आ.१. कीटॉप्टेरस : (अ) शरीराचा अग्रभाग (आ) मध्य भाग (इ) पश्च भाग: (१) मुख, (२) परिमुखीय रोम (मुखाभोवतीचे राठ केस), (३) मोठे पक्ष (पर), (४) चूषक (शोषक अवयव), (५) तीन पंख्यांपैकी पहिला पंखा.

नलिकाकृमि: ॲनेलिडा (वलयी) संघातील कीटोपोडा वर्गाच्या पॉलिकीटा गणातील सीडेंटेरिया उपगणातील नळीसारख्या घरात राहणाऱ्या अनेक जातींच्या कृमींना नलिकाकृमी हे नाव दिलेले आहे. या कृमींच्या नलिका बाह्यत्वचेच्या ग्रंथींच्या स्रावापासून तयार  झालेल्या असतात. या स्रावाविषयी फारशी माहिती नाही. कधी हा स्राव मऊ व श्लेषी (बुळबुळीत) असतो, तर कधी तो चर्मपत्रासारखा चिवट अथवा शृंगासारखा कठीण असतो त्यात पुष्कळदा विजातीय पदार्थ (वाळूचे कण, शंखांचे बारीक तुकडे वगैरे) मिसळलेले असतात. सर्प्युलासारख्या कृमींच्या स्रावात कॅल्शियमाची लवणे असतात. या नलिका बहुधा बाह्य पदार्थांना कायमच्या चिकटविलेल्या असतात.

जास्त विशेषित कृमींमध्ये संरचनात्मक बदल झालेले दिसून येतात आणि त्यांमुळे नलिकांमध्ये राहण्याकरिता त्यांचे अनुकूलन झालेले (ज्या प्रक्रियेने प्राणी विशिष्ट परिस्थितीत राहण्यास योग्य होतो अशी प्रक्रिया झालेली) असते. शीर्ष सामान्यतः अस्पष्ट असते पण त्याच्या वरील उपांगे (अवयव) मोठी व रूपांतरित असणे शक्य असते कित्येकदा शीर्ष लहान असून त्यावर संस्पर्शक (सांधेयुक्त स्पर्शेंद्रिये) व डोळे नसतात. शरीराचे बहुधा ‘वक्ष’ आणि ‘उदर’ असे दोन भाग पडलेले असतात.

पार्श्वपाद प्रऱ्हसित (लहान झालेले) असतात आणि शूकांची (काट्यांची) जागा दंतुर अंकुशांच्या ओळींनी घेतलेली असते. कारण नळीत पुढे जाण्याकरिता त्यांचा उपयोग होतो. क्लोम (कल्ले) बहुधा शरीराच्या पुढच्या टोकाकडे असतात. शत्रूपासून आणि सुकण्यापासून रक्षण करण्याकरिता नलिका बंद करता येतात. अन्नग्रहणाचे विविध प्रकार आढळले असले, तरी बहुतेक बद्ध (रुतलेले) नलिकाकृमी सूक्ष्मजीव व अन्नकण यांवर उदरनिर्वाह करतात आणि भक्ष्य गोळा करण्याकरिता पक्ष्माभिकांचा (पेशीपासून निघालेल्या केसासारख्या वाढींचा) उपयोग करतात. स्नायूंच्या वा पक्ष्माभिकांच्या हालचालींमुळे नलिकेत होणाऱ्या जलभिसरणामुळे (पाण्याच्या संचारामुळे) श्वसन व उत्सर्जन  (निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया)

सुलभ होते. नलिकाकृमींची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

आ. २. टेरेबेला : (१) संस्पर्शक, (२) डोळा, (३) क्लोम, (४) गुद, (५) न्यूरोपोडिया (पार्श्वपादाचा अधर खंड), (६) श्लेष्मल (बुळबुळीत द्रव स्त्रवणाऱ्या) ग्रंथी, (७) संतुलन पुटी (शरीराचा तोल सांभाळणारे ज्ञानेंद्रिय), (८) खालचा ओठ, (९) वरचा ओठ.

कीटॉप्टेरस ही कृमी अतिविशेषित असून इंग्रजी U अक्षराच्या आकाराच्या नलिकेत राहतो. ही नलिका वाळूत अथवा चिखलात रुतलेली असून चर्मपत्रासारखी चिवट असते. शरीराचे स्पष्ट तीन भाग पडलेले असतात. मध्य भागावर असलेल्या तीन पंख्यांच्या सतत होणाऱ्या आंदोलनांमुळे नलिकेत पाण्याचे अभिसरण (संचार) चालू राहते आणि त्याचा श्वसनाकरिता उपयोग होतो. या पाण्यातून येणारे सूक्ष्मजीव व कण मुखात ढकलले जातात.

टेरेबेला या नलिकाकृमीची लांबी बरीच असते. डोक्यावर पुष्कळ लांब संस्पर्शक तंतू असून ते श्वसनाचे कार्य करतात. डोक्याच्या लगेच मागे असलेल्या खंडांवर सामान्यतः शाखा असलेल्या क्लोमांच्या कित्येक जोड्या असतात. पार्श्वपाद लहान असतात.

सर्प्युला आणि त्याच्या कुलातील इतर कृमी कॅल्शियमी नलिकांत राहतात. त्यांच्या प्रोस्टोमियमावरील (अभिमुखावरील) स्पर्शकांचे रूपांतराने अर्धगोलाकार क्लोम व पृष्ठीय (वरच्या बाजूचे) क्लोम-तंतू बनतात आणि त्यांचा नलिकेचे द्वार बंद करण्याकरिता प्रच्छदासारखा (झाकणासारखा) उपयोग होतो.

पहा : कीटोपोडा पॉलिकीटा.

गोखले, कुसुम