पास्तेरनाक, बरीस : (१० फेब्रुवारी १८९० – ३० मे १९६०). विख्यात सोव्हिएट कवी व कांदबरीकार. मॉस्को शहरी, एका सुसंस्कृत ज्यू कुटुंबात त्याचा जन्म झाला. वडील एक नाणावलेले चित्रकार होते आई पियानोवादक होती. स्वतः पास्तेरनाकने संगीतकार होण्याच्या दृष्टीने संगीताचा काही वर्षे अभ्यास केला होता. तथापि पुढे तो तत्त्वज्ञानाकडे वळला. मॉस्को विद्यापीठात तसेच जर्मनीतील मारबर्ग विद्यापीठात त्याने ह्या विषयाचा अभ्यास केला. पहिल्या महायुद्धाच्या काळात यूरल्झमधील एका रासायनिक कारखान्यात त्याने काम केले. रशियन क्रांतिनंतर सोव्हिएट शिक्षण मंत्रालयाच्या ग्रंथालयात तो नोकरीस होता. ब्लिजनेत्स व्ह तूचाख (१९१४, इं.शी. ट्विन इन द क्लाउड्स) हा पास्तेरनाकचा पहिला कवितासंग्रह. तथापि सिस्त्रा मया झीज्न (१९२२, इं. शी.माय सिस्टर लाइफ) ह्या कवितासंग्रहामुळे श्रेष्ठ कवी म्हणून त्याची प्रतिमा प्रस्थापित झाली. त्याच्या कवितांवर प्रतीकवादाचा प्रभाव आढळतो. उत्कट निसर्गप्रेम आणि अभिजात साधेपणा ही त्या कवितेची आणखी काही महत्त्वाची वैशिष्ट्ये. त्याच्या अन्य उल्लेखनीय कवितासंग्रहांत त्येमी इ व्हारिआत्सी (१९२३, इं.शी. थीम्स अँड व्हेरिएशन्स), व्हेतरोये रझद्यनिये (१९३२, इं.शी. सेकंड बर्थ) आदींचा अंतर्भाव होतो. लेनीनचे जीवन १९०५ चे बंड आणि सच्चा क्रांतिकारकाचे जीवन अशा विषयांवर त्याने महाकाव्यसदृश काव्येही लिहिली.

पास्तेरनाकने १९३३ ते १९४३ ह्या दहा वर्षांच्या कालखंडात मात्र गटे, शेक्सपिअर आदी जागतिक कीर्तीच्या विविध साहित्यिकांच्या साहित्यकृतींचे रशियनमध्ये दर्जेदार अनुवाद केले. त्याच्या स्वतंत्र सर्जनशील साहित्याबद्दल सोव्हिएट रशियातील अधिकृत वाङ्‍मयीन वर्तुळात, तसेच अन्य पातळ्यांवर व्यक्त केली जाणारी नाराजी हे ह्यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणून सांगितले जाते.

तथापि १९४३ पासून त्याचे स्वतंत्र लेखन पुन्हा अवतरले. ना रान्निख पयेज्दाख (१९४३, इं.शी. ऑन अर्ली ट्रेन्स) आणि जिमनोई प्रस्तोर (१९४५, इं.शी. अर्थ्स व्हास्टनेस) हे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाल्यानंतर १९५६ मध्ये डॉक्टर झिवागो ह्या आपल्या जगद्विख्यात कादंबरीचे हस्तलिखित त्याने मॉस्कोतील एका प्रमुख मासिकाकडे पाठविले परंतु ह्या कांदबरीत आलेले रशियातील ऑक्टोबर क्रांतीचे चित्रण, त्या क्रांतीचा आणि ती घडवून आणणाऱ्या जनतेचा अधिक्षेप करणारे असल्याचा आरोप ठेवून ते हस्तलिखित नाकारण्यात आले. तथापि १९५७ मध्ये एका इटालियन प्रकाशसंस्थेच्या द्वारा ही कादंबरी सोव्हिएट रशियाबाहेर प्रसिद्ध झाली आणि गाजली. १९५८ पर्यंत ह्या कादंबरीचे जगातील १८ भाषांत अनुवाद झाले होते. ह्याच वर्षी लाला नोबेल पारितोषिक देऊ करण्यात आले. ह्या घटनेबद्दलही सोव्हिएट रशियात फार मोठी विरोधी प्रतिक्रिया व्यक्त झाली. पास्तेरनाकने हे पारितोषिक नाकारले पण पास्तेरनाकला आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळाली ती डॉक्टर झिवागो ह्या त्याच्या कादंबरीमुळेच. पास्तेरनाक हा मूलतः कवी. रशियन क्रांतीनंतर देशात घडून आलेली विविध सामाजिक-राजकीय परिवर्तने त्याने पाहिली- अनुभविली होती. त्या साऱ्यांचा मुख्यतः व्यक्तिजीवनाच्या संदर्भातील अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न एक कवी ह्या नात्याने त्याला करावासा वाटला व हा अन्वयार्थ त्याच्यासर्व परिमाणांसह आणि संदर्भांसह व्यक्त करण्यासाठी आत्मनिष्ठेबरोबरच आवश्यक त्या वस्तुनिष्ठतेला पुरेसा वाव देणारा कादंबरीसारखा साहित्यप्रकार त्याने निवडला असावा. राजकीय कारणांसाठी ही कादंबरी वादग्रस्त ठरली, तरी ती मूलतः अ –राजकीय होती तिच्यात मांडल्या गेलेल्या समस्या व्यक्तिजीवनाच्याच होत्या आणि स्वातंत्र्यप्रेमी अशा एक कविमनाने त्या मांडलेलया होत्या.

यूरी झिवागो हा एका सायबीरियन उद्योगपतीचा मुलगा आणि एक निष्णात डॉक्टर. कला-साहित्याचा त्याचा व्यासंग तो स्वतः एक कवी. आपले आत्मिक स्वातंत्र्य जपण्यासाठी तो धडपडतो. रशियन क्रांतीत तो सहभागी असतो तिने उद्‍घोषिलेल्या सर्वव्यापी न्यायाच्या ध्येयाशी तोही समरस झालेला असतो परंतु जेव्हा त्याच्या विचारस्वातंत्र्यावर आणि जीवनशैलीवर नियंत्रणे येऊ लागतात, तेव्हा तो बंड करून उठतो. त्यानंतर क्रांत्युत्तर बदललेले जीवन स्वीकारलेल्या रशियन समाजाच्या मूलस्रोतापासून तो दूर होऊन एका प्रकारच्या बहिष्कृतपणाची (आउटसाइडर) भावना त्याला जाणवू लागते. लारा ही त्याची प्रेयसी. आधुनिक रशियन साहित्यातील अत्यंत काव्यात्म अशा व्यक्तिरेखांत लाराचा समावेश होतो. आयुष्याच्या अखेरीस झिवागो पार ढासळतो एकाकी होतो. मॉस्कोमधील एका रस्त्यावर त्याला मरण येते. लारा एका छलगृहात मरण पावते. झिवागो आणि लारा ह्या दोघांनाही व्यक्तिगत जीवनाचे सत्त्व आणि प्रतिष्ठा टिकविण्याचा ध्यास आहे. आपल्या उत्कट प्रेमाला ते क्रांतीच्याही वरचे स्थान देऊ पाहतात आणि त्यांच्या आयुष्याची शोकात्मिका घडून येते. देशात घडून येणारी सामाजिक- राजकीय परिवर्तने स्वीकारल्यानंतर, नव्या व्यवस्थेत व्यक्तीच्या अनुभवाला येणारी तात्त्विक-नैतिक कुचंबणा पास्तेरनाकला पतकरता आलेली नाही. लारा हे सौंदर्यमूल्यांचे प्रतीक आहे, तर झिवागो हे कविप्रतिभेचे. या दोन्ही व्यक्ती मनस्वी आहेत हिंसाचार त्यांना नापसंत आहे प्रत्येक माणसाच्या अंतर्विश्वावर आणि स्वांतत्र्यावर त्यांची श्रद्धा आहे. झिवागो आणि लारा ह्या दोन व्यक्तिरेखांवर पास्तेरनाकने बरेच लक्ष केंद्रित केलेले असल्यामुळे संविधानकाच्या विकासाची काही प्रमाणात हानी झालेली आहे. अनपेक्षित घटनांनी भरलेल्या ह्या कादंबरीत नाट्य आणि काव्यात्मता ह्यांचा एकत्रित प्रत्यय सतत येत राहतो. एक श्रेष्ठ आणि मौलिक साहित्यकृती म्हणून पास्तेरनाकची ही कादंबरी ओळखली जाते.

आधुनिक रशियन साहित्यपरंपरेच्या मुख्य स्रोतात पास्तेरनाकला स्थान आहेच. त्याच्याही अनेक साहित्यकृतींवर रशियन क्रांतीचा आणि वाङ्‍मयीन वास्तववादासंबंधीच्या नव्या सोव्हिएट दृष्टीचा ठसा उमटलेला आहेच. रशियन क्रांतीनेच विसाव्या शतकाला अर्थ आणि आशय दिला, अशा आशयाने उद्‍गार पास्तेरनाकनेच काढलेले आहेत. चोरट्या मार्गाने रशियाबाहेर आणून पश्चिमी देशांत प्रसिद्ध केली जाणारी डॉक्टर झिवागो ही पहिली रशियन साहित्यकृती होय. सोव्हिएट रशियातील शासनपुरस्कृत वाङ्‍मयीन भूमिकेपासन दूर जाऊन लिहिल्या गेलेल्या आरंभीच्या रशियन साहित्यकृतींत ह्या कादंबरीचा अंतर्भाव होतो. त्या दृष्टीने सोव्हिएट रशियातील बंडखोर लेखकांनी निर्माण केलेल्या साहित्यपरंपरेतही पास्तेरनाकचे स्थान महत्त्वाचे आहे.

आक्तोबियाग्राफीचेस्की ओचिर्क (१९५८,इं.शी. एसे एन ऑटोबायग्राफी) हे त्याचे आत्मचरित्र कग्दा राजगुल्यायेतसा (१९५९, इं.शी. व्हेन द वेदर क्लीअर्स) हा त्याचा काव्यसंग्रह सोव्हिएट रशियाबाहेरच प्रकाशित झाले.

मॉस्कोमध्येच पास्तेरनाकचे निधन झाले.

संदर्भ : 1. Bowra, C. M. The Creative Experiment, London, 1949.

2. Muchnic, Helen, From Gorky to Pasternak : Six Writers in Soviet Russia, Torento, 1961.

3. Plank, Dale, Pasternak’s Lyric : A Study of Sound and Imagery, 1966.

पांडे, म. प. (इं.); कुलकर्णी, अ. र. (म.)