अलिक्सांद्र पुश्किन

पुश्किन, अलिक्सांद्र सिर्गेयेविच : (६ जून १७९९–१० फेब्रुवारी १८३७). एक श्रेष्ठ रशियन कवी, कथाकार, नाटककार आणि आधुनिक रशियन साहित्याचा एक जनक. मॉस्को येथे एका प्रतिष्ठित उमराव घराण्यात जन्मला. त्याची आई ‘पीटर द ग्रेट’ ह्याचा एक अत्यंत विश्वासू गुलाम अब्राहम हन्निबाल ह्याची नात. पुश्किनचे आरंभीचे काही शिक्षण घरीच झाले. सरदार कुटुंबातील प्रथेप्रमाणे खास परदेशी शिक्षक-मुख्यतः फ्रेंच- त्याला शिकविण्यासाठी नेमलेले होते.

उमराव घराण्यातील मुलांना फ्रेंच भाषा लिहिता-बोलता यावी, असा त्या काळी संकेत असल्यामुळे फ्रेंच भाषाही त्याने आत्मसात केली पुश्किनची आजी मरीया हन्निबाल आणि दाई अरीना रदिओनवना ह्यांनीही पुश्किनवर महत्त्वाचे संस्कार केले. आजीने वेळोवेळी पूर्वजांचा इतिहास कथन केला, तर दाईने त्याला रशियन लोककथा सांगितल्या. पुढे त्सारस्कय स्लो येथे नव्यानेच स्थापन झालेल्या विद्यालयात पुश्किनने शिक्षण घेतले (१८११–१७). उमराव घराण्यातील मुलांना उच्च प्रशासकीय पदांवर कामे करण्याच्या दृष्टीने शिक्षण देण्यासाठी झारने हे विद्यालय स्थापन केले होते. येथे शिकत असतानाच तो कविता करू लागला. व्येस्तनीक येव्रोपी (इं. शी. द यूरोपियन हेरल्ड) ह्या नियतकालीकात १९१४ साली प्रसिद्ध झालेली ‘क द्रूगु स्तिखर्त्वोत्सु’ (इ.शी. टू अ फ्रेंड) ही पुश्किनची पहिली प्रकाशित कविता. ‘रुस्लान इ ल्यूदमिला’ (प्रकाशित, १८२०, इं. शी. रूस्लान इ ल्यूदमिला) हे आपले प्रसिद्ध काव्यही त्याने ह्या विद्यालयात असतानाच लिहावयास घेतले.

शिक्षण पूर्ण झाल्यावर पुश्किन सेंट पीटर्झबर्ग येथे विदेश मंत्रालयातील एका प्रशासकीय पदावर काम करू लागला. त्या वेळी सेंट पीटर्झबर्ग प्रागतिक विचारांच्या, स्वातंत्र्यप्रेमी तरुणांनी गुप्त संघटना निर्माण केलेल्या होत्या. अशा एका संघटनेत पुश्किन शिरला. भूदास आणि किसान ह्यांच्या मुक्तीचा उद्‌घोष करणारा रशियन विचारवंत अलिक्सांद्र रड्यीश्चेव्ह ह्याच्या विचारांचा प्रभावही ह्याच काळात पुश्किनच्या मनावर पडला. ‘वोल्नस्त’(इं.शी. फ्रीडम), ‘क चादायेवु’ (इं.शी. टू चादायेव) आणि ‘दिर्येवन्या’ (इं.शी. व्हिलिज) ह्यांसारख्या कवितांतून स्वातंत्र्याकांक्षी तरुणांच्या भावना पुश्किनने प्रभावीपणे व्यक्तविल्या. त्याची प्रतिक्रिया म्हणून झार पहिला अलिक्सांद्र ह्याने पुश्किनची बदली दक्षिणेकडील यिकट्यिरीनस्लाफ (आता नेप्रोपट्रॉफ्‌स्क) ह्या एका दूरस्थ ठिकाणी केली. बदलीच्या नावाखाली केलेली ही हद्दपारीच होती. पुश्किनला सायबीरियातच पाठविण्याचा झारचा विचार होता परंतु करमझ्यीन आणि झुकॉव्हस्की ह्या दोन कवींनी मुद्दाम प्रयत्न करून पुश्किनवर येऊ घातलेला हा प्रसंग टाळला. यिकट्यिरीनस्लाफ येथून अनुक्रमे किशिनेव्ह आणि ओडेसा येथे त्याची बदली करण्यात आली. पुश्किनची प्रकृती बंडखोराची असल्यामुळे वरिष्ठांची नाराजीही त्याच्या वाट्याला आली. मद्य, जुगार, प्रेमप्रकरणे आणि द्वंद्वयुद्धे ह्यांतही त्याला रस होता.

नाताल्या निकोलायेव्‌ना ह्या सुंदर परंतु उथळ मनोवृत्तीच्या एका स्त्रीशी त्याचा १८३१ मध्ये विवाह झाला आणि सेंट पीटर्झबर्गमध्ये तो तिच्यासह राहू लागला. पुश्किनचे वैवाहिक जीवन फारसे सुखाचे नव्हते. उच्चभ्रू समाजाच्या जीवनशैलीचे नाताल्याला अत्यंत आकर्षण होते, तर पुश्किनला मात्र त्या समाजातील कृत्रिम वातावरणात गुदमरल्यासारखे होई. त्यातच १८३४ मध्ये झारने त्याला आपला दरबारी केले. पुश्किनला आपला गुलाम करून ठेवण्याचाच हा प्रयत्न होता. पोलिसांची आणि झारच्या हेरांची नजर त्याच्यावर असेच. ह्या साऱ्यातून मुक्त होण्यासाठी पुश्किन धडपडत होता. तत्कालीन समाजाचा पोकळपणा आपल्या साहित्यातून उघड करणे त्याने थांबविले नव्हते. दरबारातील वातावरणही त्याच्या विरुद्ध होत गेले. त्याच्या पत्नीने प्रणयाराधन करणाऱ्या एका फ्रेंच तरुणाने त्याला मनस्ताप दिला. ह्याच संदर्भात त्याला आलेल्या एका निनावी पत्रामुळे चिडून जाउन पुश्किनने त्या तरुणाला द्वंद्वयुद्धाचे आव्हान दिले. ह्या द्वंद्वात प्राणांतिक जखमा होऊन पुश्किनचे निधन झाले.

आपल्या अवघ्या अडतीस वर्षांच्या आयुष्यात पुश्किनने कविता, कथा, कादंबरी, नाटके असे विविध साहित्यप्रकार समर्थपणे हाताळले. त्याची आरंभीची कविता – उदा., ‘रूस्लान इ ल्यूदमिला’ – स्वच्छंदतावादी वळणाची आहे. तथापि हळूहळू तो स्वच्छंदतावादाकडून वास्तववादाकडे झुकला. यिकट्यिरीनस्लाफ येथे बदली झाल्यावर उत्तर कॉकेशस आणि क्रिमिया ह्या प्रदेशांत त्याने भ्रमंती केली होती. ह्या काळात लिहिलेल्या ‘कावकाज्स्की प्लेन्निक’ (१८२१, इं.शी. कॉकेशस प्रिझनर), ‘बाखचिसाराइस्की फंतान’ (१८२३, इं.शी. बख्‌चीसराई फाउंटन) आणि ‘त्सीगानी’ (१८२४, इं. शी. जिप्सीज) ह्यांसारख्या कविता पुश्किनचे स्वच्छंदतावादाकडून वास्तववादाकडे होणारे संक्रमण दर्शवितात. पुढे ‘म्येदनी व्साद्नीक’(१८३३, इं. शी. द ब्राँझ-हॉर्स रायडर) सारख्या कवितांत ह्या वास्तववादी प्रवृत्तीचा स्पष्ट प्रत्यय येतो.

येव्‌गेनी अनेगिन (१८३१) ही पुश्किनची सर्वश्रेष्ठ काव्यकृती. मिखाइलफस्कय येथे त्याचे वास्तव्य असताना त्याने ह्या काव्याचे लेखन सुरू केले होते. ही काव्यकृती म्हणजे काव्याच्या माध्यमातून लिहिलेली एक कादंबरीच आहे. येव्‌गेनी हा तिचा नायक तत्कालीन रशियातील उमराव घराण्यातल्या तरुणांचा प्रतिनिधी आहे. आपल्या आयुष्याचे काय करावे, हे त्याला कळत नाही. खुशालचेंडूचे जीवन तो जगतो परंतु निष्फळपणाची तीव्र जाणीव त्याला सतत बोचत असते. तात्याना लारिना नावाच्या एका तरुणीशी त्याचा परिचय होतो. निसर्गात रममाण होणारी आणि सामान्य माणसांच्या जीवनाशी जिव्हाळ्याच्या नात्याने बद्ध झालेली तात्याना येव्‌गेनीला प्रभावित करते. तथापि तिचे प्रेम तो स्वीकारीत नाही. पुढे जेव्हा त्याला ते स्वीकारावेसे वाटते, तेव्हा तात्याना विवाहित असते. येव्‌गेनी पुन्हा आपले निष्फळ जीवन जगत राहतो. रशियन स्त्रीमधील उत्तमोत्तम गुण तात्यानात साकार झाले आहेत. सामाजिक आणि मानसशास्त्रीय अशा दोन्ही दृष्टीकोणांतून लिहिली गेलेली येव्‌गेनी अनेगिन ही रशियन साहित्यातील पहिली वास्तववादी कादंबरी होय. ‘रशियन जीवनाचा ज्ञानकोश’ म्हणून ब्यिल्यीन्‌स्कईने तिचा गौरव केला. पुश्किनने ह्या कादंबरीत तत्कालीन रशियन जीवनसरणीचे काव्यमय चित्र तर रंगविलेच परंतु प्रागतिक दृष्टिकोणातून तिच्यातील न्यूनेही दाखवून दिली.

बरीस गदुनोव (लेखनकाळ १८२४–२५ प्रकाशित १८३१) हे पुश्किनने लिहिलेले पद्यनाटक. रशियन भाषेतील ही पहिली खरीखुरी शोकात्मिका. तिचा विषय ऐतिहासिक असून झारच्या आधिपत्याखालील सत्ताधारी वर्ग आणि सर्वसामान्य जनता ह्यांच्यातील संबंधांचा प्रश्न पुश्किनने तीत परिणामकारकपणे हाताळलेला आहे.

पुश्किनच्या कथा-कादंबऱ्यादी लेखनातूनही त्याची वास्तववादी दृष्टी प्रत्ययास येते. रशियन गद्याला त्याने आधुनिक वळण लावले. पुश्किनच्या गद्यग्रंथांत पोवेस्ती ब्येल्‌किना (१८३१, इं. शी. द बेल्किन स्टोरीज), पीकवाया दामा (१८३४, इं.शी. द क्वीन ऑफ स्पेड्स) हे कथासंग्रह दुब्रोव्‌स्की (१८३३), कापितान्स्काया दोच्‌का (१८३६, इं.शी. द कॅप्टन्स डॉटर), अराब पित्रा वेलिकव्हा (अपूर्ण इं. शी.अरब ऑफ पीटर द ग्रेट) ह्या कादंबऱ्या आणि इस्तोरिया पुगाच्योवा (१८३४, इं.शी. पुगाच्योव्ह्‌ज हिस्टरी) हा इतिहासग्रंथ ह्यांचा समावेश होतो.

त्याने १८३० ते १८३९ च्या दरम्यान काही छोटी नाटकेही लिहिली. ‘लिट्ल ट्रॅजिडी’ज म्हणून ती ओळखली जातात. मानवी स्वभावाचे सखोल विश्लेषण, तीव्र नाट्यात्मक संघर्ष आणि परिलुप्त तात्त्विकता ह्यांचा प्रत्यय त्यांतून येतो.

सवरेमेन्निक नावाचे एक जर्नल त्याने १८३६ मध्ये सुरू केले. प्रागतिक विचारांना वाहिलेले रशियातील एक प्रमुख जर्नल म्हणून त्याचा लौकिक झाला. बंदी, दडपणूक आदी सरकारी हत्यारांना तोंड देत ते दीर्घकाळ चालले.

पुश्किन हा एक राष्ट्रवादी प्रतिभावंत होता. उत्कट देशाभिमान ही त्याच्या साहित्यनिर्मितीमागील महान प्रेरणा होती. रशियन राष्ट्रजीवनाचा खोलवर वेध घेऊन त्याने आपल्या साहित्यकृतींना त्याचा काव्यात्म पण वास्तववादी आशय दिला. रशियन इतिहासाची वास्तववादी पुनर्निर्मिती प्रथम घडून आली ती पुश्किनच्या साहित्यातून. एकोणिसाव्या शतकातील एक महान मानवतावादी म्हणून तो गौरवार्ह ठरतो. एखाद्या माणसाचे समाजातील स्थान काहीही असले, तरी एक माणूस म्हणून त्याचे व्यक्तिमत्त्व आणि प्रतिष्ठा यांचा आदर केला पाहिजे, अशी त्याची धारणा होती. राष्ट्रीय प्रबोधनाचा तो मोठा पुरस्कर्ता होता. प्रबोधन आणि राष्ट्रीय संस्कृतीचा विकास ह्यांसाठी झगडणे म्हणजे स्वातंत्र्यासाठीच झगडणे होय, असे तो मानत असे. रशियन वास्तववादाचा तो प्रणेता असून, रशियन साहित्यावर त्याचा खोल प्रभाव पडला. त्या साहित्याच्या विकासात पुश्किनचा वाटा फार मोठा आहे. इतिहासनिष्ठ दृष्टिकोण आणि पद्धत उत्कट राष्ट्रभक्ती आणि सामाजिक विषमतेला विरोध ह्या तीन मुख्य प्रेरणांमुळे पुश्किन वास्तववादाकडे वळला. आपल्या कवितेत आणि गद्यकृतींत लोकसाहित्यातील काही प्रवृत्ती आणून त्याने रशियन साहित्याला नवे वळण दिले. जिवंत लोकभाषेचा वापर करून नवी, संपन्न रशियन साहित्यभाषा घडविण्याचे श्रेयही त्याचेच. साधी परंतु पारदर्शक आणि तालबद्ध लैखनशैली त्याने जोपासली. गोगोल, टुर्गेनेव्ह, टॉलस्टॉय, चेकॉव्ह, गॉर्की आणि मायकोव्हस्की ह्यांसारखे श्रेष्ठ रशियन साहित्यिक पुश्किनच्या साहित्याने प्रभावित झाले होतेच तथापि जागतिक साहित्यावरही त्याने उमटविलेला ठसा लक्षणीय आहे.

संदर्भ : 1. Lavrin, Jando, Pushkin and Russian Literature, London, 1947.

2. Magarshack, David, Pushkin : A Biography, Chapman. 1967.

3. Simmons, Ernest J. Pushkin, Boston, 1937.

४. आवळीकर, पंडित, अलेक्‌सांद्र पुश्किन, कोल्हापूर १९७७.

पांडे, म.प. (इं.) कुलकर्णी, अ.र. (म.)