क्यूप्रिन, अल्यिक्सांडर इव्हानव्ह्यिच : (७ सप्टेंबर १८७०–२५ ऑगस्ट १९३८). रशियन कथा- कांदबरीकार. जन्म पेंझा प्रांतातील नरफचाट येथे. लहानपणीच अनाथ झाल्याने मॉस्कोत आला. नंतर एका सैनिकी शाळेत शिक्षण घेऊन एक लष्करी अधिकारी म्हणून काम केले (१८९०–९४). त्यानंतर इतर काही व्यवसाय करून त्याने स्वतःला लेखनास वाहून घेतले.

‘पस्ल्येदनी दिब्यूत’ (१८८९, इं. शी. द लास्ट डेबू) ही त्याची पहिली कथा. आपल्या आरंभीच्या कथांतून गरिबांच्या जीवनाविषयी त्याला स्वतःला आलेले अनुभव, सैनिकांना भोगाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा ह्यांसारखे विषय त्याने हाताळले आहेत.‘दज्नानिये’ (१८९४, इं. शी. इन्क्वेस्ट), ‘मोलख’ (१८९६) आणि ‘पयेदीनक’ (१९०५, इं. भा. द ड्यूअल, १९१६) ह्या कथा त्या दृष्टीने लक्षणीय आहेत. ‘गाम्ब्रिनूस’ (१९०६), ‘ग्रानातवि ब्रास्लेत’ (१९११, इं. शी. द ब्रेस्लिट ऑफ गार्निट्स) व ‘साशा’ (१९२०) ह्या त्याच्या आणखी उल्लेखनीय कथा. यामा (१९०९ – १५, इं. भा. यामा : द पिट, १९२७) ह्या वेश्याजीवनावर आधारलेल्या आपल्या कादंबरीत त्याने बूर्झ्वा समाजातील अनीतीचे भेदक चित्रण केले आहे. ह्या कादंबरीचा मराठी अनुवाद पी. डी. शर्मा ह्यांनी दोन खंडांत केलेला आहे (१९३४, १९३६). कलिसो व्रेमिनि (१९३०, इं. शी. द व्हील ऑफ टाइम), युन्किरा (१९२८–३२, कॅडेट्स) व झानेता (१९३२-३३) ह्या त्याच्या आणखी काही प्रसिद्ध कादंबऱ्या. रशियन क्रांतीनंतर काही वर्षांनी तो पॅरिसला आला (१९२०) आणि तेथे सतरा वर्षे वास्तव्य केल्यावर मॉस्कोस परतला. लेनिनग्राड येथे तो निधन पावला.

पांडे, म. प. (इं.) देव, प्रमोद (म.)