हुकेन : हा गोड्या पाण्यातील मासा डॅन्यूब सामन या नावानेही ओळखला जातो. कारण तो मूळचा यूरोप खंडातील डॅन्यूब नदीच्या उगमाकडील भागातील आहे. तो डॅन्यूब नदीच्या उजव्या बाजूच्या उपनद्यांतही आढळतो. त्याचा समावेश सामोनिडी कुलात होत असून साल्मो हुको (हुको हुको) असे शास्त्रीय नाव आहे. तो दिसण्यास अटलांटिक सामन [→ सामन] माशासारखा असून त्याचे शरीर टॉर्पेडोच्या आकाराचे व थोडेसेच चपटे असते. त्याचा रंग पाठीवर सगळीकडे काहीसा एकसारखा हिरवट, तपकिरी करडा व पोटाकडे चमकदार असून वय वाढेल तसेतो रंगाने लाल होत जातो. दोन्ही बाजूंवर अगणित फार लहान काळेठिपके असतात. 

 

हुकेन माशाची लांबी १–१.६ मी. असून वजन २०–३० किग्रॅ. असते. बॉझ्निया प्रदेशात १९३८ मध्ये ५८ किग्रॅ. वजनाचा हुकेन आढळला होता तो आजपावेतो सापडलेला सर्वांत मोठा मासा होय. तो मांसाहारी असून लपून बसलेल्या जागेवरून आपल्या भक्ष्यावर, मुख्यतः लहान माशांवर झडप घालतो. त्याची पिले कीटकांच्या अळ्या, कृमी व इतर लहान जीवांवर उपजीविका करतात. विणीच्या हंगामात (मार्च-एप्रिल, कधीकधी मे महिन्यात) तो नदीच्या उगमाकडे स्थलांतर करतो. तेथे तो लहान उपनद्यांतील उथळ खळग्यात अंडी घालून ती वाळूने झाकून टाकतो.मोठ्या पाण्याच्या डबक्यांतही त्याची वीण होते. फलनानंतर ३०–३५ दिवसांनी पिले बाहेर पडतात. त्यांची वाढ झपाट्याने होते. वयात आलेला नर ३-४ वर्षे वयाचा व १ किग्रॅ. वजनाचा, तर वयात आलेली मादी ४-५ वर्षांची व २-३ किग्रॅ. वजनाची असते. हा २० वर्षांपेक्षाही अधिक काळ जगतो.

हुकेन (हुको हुको)
 

 

पश्चिम यूरोपातील देशांत विशेषतः फ्रान्स, स्वीडन, पोलंड, जर्मनी आणि स्पेन या ठिकाणी सामन माशाचा प्रसार करण्यात आला आहे. मत्स्यधन वाढविण्यासाठी त्याचे संवर्धन केले जाते. ही नष्ट होण्याच्या मार्गावरील जाती असल्यामुळे धोक्यात असणारी जाती म्हणून जाहीर करण्यात आली आहे. खूप मोठ्या प्रमाणावर झालेली मासेमारी, प्रदूषण आणि धरण बांधकाम यांमुळे हुकेन माशाची संख्या मोठ्या प्रमाणार कमी झाली आहे. जलविद्युत् केंद्रांमुळे देखील त्याच्या वाढीवर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम झाला आहे. 

 

घरगुती जलजीवालयात हुकेन मासा पाळण्यासाठी सामान्यतः मोठी काचपात्रे (८–१० घ. मी.) लागतात. त्याच्या तळाला वाळू पसरतात. काचपात्राच्या काही भागात तरंगत्या मुळ्यांचे जाळे किंवा दगडगोटे ठेवून आडोसा तयार करतात. रीड वनस्पतीची लागवड करून हा परिणाम साधता येतो. पात्रातील पाण्याचे तापमान सु. १५° से.पर्यंत ठेवतात.गोड्या पाण्याचा अखंड पुरवठा ठेवून हवाही खेळती ठेवावी लागते. पिलांसाठी पाण्याची पातळी कमी ठेवतात. पिलांपासून सुरुवात करावी लागत असली, तरी हुकेन मासे पात्रात चांगले राहतात. त्यांची चांगलीवाढ होण्यासाठी त्यांना नियमित व भरपूर खाद्य देतात. काचपात्रावरझाकण ठेवावे लागते, नाही तर आतील मासे उड्या मारून बाहेर पडतात. 

जमदाडे, ज. वि.

 

हुकेन (हुको हुको)