ब्यलई, अड्रयेई : (२६ ऑक्टोबर १८८० – ७ जानेवारी १९३४). रशियन प्रतीकवादी कवी आणि कादंबरीकार. खरे नाव बर्यीस बूगायेव्ह. जन्म मॉस्को शहरी. एल्. आय्. पॉलिव्हानॉव्ह ह्या श्रेष्ठ रशियन शिक्षकाच्या खाजगी संस्थेत त्याने आरंभीचे शिक्षण घेतले. पॉलिव्हानॉव्हने त्याला कवितेची गोडी लावली. पुढे मॉस्को विद्यापीठातून तत्त्वज्ञान आणि गणित ह्या विषयांच्या पदव्या त्याने मिळविल्या. प्रसिद्ध रशियन तत्त्वज्ञ व्हल्द्यीम्यीर सोलोवह्योव्ह ह्याचा सहवासही त्याला लाभला आणि सोलोव्ह्योव्हच्या गूढवादी विचारांचा प्रभाव ब्येलईवर पडला. कविता म्हणजे अंतःप्रज्ञेने केलेले सत्य व परमेश्वर ह्यांचे आकलन असून प्रतीकवाद हा धर्मच होय, असे सोलोव्ह्योव्हचे विचार होते. ब्येलई हा रशियन प्रतीकवादी काव्यसंप्रदायात सामील झाला, ह्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे सोलोव्ह्योव्हचा त्याच्यावर असलेला प्रभाव. १९१३ नंतर ऑस्ट्रियन तत्त्वज्ञ रूडोल्फ स्टाइनर ह्याच्या ‘अंथ्रॉपॉसॉफी’ ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तत्त्वज्ञानानेही ब्येलई भारला गेला. स्टाइनरचे तत्त्वज्ञान रशियन प्रतीकवादी मनोभूमिकेला अनुकूलच होते. रशियन प्रतीकवादी कवींना सारे विश्व हिच विविध प्रतीकांनी घडविलेली एक व्यवस्था वाटत हो आणि स्टाइनरला मानवी पिंड हा ब्रह्मांडाचेच प्रतीक वाटत होता. १९०२ साली ‘सिंफनी’ (सेकंड ड्रॅमॅटिक) ह्या इंग्रजी शीर्षकार्थाचे त्याचे गद्यकाव्य प्रसिद्ध झाले आणि त्यानंतर अशा तीन सिंफनी त्याने प्रसिद्ध केल्या. तालबद्ध, नादवती शब्दकळेमुळे उत्कृष्ठ सांगीतिक रचनांसारख्या वाटणाऱ्या ह्या गद्यकाव्यांच्या रूपाने ब्येलईने एक आगळा साहित्यप्रकार रशियन भाषेत
आणला. आपल्या ह्या रचनांना सागीतिक, औपरोधिक आणि तात्त्विक-प्रतीकात्मक असे अर्थाने तीन पैलू असल्याचे ब्येलईने म्हटले होते. ‘गोल्ड इन अँझर’ (१९०८, इं. शी.),‘अँशिस’(१९०८, इं.शी.) आणि ‘अर्न’ (१९०८, इं. शी) हे ब्येलईचे काव्यसंग्रह उल्लेखनीय आहेत. काव्याभिव्यक्तीच्या दृष्टीने रशियन भाषेच्या अंतःशक्तीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणाऱ्या कवींत ब्येलईचा समावेश होतो. प्रगाढ गांभीर्य हे रशियन प्रतीकवादी कवींच्या कवितेचे एक महत्त्वाचे वैशिष्टय. तथापि ब्येलईच्या कवितेत त्याची तत्त्वचिंतनात्मक वृत्ती दिसून येत असली तरी, त्याच्या मार्मिक विनोदबुद्दीचा प्रत्ययही अनेकदा येतो आणि त्या संदर्भात अन्य रशियन प्रतिकवादी कवींहून त्याचे वेगळेपण ठसठशीतपणे जाणवते.
‘सिल्हर डव्ह’ (१९१०, इं. शी.) आणि पीटर्झबर्ग (१९१६) ह्या त्याच्या कादंबऱ्यांपैकी पीटर्झबर्ग ही कादंबरी विशेष मान्यता पावली. सिल्वहर डव्हवर विख्यात रशियन साहित्यिक निकोलाय गोगोल ह्याचा प्रभाव दिसून येतो. तथापि सिल्वर डव्ह हा गोगोलची अनुकृती नव्हे ब्येलईच्या स्वतंत्र प्रतिभेचा ठसा तीवर स्पष्टपणे उमटलेला आङे. सिल्वर डव्ह मध्ये पौर्वात्य आणि पश्चिमी संस्कृतींतील विरोध प्रत्ययकारीपणे चित्रित केला आहे, तर पीटर्झबर्ग मध्ये रशियन नोकरशाही व क्रांतिकारक ह्यांच्या चित्रणातून क्रांतिपूर्व रशियातील ढासळत्या स्थितीचे दर्शन घडविलेले आहे. आपल्या लेखनातून ब्येलईने भाषेचे विविध प्रयोग केले. ही त्याची प्रयोगशीलता युगप्रवर्तक आयरिश कादंबरीकार जेम्स जॉइस ह्याच्या लेखनप्रवृत्तीशी निकटचे नाते जोडणारी आहे. कोटिक लेटायेव्ह (१९१७) ह्या त्याच्या आत्मचरित्रात्मक लेखनात तो जॉइसच्या विशेष जवळ आलेला दिसतो. १९१८ साली झालेल्या रशियन क्रांतीचे ब्येलईने स्वागत केले आणि त्याप्रीत्यर्थ ‘क्राइस्ट हॅज प्रिव्हेल्ड’ (इं. शी.) ही कविताही लिहिली. तथापि क्रांत्युत्तर काळातील घटनांनी तो नाउमेद झाल्याचे दिसते. १९२२ साली तो बर्लिनला गेला पण तेथे त्याला मनःशांती मिळाली नाही १९२३ मध्ये तो रशियास परतला आणि आमरण रशियात राहिला. मॉस्को शहरी त्याचे निधन झाले.
कुलकर्णी, अ. र
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..