करमझ्यीन, न्यिकलाय म्यिकाय्‌लव्ह्यिच : (१ डिसेंबर १७६६ – २२ मे १८२६). रशियनसाहित्यिक आणि इतिहासकार. त्याचा जन्म रशियातील मीखाय्‌लव्ह्‌क ह्या ठिकाणी झाला. शिक्षणमॉस्कोस झाले. १७८९ – ९० ह्या काळात त्याने पश्चिम यूरोपचा प्रवास केला आणि आपले अनुभव Pisma Russkogo Puteshest vennika (इं. शी. लेटर्स ऑफ अ रशियन ट्रॅव्हलर) ह्या नावाने प्रसिद्धकेले. Istoriya gosudarstva rossiyaskogo (१८१६ – १८२९, इं. शी. हिस्टरी ऑफ द रशियन स्टेट)ह्या त्याच्या ग्रंथाने नेपोलियनच्या आक्रमणकाळात राष्ट्रीय भावना चेतवण्याचे फार मोठे कार्य केले.

वाङ्मयीन भाषेला त्याने बोलभाषेच्या निकट आणले. पश्चिम यूरोपीय भाषांतील–विशेषतःफ्रेंच-शब्द त्याने रशियन भाषेत प्रचलित केले. एकोणिसाव्या शतकातील प्रमाणभूत रशियन साहित्यभाषेची जडणघडण करण्यात त्याच्या भाषाशैलीचा मोठा वाटा आहे. सेंट पीटर्झबर्ग येथे तो मरण पावला.

मेहता, कुमुद