भूपेन हझारिका हाझारिका (हझारिका), भूपेन : (८ सप्टेंबर १९२६ – ५ नोव्हेंबर २०११). आसाममधील एक ख्यातनाम गीतकार, संगीतकार, गायक व चित्रपटनिर्माते. भूपेन हजारिका/हाझरिका म्हणूनही परिचित. जन्म आसाम-मधील सदिया (जि. तिनसुकिआ) येथे. नीलकांत आणि शांतिप्रिया हझारिका यांच्या दहा मुलांमधील हे ज्येष्ठ अपत्य. लहानपणीच आईने त्यांना संगीताची गोडी लावली. वडिलांचे मूळ गाव नाझिरा (जि. शिवसागर ) पण लहानपणापासून त्यांना वडिलांबरोबर बऱ्याच ठिकाणी फिरावे लागले. या काळातच १९३६ पासून त्यांच्या गीतलेखन व गायनाची सुरुवात झाली.’ बिस्व निजोय नोजोवान’ हे गाणे त्यांनी इंद्रमालती या असमिया चित्रपटासाठी प्रथम गायिले (१९३९). येथूनच त्यांच्या कलाजीवनास आरंभ झाला.

 

त्यांचे शिक्षण अनुक्रमे सोनाराम हायस्कूल (गौहाती), धुब्री गव्हर्नमेंट हायस्कूल व तेजपूर हायस्कूल येथे झाले. मॅट्रिकनंतर (१९४०) त्यांनी कॉटन कॉ ले ज म धू न बी.ए. व बनारस हिंदू विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात एम्.ए.ची पदवी संपादन केली (१९४६). त्यांनी काही काळ गौहातीच्या ऑल इंडिया रेडिओवर काम केले. १९४९ मध्ये त्यांना अमेरिकेतील कोलंबिया विद्या-पीठाची शिष्यवृत्ती मिळाली. तिथे त्यांनी पीएच्.डी.ची पदवी मिळविली (१९५२). भारतात व परदेशांत विद्यार्थिदशेत त्यांचा अनेक गीतकार व संगीतकारांशी संपर्क आला. त्यांची काही गीते कोलंबिया विद्या-पीठाच्या मंचावर सादर केली गेली. अमेरिकेत प्रियंवदा पटेल या युवतीशी त्यांचा परिचय झाला व तिच्याशी त्यांनी विवाह केला (१९५०).

 

अमेरिकेतून परतल्यावर १९५३ मध्ये हझारिका ‘इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन’ (इप्टा) या डाव्या विचारसरणीच्या नाट्यकला-क्षेत्राकडे ओढले गेले. १९५५ मध्ये गौहातीत भरलेल्या इप्टाच्या तिसऱ्या अखिल आसाम परिषदेच्या स्वागत समितीचे ते सचिव होते. त्यांनी अनेक असमिया चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन व गीतरचनाही केली. एरा बतर सूर (१९५६), शकुंतला (१९६१), प्रतिध्वनी (१९६४), लाटी-घाटी (१९६६), चिक मिक बिजुली (१९६९), स्विकरोक्ती (१९८६), सिराज (१९८८) हे काही त्यांपैकी महत्त्वाचे चित्रपट होत.

 

गौहाती नभोवाणी केंद्रावरही त्यांनी काही काळ नोकरी केली. पुढे गौहाती विद्यापीठात ते अध्यापक झाले. निवृत्तीनंतर त्यांची आसाम साहित्य सभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली (१९९३).

 

कल्पना लाजमी या चित्रपटसृष्टीतील व्यावसायिक सहकारी त्यांच्या-बरोबर अखेरपर्यंत कार्यरत होत्या. त्यांच्या सहकार्याने त्यांनी एक पल (१९८६), रुदाली (१९९३), दर्मियान : इन बिटवीन (१९९७) आणि क्यों ? (२००३) हे बंगाली-हिंदी चित्रपट केले. यांशिवाय त्यांनी दमन : व्हिक्टिम ऑफ मॅरिटल व्हॉयलन्स या इंग्रजी चित्रपटाचेही दिग्दर्शन केले. हझारिकांच्या गीतांचे बंगाली व हिंदी रूपांतर करून त्यांचे पार्श्वगायन या चित्रपटांमधून केले होते. सई परांजपेंचे पपीहा, साक्ष, मिल गयी मंझिल मुझे आणि एम्. एफ्. हुसेन यांच्या गजगामिनी या चित्रपटांच्या निर्मितीतही त्यांचा लक्षणीय सहभाग होता. सुमारे एक हजार भावगीते, लघुकथा, निबंध, कविता, प्रवासवर्णने, बालगीते इ. त्यांनी लिहिले. या लेखनाला आसामच्या लोकसंस्कृतीची पार्श्वभूमी लाभली असून त्यांनी आपल्या गीतांतून तिचा अन्वयार्थ विशद केला आहे. त्यांनी पारंपरिक असमिया संगीत आणि लोकगीते यांतून एक विलक्षण चित्रजवनिका ( टॅपिस्ट्री) विणली. त्यांच्या बऱ्याच गीतांचे बंगाली आणि हिंदी भाषांत अनुवाद व ध्वनिमुद्रण झाले असून ती मुख्यतः मानवता, विश्वबंधुभाव, जातिनिरपेक्षता आदी कल्पनांवर आधारली आहेत.

 

आसाम विधानसभेवर ते नौबाइच्या (जि. लखिमपूर) मतदारसंघातून निवडून आले. स्वतंत्र आमदार म्हणून ते १९६७ – ७२ या काळात कार्यरत होते. भारतीय जनता पक्षातर्फे त्यांनी निवडणूक लढवली (२००४) पण त्यात त्यांना अपयश आले. त्यांना अनेक मानसन्मान लाभले. त्यांपैकी पद्मश्री (१९७७), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९८७), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९९२), पद्मभूषण (२००१), संगीत नाटक अकादमी छात्रवृत्ती (२००८), पद्मविभूषण पुरस्कार (२०१२) इ. काही प्रतिष्ठेचे व महत्त्वाचे होत.

 

दीर्घकाळच्या आजाराने त्यांचे मुंबईत निधन झाले.

ओक, चारुशीला