

टेल्स ऑफ द डॉन (इं. भा. १९६१) हा त्याचा पहिला कथासंग्रह (१९२५). रशियातील यादवी युद्धाच्या पार्श्वभूमीवरील या कथांतून कॉसॅकमधील प्रदेशविशिष्ट जीवनाचे दर्शन घडते. त्यांतील क्रांतिकारक व प्रतिक्रांतिकारक यांच्या चित्रणांतही कलात्मक ताटस्थ्य जाणवते. तीखी दोन (४ खंड, १९२८–४० इं. भा. २ खंड अँड क्वाएट फ्लोज द डॉन, १९३४ आणि द डॉन फ्लोज होम टू द सी, १९४०) ह्या त्याच्या प्रसिद्ध कादंबरीचा लेखनकाल बारा वर्षांचा आहे. पोद्‌न्याताया त्सेलिनी ही कादंबरी तो २८ वर्षे लिहीत होता (१९३२–६०). ह्या कादंबरीचे इंग्रजी भाषांतर दोन भागांत प्रसिद्ध झाले : व्हर्जिन सॉइल अप्‌टर्न्‌ड ( अमेरिकेत सीड्‌स ऑफ टुमारो ह्या नावाने प्रसिद्ध)–१९३५ आणि हार्व्हेस्ट ऑन द डॉन, १९६०. दे फॉट फॉर देअर कंट्री (१९४२ इं. भा. १९५९) ही त्याची आणखी एक उल्लेखनीय कादंबरी.

शॉलखॉव्हच्या अँड क्वाएट फ्लोज द डॉन ह्या महाकाव्यसदृश कादंबरीत रशियन राज्यक्रांती आणि नंतरचे यादवी युद्ध यांचे डॉन कॉसॅक प्रदेशातील जनजीवनावर झालेले परिणाम प्रभावीपणे चित्रित केलेले आहेत. या कादंबरीला १९१२ ते १९२२ अशा प्रदीर्घ कालखंडाची पार्श्वभूमी आहे.  आपल्या स्वातंत्र्यासाठी डॉन कॉसॅक प्रदेशातील लोकांनी बोल्शेव्हिकांशी केलेला संग्राम आणि त्यात त्यांचा झालेला पराभव, ह्यांचे दर्शन शॉलखॉव्हने समतोलपणाने घडविलेले आहे. युद्धावर लिहिल्या गेलेल्या, जगातील सर्वोत्कृष्ट कादंबऱ्यांत या कादंबरीची गणना केली जाते. सोव्हिएट रशियातील सामाजिक वास्तववादाच्या वाङ्‌मयीन तत्त्वज्ञानाची निदर्शक म्हणून ही कादंबरी गौरविली गेली असली, तरी सोव्हिएट सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेशी ती सुसंगत राहावी म्हणून शॉलखॉव्हला तिच्यावर संस्कार करणे भाग पडले होते.

व्हर्जिनसॉइल अप्‌टर्न्‌डमध्ये सामुदायिक शेतीच्या धोरणामुळे कॉसॅकांच्या जीवनात निर्माण झालेल्या समस्या दाखविल्या आहेत. ह्या कादंबरीच्या संहितेतही काही बदल लेखकाने केले. दुसऱ्या महायुद्धातील रशियावरील जर्मन आक्रमण हा दे फॉट फॉर देअर कंट्री ह्या कादंबरीचा विषय.

शॉलखॉव्हच्या कादंबऱ्या एकोणिसाव्या शतकातील वास्तववादाशी नाते राखून आहेत. १९६५ सालचे साहित्याचे नोबेल पारितोषिक त्याला देण्यात आले. रशियन जनतेच्या जीवनातील एका ऐतिहासिक पर्वाचे चित्रण कलात्मक सामर्थ्याने आणि प्रामाणिकपणे केल्याबद्दल हा आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचा पुरस्कार त्याला देण्यात आल्याचे त्या वेळी जाहीर करण्यात आले होते.

व्हेशेन्‌स्काया येथे तो निधन पावला.

संदर्भ : 1. Bearne, C. G. Sholokov, Edinburgh, 1969.

           2. Brown, E. J. Rssian Lterature Since the Rvolution, London, 1969.

           3. Stewart, D. H. Sholohov in Soviet Lterary Criticism, New York, 1953.

कुलकर्णी, अ. र.