गोरेंको, आना अंद्रेअव्ह्‌न : (२३ जून १८८९—५ मार्च १९६६). प्रसिद्ध सोव्हिएट कवयित्री. ओडेसा या गावी एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याच्या कुटुंबात तिचा जन्म झाला. तिचे शालेय शिक्षण कीव्ह येथे झाले (१९०७). परंतु तिचे बरेचसे वास्तव्य लेनिनग्राड (सेंट पीटर्झबर्ग) येथे झाले. न्यिकलाय गुमिल्योव्ह या प्रसिद्ध कवीशी १९१० साली तिचा विवाह झाला परंतु १९१८ मध्ये ते विभक्त झाले, ‘आख्मातोव्हा’ ह्या टोपण नावाने तिने लेखन केले. १९११ साली अपल्लोन  या पेट्रग्राड येथील नियतकालिकात तिच्या आरंभीच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या.

आरंभी ‘अक्मेइस्त’ या प्रतिकवादविरोधी कवींच्या गटाशी गोरेंकोचा निकटचा संबंध होता. या काळातील तिचे काही प्रसिद्ध काव्यसंग्रह असे : व्हेचेर (१९१२, इं. शी. ईव्हनिंग) च्योत्की (१९१४, इं. शी. रोझरी) बेलाया स्ताया (१९१७, इं. शी. व्हाइट फ्लॉक) आणि Anno domini MCM XXI (१९२२). पुढे (१९२५ पासून १९४० पर्यंत तिने काव्यलेखन केले नाही. १९४० साली इज शेस्ती क्नीग (इं. शी. फ्रॉम द सिक्स बुक्स) व १९४३ साली इज्ब्रान्नोये (इं. शी. सिलेक्शन) हे तिचे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. १९४६ साली या कवयित्रीस सोव्हिएट लेखक संघातून काढून टाकण्यात आले तथापि १९५८ नंतर तिला सोव्हिएट रशियात एक श्रेष्ठ कवयित्री म्हणून पुन्हा मान्यता मिळाली. १९६० साली न्यूयॉर्कमध्ये तिची ‘पयेमा ब्येज गिरोया’ (इं. शी. पोएम विदाउट अ हीरो) ही कविता प्रसिद्ध झाली. म्यूनिकमध्ये १९६३ साली प्रसिद्ध झालेली तिची ‘रेक्विएम’ ह्या इंग्रजी शीर्षकार्थाची कविताही तितकीच लक्षवेधक आहे.

तिची आरंभीची कविता नव-अभिजाततावादी असून ती प्रतीकवादविरोधी आहे. तीत कवयित्रीच्या व्यक्तिगत आयुष्यातील आशानिराशांचे प्रतिबिंब पडलेले आढळते. युद्धकाळात गोरेंकोने आपल्या कवितेद्वारा उत्कट देशभक्ती आणि शांतताप्रेम यांचे उज्ज्वल दर्शन घडविले. तिने काही समीक्षात्मक लेख लिहिले व भाषांतरेही केली. डिसेंबर १९६४ मध्ये तिला इटलीत ‘एतना ताओर्मीना’ पारितोषिक देण्यात आले. १९६५ च्या जूनमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाने तिला ‘डॉक्टर’ ही सन्माननीय पदवी दिली. याच वर्षी तिने ब्येग व्हे्‌रमेनि  (इं. शी. द पेस ऑफ टाइम) हे आपल्या कवितांचे संकलन रशियात प्रकाशित केले. रशियन काव्याच्या दुसऱ्या सुवर्णयुगाची ती एक मान्यवर प्रतिनिधी समजली जाते. मॉस्को येथे ती निधन पावली. 

पांडे, म. प. (इं.) देव, प्रमोद (म.)