ब्लॉक, अल्यिक्सांडर : (१६ नोव्हेंबर १८८० – ७ ऑगस्ट १९२१). रशियन प्रतीकवादी कवी आणि नाटककार. सेंट पीटर्झबर्ग (विद्यमान लेनिनग्राड) येथे एका सुविद्य आणि सुसंस्कृत कुटुंबात जन्म. ब्लॉकचे वडील वॉर्सा विद्यापीठात कायद्याचे प्राध्यापक होते. त्याची आर्ह सेंट पीटर्झबर्ग विद्यापीठाचे रेक्टर प्राध्यापक बेकीटॉव्ह ह्यांची कन्या. ब्लॉकच्या जन्मानंतर अल्पावधीतच तिने ब्लॉकच्या वडिलांपासून घटस्फोट घेतला आणि ब्लॉकला तिने स्वतःजवळ ठेवले. रशियन अभिजनांशी निकटचे संबंध असलेल्या तिच्या कुटुंबात ब्लॉकचे बालपण गेले. बालपणापासून ब्लॉक कविता करू लागला होता. सेंट पीटर्झबर्ग विद्यापीठातून भाषाशास्त्र हा विषय घेऊन तो पदवीधर झाला (१९०६) तेव्हा कवी म्हणून त्याची ख्याती झालेली होती. विख्यात रशियन स्वच्छंदतावादी कवी अलिक्सांद्र पुश्किन ह्याच्या कवितेचा आणि रशियन तत्वज्ञ व्हलद्यीम्यिर सलव्हयॉव्ह ह्याच्या गूढवादी विचारांचा प्रभाव त्याच्यावर होता. कविता म्हणजे अंतःप्रज्ञेने केलेले सत्य व परमेश्वर ह्यांचे आकलन असून प्रतीकवाद हा धर्मच होय, अशी सलव्हयॉव्हची धारणा होती. ‘व्हर्सिस अबाउट द ब्यूटिफूल लेडी’ (इं. शी.) हा ब्लॉकचा पहिला काव्यसंग्रह १९०४ मध्ये प्रसिद्ध झाला. ह्या संग्रहातील कविता एका स्त्रीला उद्देशून लिहिल्या असून त्यांतून त्या स्त्रीसंबंधीचे आपले भावानुभव त्याने एका गूढोत्कट पातळीवर नेऊन ठेविले आहेत. ह्या स्त्रीमध्ये ब्लॉकने सोफिआचे – ईश्वरी प्रज्ञेचे – प्रतीक पाहिले. सांगीतिक प्रचीती देणाऱ्या नादवती शब्दकळेने घडविलेल्या ह्या कवितांचे समीक्षकांनी फारसे स्वागत केले नव्हते. तथापि ह्या कवितांतून अड्र्येई ब्येलईसारख्या प्रतीकवादी कवींना एका मौलिक आणि परिपक्व काव्यप्रतिमेचा प्रत्यय आला. ब्लॉकमध्ये त्यांना एका प्रेषिताच्या साक्षात्कार झाला. आपल्या कवितांतील गूढानुभूतींशी समरस झाल्याखेरीज त्यांचे खरे आकलन होणार नाही, असे ब्लॉक म्हणत असे. ते त्याच्या ह्या पहिल्या काव्यसंग्रहाबाबत विशेषत्वाने खरे आहे.

‘व्हर्सिस अबाउट द ब्यूटिफूल लेडी’च्या प्रकाशनानंतर मात्र ब्लॉकला एका भावनिक संघर्षातून जावे लागले. त्याच्या अंतर्यामी आकारलेल्या गूढ, सुंदर स्त्रीने त्याची उपेक्षा केल्याचा भावानुभव त्याने घेतला परिणामतः त्याच्या संवेदनस्वभावात एक महत्त्वपूर्ण परिवर्तन घडून आले. एक प्रकारच्या रितेपणाची जाणीव त्याला होऊ लागली गूढानुभूतींपेक्षा भोवतालच्या मानवी दुःखांचा वेध तो घेऊ लागला. त्याच्या ह्या मानसिक अवस्थेचे पडसाद ‘सिटी’ (१९०४ – ०८, इं. शी.) ह्या त्याच्या काव्यसंग्रहात उमटलेले आहेत. रशियात १९०५ साली घडून आलेल्या क्रांतीचे त्याने स्वागत केले तथापि ती फसल्यानंतर त्याला फार मोठे नैराश्य आले रितेपण आणि अस्वस्थताही वाढू लागली. ‘द पपेट शो’ (लेखनकाळ १९०६ – ०७, इं. शी.) आणि ‘द स्ट्रेंजर’ (लेखनकाळ १९०६ – ०७, इं. शी.) ह्या त्याच्या दोन पद्यनाट्यकृती ह्या संदर्भात निर्देशनीय आहेत. १९०७ नंतरची ब्लॉकची कविता अधिक परिपक्व आणि समृद्ध आहे. ‘रिटॅलिएशन’, ‘स्किथिअन्स’ आणि ‘द ट्वेल्व्ह’ ही त्याची विशेष उल्लेखनीय काव्ये. ‘रिटॅलिएशन’ ही कविता ब्लॉकने आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर आणि त्या घटनेच्या प्रभावाखाली लिहिली. ही कविता म्हणजे ब्लॉक पिता पुत्रांची कहाणी असली, तरी तिचा आशय व्यापक करण्याची ब्लॉकची इच्छा होती रशियातील जुन्या राजवटीच्या विघटनाचे टप्पेही तो तीतून दाखविणार होता. ह्या काव्याचे तीन सर्ग त्याने संकल्पिले होते तथापि केवळ एकच तो पूर्ण करू शकला. ‘स्किथिअन्स’मध्ये ब्लॉकने रशियाबद्दलचे आपले प्रेम उत्कटपणे व्यक्तविले आहे. नव्या जगात रशियाची भूमिका ‘मेसिया’ची आहे, ही त्याची भावना ह्या कवितेतून सशब्द झाली आहे. जिप्सी लोकगीतांशी नाते सांगणाऱ्या लयतालांनी ह्या कवितेची शब्दकळा तोलून धरली आहे. तथापि ‘द ट्वेल्व्ह’ ही ब्लॉकच्या अत्यंत उत्कृष्ट कवितांपैकी एक होय. पेट्रग्राडच्या रस्त्यातून गस्त घालणारे, भेटणाऱ्या बूर्झ्वांना दमबाजी करून लुटालूट, खुनाखुनी करीत पुढे जाणारे बारा लाल रक्षक ह्या कवितेत ब्लॉकने दाखविले आहेत. बारा हा आकडा येशू ख्रिस्ताच्या बारा प्रमुख शिष्यांचे (अपॉसल) प्रतीक म्हणून आलेला आहे, असे भाष्यकारांनी लावले आहेत. कवितेच्या अखेरच्या भागात ख्रिस्त येऊन ह्या लाल रक्षकांना मार्गदर्शन करतो, असे दाखविले आहे. कवितेच्या संगीताची, तिच्या लयतालांची ब्लॉकची सूक्ष्म जाणीव ह्या कवितेत अत्यंत कलात्मकपणे उतरलेली आहे.

महान रशियन क्रांतीचे ब्लॉकने स्वागतच केले. तथापि त्याच्या व्यक्तिमत्वातील भावनिक संघर्ष थांबले नाहीत आणि त्याला पछाडणारे नैराश्यही संपले नाही. ढासळलेल्या अवस्थेत, लेनिग्राडमध्ये तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.