गॉर्की मॅक्झिम : (२८ मार्च १८६८ — १८ जून १९३६ ). आंतरराष्ट्रीय कीर्तीचा रशियन लेखक. मूळ नाव अल्यिक्स्येई मक्स्यीमव्ह्यिच प्येश्कॉव्ह. निझ्निनॉव्हगोरॉड येथे जन्म. लहानपणीच आईवडील वारल्यामुळे वयाच्या आठव्या वर्षापासून स्वतःचे पोट भरण्यासाठी त्याला धडपड करावी लागली. मिळतील ती कष्टाची कामे करीत तो रशियाभर हिंडला आणि त्यामुळे रशियातील श्रमिकांच्या दुःखांचा त्याला जवळून परिचय झाला. नोकरीत मारपीट आणि मानहानीही सोसली. पूर्ववयातील कडवट अनुभवांमुळेच त्याने गॉर्की

मॅक्झिम गॉर्की

( कटू किंवा दुःखी ) हे टोपणनाव घेतले. त्याचे नियमित शालेय शिक्षण थोडेच झाले पण वाचन मात्र अफाट होते. शिकण्याचा तेवढा एकच मार्ग त्याला उपलब्ध होता. राजकारणात तो जहालमतवादी होता. क्रांतीच्या कार्याला त्याने स्वतःला जुंपून घेतले. त्यामुळे त्याला पोलिसांच्या दडपशाहीला तोंड द्यावे लागले. क्रांतिकारक जहाल विचारांना वाहिलेल्या Russkoe Bogatstvo (इं. शी. रशियन वेल्थ) ह्या मासिकातही त्याने काम केले. रशियातील ‘सोशल डेमोक्रॅटिक पक्षां’चे सदस्यत्व त्याने स्वीकारले होते. १९०२ मध्ये रशियन विज्ञान अकादमीचा सदस्य म्हणून तो निवडून आला पण ही निवडणूक रद्द करण्यात आली. नंतर तो क्रांतीच्या चळवळीसाठी निधी गोळा करायला परदेशात गेला. १९०५ मध्ये रशियात क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न फसल्यानंतर त्याला इटलीत काप्रीला रहावे लागले. १९१३ मध्ये तो रशियाला परतला. ऑक्टोबर १९१७ च्या क्रांतीचे त्याने उत्साहाने स्वागत केले. जागतिक साहित्यातील नामवंत साहित्यकृतींचे रशियन भाषेत अनुवाद करण्यासाठी ‘Mirovaya literatura’ (इं. शी. वर्ल्ड लिटरेचर) ही संस्था त्याने स्थापन केली. १९२१ मध्ये इटलीतील सॉररेंतॉ येथे तो प्रकृतिस्वास्थासाठी जाऊन राहिला. सोव्हिएट रशियात तो १९२८ मध्ये परतला. त्याच वर्षी त्याचा साठावा वाढदिवस देशात थाटामाटाने साजरा करण्यात आला. १९३२ मध्ये सोव्हिएट साहित्यिकांच्या संघटनेचा पहिला अध्यक्ष म्हणून त्याची नियुक्ती झाली. ह्याच सुमारास त्याने साहित्यातील ‘समाजवादी वास्तववादा’ची घोषणा केली. समाजवादी वास्तववाद हे सोविएट साहित्यिकांचे वाङ्‌मयीन तत्त्वज्ञान होऊन बसले. सोव्हिएट साहित्यावर त्याचा फार प्रभाव पडला. लेनिनग्राड येथे तो एकाएकी मरण पावला. त्याला विषप्रयोग केल्याचा आरोप त्याच्या डॉक्टरांवर करण्यात आला आणि त्यांच्यावर खटले होऊन त्यांना फाशी देण्यात आले.

 ‘Makar Chudra’ ( १८९२ ) ही कथा लिहून त्याने लेखनक्षेत्रात पदार्पण केले. त्याच्या प्रारंभीच्या कथांत त्याने समाजाच्या खालच्या थरातील उनाड, भटके, गुन्हेगार आदींचे सहानुभूतिपूर्वक चित्रण केले. हे लोक शूर व ध्येयनिष्ठ असतात ही त्याची धारणा होती. समाजातील कनिष्ठ श्रेणीतल्या घटकांना तो ध्येयवादी रूप देत होता.

त्यानंतरच्या काळातल्या त्याच्या कथा भौतिकवादी आहेत. अपवाद फक्त ‘Dvadtsat shest i odna’ (१८९९, इं. भा. ‘ट्‌वेंटीसिक्स मेन अँड अ गर्ल’, १९०२ ) या सुप्रसिद्ध कथेचा आहे. या कथेत भटारी पुरुषांचा एक घोळका एका मुलीवर प्रेम करताना दाखविलेला आहे. ही मुलगी दररोज पाव खरीदण्यासाठी येते. एक सैनिक त्या भटाऱ्यांजवळ पैज मारतो, की मी तिला फसवून तिचा उपभोग घेईन. त्यात त्याला यश येते. फिरून जेव्हा ती मुलगी त्या भटाऱ्यांकडे पाव विकत घ्यायला जाते, तेव्हा ते तिला हाकलून देतात. या कथेतले कारुण्य चटका लावणारे आहे.

१८९९ ते १९१० ह्या काळात गॉर्कीने कथांबरोबरच काही कादंबऱ्या आणि नाटके लिहिली. Mat (१९०७, इं. भा. द मदर, १९२९) ही त्याची सर्वोत्कृष्ट कादंबरी ह्याच काळातली. मराठीत आई  ह्या नावाने ही कादंबरी विनायक महादेव भुस्कुटे ह्यांनी अनुवादिली आहे ( १९४५ ). क्रांतिकार्यावरील निष्ठा, तरुण क्रांतिकारकांचा मिळालेला सहवास आणि मान ह्यांमुळे एका भित्र्या, दडपलेल्या स्त्रीचे कोमल, ममताळू आणि निर्भय स्त्रीत कसे रूपांतर होते, त्याचे चित्र या कादंबरीत रंगविलेले आहे. ही कादंबरी समाजवादी वास्तववादाचा महान आदर्श म्हणून रशियन टीकाकारांनी गौरविली. Na dne (१९०२, इं. भा. लोअर डेप्थ्‌स, १९१२) हे विख्यात नाटक त्याने याच काळात लिहिले. या नाटकाला आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभली याचे एक कारण त्याची पार्श्वभूमीच खळबळजनक होती. गलिच्छ, गैरवर्तनी भिकाऱ्यांची वसती असलेले एक गृह ही त्याची पार्श्वभूमी आहे.

१९१३ च्या सुरुवातीपासूनच गॉर्कीने आपले त्रिखंडात्मक आत्मचरित्र — Detstvo (१९१३, इं. भा. चाइल्डहूड, १९१५ म. भा. माझे बालपण, १९४६), V Iyudyakh (१९१५, इं. भा. इन द वर्ल्ड, १९१७) आणि Moi Universitety (१९२३, इं. भा. माय युनिव्हर्सिटीज, १९२४), — लिहिण्यास सुरुवात केली होती. या ग्रंथांनी त्याला फार मोठी मान्यता मिळवून दिली. गॉर्कीच्या लेखनात एरव्ही अनेकदा आढळून येणारी तत्त्वबोधाची आत्यंतिक प्रवृत्ती त्यांत नाही. त्याची सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि विविध व्यक्तींची त्याने काढलेली शब्दचित्रे मनाची पकड घेतात. Vospominaniya o Tolstom (१९१९, इं. भा. रेमिनिसन्सेस ऑफ टॉलस्टॉय, चेकॉव्ह अँड आंद्रेयेव्ह, १९३४) ह्या आपल्या आठवणीदेखील त्याने लिहिल्या आहेत.

Zhizn Klima Samgina (लेखनकाल १९२७ ते १९३६ ) ही त्याची चार खंडात्मक कादंबरी विशेष उल्लेखनीय आहे. ह्या कादंबरीत झारच्या कारकीर्दीत वाढलेली जुनी पिढी आणि बोल्शेव्हिक विचारांनी भारलेली नवी पिढी ह्यांच्या संघर्षाचे चित्रण आहे. या कादंबरीचे चार खंड बायस्टँडर ( १९३० ), द मॅग्नेट (१९३१), अदर फायर्स (१९३३) आणि द स्पेक्टर (१९३८) ह्या नावांनी अनुवादित झालेले आहेत.

गॉर्कीच्या साहित्यात टीकाकारांना जाणवलेले काही दोष म्हणजे लेखन परिणामकारक करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न, त्यातूनच येणारी भावविवशता, कलात्मकतेशी एकजीव न होणारे भाष्य करण्याची प्रवृत्ती हे होत. तथापि सूक्ष्म निरीक्षण, जिवंत व्यक्तिरेखा, रशियातील श्रमिक आणि दरिद्री लोकांचे सूक्ष्म ज्ञान इ. गुण त्याच्या साहित्यकृतींतून प्रभावीपणे प्रत्ययास येतात. रशियाबाहेरचे टीकाकार गॉर्कीला एकोणिसाव्या शतकातील वास्तववादाचे शेवटचे प्रकरण म्हणून संबोधतात.

संदर्भ : 1. Hare, Richard, Maxim Gorky : Romantic Realist and Conservative Revolutionary, London and New York, 1962.

           2. Kaun, A. Maxim Gorky and His Russia, New York, 1932.

           3. Weil, Irwin, Gorky : His Literary development and Influence on Soviet Intellectual Life, New York, 1966.

          ४. सुकथनकर एस. आर्. मॅक्झिम् गॉर्की, व्यक्ति व वाङ्‌मय, धारवाड, १९३७.

मेहता, कुमुद