चेरनिशेव्हस्की, न्यिकलाय गव्ह्‌ऱ्यीलव्ह्यिच: (२४ जुलै १८२८–९ ऑक्टोबर १८८९). सुप्रसिद्ध रशियन टीकाकार, विचारवंत व क्रांतिकारी लोकशाहीचा पुरस्कर्ता. सराटव्ह येथे एका धर्मगुरूच्या कुटुंबात जन्म. सेंट पीटर्झबर्ग विद्यापीठात तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला (१८४६–५०). १० मे १८५५ या दिवशी त्याने ‘कला आणि वास्तव यांचे सौंदर्यशास्त्रीय संबंध’ ह्या शीर्षकार्थाचा त्याचा एम्. ए. च्या परीक्षेचा प्रबंध पूर्ण केला. १८५३ मध्ये त्याचे सुरुवातीचे काही समीक्षात्मक लेख अतेच्येस्तवेन्निये जापीस्की  (इं. शी. मदरलँड नोट्स) या नियतकालिकात प्रसिद्ध झाले.

१८५३ पासून चेरनिशेव्हस्कीचा सवरेमेन्निक (इं. शी. द कंटेंपररी) या नियतकालिकाशी निकटचा संबंध होता. १८५५–५६ या काळात या नियतकालिकात त्याचे गोगोलच्या काळातील निबंध व टॉलस्टॉयच्या चाइल्डहूड अँड ॲडलेसन्स ह्या इंग्रजी शीर्षकार्थाच्याकादंबरीवरील लेख प्रसिद्ध झाले. हे लेख पुढे खूप गाजले. सवरेमेन्निक  ह्या मासिकाचा चेरनिशेव्हस्की पुढे संपादक झाला पण ७ जुलै १८६२ रोजी त्याला अटक होऊन ‘पित्रोपाब्लस्क’ या तुरुंगात ठेवण्यात आले. तेथे तो २ वर्षांहून अधिक काळ होता. या काळात त्याने राजकीय, ऐतिहासिक, वाङ्‌मयीन व आर्थिक विषयांवर लेख लिहिले. २० मे १८६४ रोजी त्यास सायबीरियात नेण्यात आले. तेथून तो २७ ऑक्टोबर १८८३ रोजी परतला. तेव्हापासून ६ वर्षेपर्यंत तो ॲस्ट्राखान येथे राहिला.

सौंदर्यवाद आणि वाङ्‌मयीन समीक्षेखेरीज त्याने लिहिलेली श्तो द्येलात ? (इं. शी. व्हाट टू डू) ही कादंबरी प्रसिद्ध आहे. क्रांती व समाजवाद हा देशमुक्तीचा एकच मार्ग आहे, असे प्रतिपादन करणारी रशियन भाषेतील ही पहिलीच कादंबरी. Prolog (इं. शी. प्रलॉग) ही कादंबरी सुद्धा लेखकाच्या सामाजिक ध्येयवादाचे दर्शन घडविते. ह्या कादंबरीत त्याने क्रांतिकारी नायकाचे चित्रण केलेले आहे. सराटव्ह येथे तो मृत्यू पावला.

पांडे, म. प. (इं.) देव, प्रमोद (म.)