गॉल, चार्ल्‌स द : (२३ नोव्हेंबर १८९० — ९ नोव्हेंबर १९७०). फ्रान्सला प्रतिष्ठा करून देणारा कणखर, समर्थ व निःस्वार्थी नेता. उत्तर फ्रान्समधील लील या गावी जन्म. तो सेंट सीर या लष्करी विद्यालयाचा पदवीधर होता. त्याच्या वडिलांचे नाव हेन्‍री व आईचे नाव मॅलिएत. त्याची पत्नी ईव्हान व्हेंद्रा ही एका उद्योगपतीची मुलगी होती.

चार्ल्‌स द गॉल

  

पहिल्या महायुद्धातील कामगिरीबद्दल त्यास सन्मान्य सेनेचा क्रॉस मिळाला होता. १९२५ साली संरक्षणाच्या दृष्टीने त्याने केलेल्या पाहणीच्या अहवालातील सूचनेवरूनच फ्रान्सची जगप्रसिद्ध मॅजिनो तटबंदी उभारण्यात आली. १९३१ साली त्यास लेफ्टनंट करण्यात आले. १९३३ साली त्याने लिहिलेल्या फ्रान्स आणि त्याचे लष्कर या ग्रंथाने त्यास प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. या ग्रंथातील लष्कराच्या यांत्रिकीकरणाची व विमानदल उभारण्याची त्याची सूचना अमलात आली असती, तर दुसऱ्या महायुद्धातील फ्रान्सवरील आपत्ती टळली असती. दुसऱ्या महायुद्ध काळातील लॉआनवरील जर्मन हल्ला त्याने आपल्या चिलखती पथकाच्या साह्याने अत्यंत बहादुरीने परतविला. परिणामतः त्यास जनरलच्या पदावर बढती देण्यात आली.

६ जून १९४० रोजी फ्रान्सचे त्या वेळचे पंतप्रधान पॉल रेनो यांनी त्यास राष्ट्रीय संरक्षण खात्याचे उपमंत्री नेमले. रेनोचे मंत्रिमंडळ लवकरच गडगडले. मार्शल पेताँच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या नव्या मंत्रिमंडळाने शरणागती पतकरली (१८ जून १९४०). त्यामुळे त्याच वेळी द गॉलने बी.बी.सी. वरून फ्रेंच सैनिकांना लढाई चालू ठेवण्याचे आवाहन केले व फ्रान्स विमोचन चळवळीची स्थापना करून तो तिचा प्रमुख झाला. त्याबद्दल त्यास फ्रेंच लष्करी न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा घोषित केली व त्याची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश दिला. पण त्याने न डगमगता ३ जून १९४३ रोजी अल्जिअर्समध्ये राष्ट्रीय स्वातंत्र्य समिती स्थापन केली. १९४४ मध्ये तिचे रूपांतर त्याने हंगामी सरकारात करून इंग्लंड-अमेरिकेच्या भेदनीतीला तोंड देत शेवटपर्यंत फ्रान्सच्या स्वातंत्र्याकरिता जिद्दीने लढा दिला. परिणामतः १५ ऑगस्ट १९४४ रोजी मुक्त पॅरिसमध्ये त्याच्या आगमनप्रसंगी जनतेने त्याचे अभूतपूर्व स्वागत केले. नोव्हेंबर १९४५ मध्ये त्यास चौथ्या प्रजासत्ताकाचा हंगामी अध्यक्ष म्हणून एकमताने निवडून त्याचा बहुमान केला पण डाव्या गटाने पाठिंबा काढून घेतल्यामुळे त्याने २६ जानेवारी १९४६ रोजी आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. एप्रिल १९४७ मध्ये त्याने द रॅली ऑफ द फ्रेंच पीपल ही संघटना स्थापन केली. निवडणुकीत अपयश आल्यामुळे १९५३ साली ही संघटना त्याने बरखास्त केली. पुढे तो राजकारणातून निवृत्त झाला. परंतु १३ मे १९५८ रोजी अल्जीरियात लष्करी उठाव झाल्यानंतर जनतेने त्यालाच त्याच्या अटी मान्य करून पुन्हा पंतप्रधान  केले (१ जून १९५८). फ्रान्सच्या स्थैर्याच्या दृष्टीने त्याने तयार केलेल्या नवीन संविधानास २८ सप्टेंबर १९५८ रोजी सार्वमताने मान्यता मिळाली. २१ डिसेंबर १९५८ रोजी त्याची पाचव्या प्रजासत्ताकाच्या अध्यक्षपदी निवड झाली. १३ फेब्रुवारी १९६० रोजी अण्वस्त्र स्फोट करून फ्रान्सला त्याने अण्वस्त्रधारी राष्ट्रांत स्थान मिळवून दिले. त्याने १९६२ मध्ये अल्जीरियास स्वातंत्र्य देऊन तो प्रश्न समाधानकारक रीत्या सोडविला. २२ ऑगस्ट १९६२ रोजी त्याच्या खुनाचा अयशस्वी प्रयत्न झाला. १९ डिसेंबर १९६५ रोजी पुन्हा दुसऱ्यांदा त्याची अध्यक्षपदी निवड झाली. एप्रिल १९६९ मध्ये वरिष्ठगृहाचे अधिकार मर्यादित करणाऱ्या त्याच्या संविधानदुरुस्तीस मान्यता न मिळाल्यामुळे त्याने आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. इच्छा असती तर तो आपली मुदत संपेपर्यंत अध्यक्षपदावर राहू शकला असता पण त्याने सत्तेचा मोह कधीच धरला नाही. इतकेच नव्हे, तर अध्यक्ष म्हणून देऊ केलेले निवृत्तिवेतनही त्याने नाकारले.

त्याने आपल्या कारकीर्दीत फ्रेंच वसाहतवाद नष्ट करून मादागास्कर आणि इतर फ्रेंच वसाहतींना स्वातंत्र्य दिले. अमेरिकेला फ्रान्समधला लष्करी अण्वस्त्रांचा तळ हलवावयास लावला. सामायिक बाजारपेठेची निर्मिती करून त्याने यूरोपमध्ये फ्रान्सचे नेतृत्व स्थापन केले. 

अमेरिका आणि रशिया या दोन प्रतिस्पर्धी राष्ट्रांचे जागतिक राजकारणावर १९४५ नंतर जे प्रभुत्व स्थापन झाले होते ते नष्ट करणे, पश्चिम यूरोपचे अमेरिकेवरील अवलंबित्व संपवून तेथे फ्रान्सचे नेतृत्व स्थापन करणे, हे त्याच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख सूत्र होते. राष्ट्रीय सार्वभौमत्व परराष्ट्रीय संबंधात पुन्हा आग्रहपूर्वक प्रस्थापित करण्याचा त्याचा निश्चय असल्यामुळे यूरोपीय सामायिक बाजारपेठेत सहभागी होऊनही राष्ट्रीय स्वातंत्र्य संकोचित करणाऱ्या अशा आंतरराष्ट्रीय संस्था त्याने निर्माण होऊ दिल्या नाहीत. १९६३ पासून पुढे त्याने ब्रिटनला यूरोपीय सामायिक बाजारपेठेत प्रवेश देण्याला सतत विरोध केला. आंतरराष्ट्रीय तणाव विरोधी विचारप्रणालीतून होत नसून सत्ता-संघर्षातून होतात, असे त्याचे मत असल्यामुळे अमेरिकेच्या साम्यवादविरोधी मोहिमेबद्दल त्याला विशेष आस्था नव्हती. अमेरिकेने व्हिएटनाममध्ये चालविलेल्या युद्धाला त्याचा तीव्र विरोध होता. आंतरराष्ट्रीय व्यापारातील डॉलरच्या प्रभुत्वाची त्याने निंदा केली.

पश्चिम व पूर्व यूरोपात सलोखा निर्माण करण्याचे त्याचे धोरण होते. कोनराड आडनौअर याच्या नेतृत्वाखाली पश्चिम जर्मनीशी त्याने स्नेहाचे संबंध प्रस्थापित केले होते. लाल चीनला मान्यता देऊन धैर्य, स्वतंत्र बाणा व समयसूचकता दाखविली. त्याने लिहिलेल्या युद्धकालीन आठवणींची व इतर पुस्तकांची गणना उच्च दर्जाच्या साहित्यात करण्यात येते. पराभूत मनोवृत्तीने पछाडलेल्या फ्रान्सच्या जनतेत त्याने नवचैतन्य आणि आत्मविश्वास निर्माण करून स्वतःचे नाव अजरामर केले. ओत मार्न येथील आपल्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने तो मरण पावला.

संदर्भ : 1. Werth, Alexander, De Gaulle, London, 1965.

    २. आपटे, शि. शं. फ्रान्सचा तारणहार द गॉल, पुणे, १९६५.

खोडवे, अच्युत