सिराफिमोव्हिच, अल्यिक्सांडर : (१८६३— १९४९). सोव्हिएट कादंबरीकार. खरे नाव ए. एस्. पोपॉव्ह. जन्म निझनी-कुर्मायास्कायय येथे. रशियात ऑक्टोबर क्रांती घडून येण्याच्या आधीपासूनच तो लेखन करत होता. ‘ए टाउन इन द स्टेप’ (१९०७ — १०, इं. शी.) ही त्याची ह्या काळातली प्रसिद्घ कादंबरी. क्रांती होण्यापूर्वी तो कोणत्याही पक्षात नव्हता फक्त एक उदारमतवादी वृत्तीचा माणूस होता तथापि क्रांतीनंतर तो कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य झाला. द आयर्न फ्लड (१९२४, इं. भा. १९३५) ही त्याची क्रांत्युत्तर काळातली विख्यात कादंबरी. बोल्शेव्हिक क्रांतीनंतर अल्पावधीतच झालेल्या यादवी युद्घाच्या काळात कॉकेशसमध्ये झालेल्या लढाईचा विषय ह्या कादंबरीत हाताळलेला आहे. रशियात पुढे ‘सामाजिक वास्तववादा’चे जे वाङ्मयीन तत्त्वज्ञान पुरस्कारिले गेले त्याची ही कादंबरी अग्रदूत होय, असे काही समीक्षक मानतात. मार्गदर्शक, दिशादर्शक म्हणून कम्युनिस्ट पक्षाने ऑक्टोबर क्रांतीच्या अगदी आरंभापासूनच जी भूमिका बजावली ती प्रभावीपणे दाखवून देणे, हे सिराफिमोव्हिचच्या ह्या कादंबरीचे यश होय असे मानले जाते.

मॉस्को शहरी तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.