मिंक : मांसाहारी गणाच्या मुस्टेलिडी कुलातील एक लहान सस्तन प्राणी. याचे कातडे फरसाठी प्रसिद्ध आहे. मुस्टेला प्रजातीत या प्राण्याबरोबरच फेरेट, स्टोट, एरमाइन या फर असणाऱ्या प्राण्यांचाही समावेश आहे. उभयचर प्राण्यांप्रमाणे हा प्राणी काही काल पाण्यात तर जास्त काल जमिनीवर राहतो. हा प्रामुख्याने थंड प्रदेशात आढळतो. अलास्का, कॅनडा व अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांत आढळणाऱ्या मिंकचे शास्त्रीय नाव मुस्टेला व्हीनस हे आहे. यूरोप व आशियात आढळणाऱ्या जातीस मु. ल्युट्रिओला असे म्हणतात.

अमेरिकेत आढळणाऱ्या मिंकची लांबी सु. ५० ते ७० सेंमी. असते. यात १५ ते २० सेंमी. लांबीच्या झुपकेदार शेपटीचा समावेश होतो. वजन सु. १·५ किग्रॅ. असते. शरीर निमुळते, मजबूत व बसके असते. सर्व शरीरावर मऊ, दाट, झळाळी असणारी फर असते. यांचा रंग लालसर उदी ते गर्द चॉकलेटी असतो. हनुवटीवर व मानेच्या खालच्या भागावर पांढरे ठिपके असतात. यांचे पाय आखूड असून मागील पायांची बोटे अर्ध्यापर्यंत जालयुक्त असल्याने त्यांचा पोहण्यास उपयोग होतो. मान लांब व लवचिक आणि कान लहान व गोल असतात. याच्या कातडीवरील फरचे संरक्षण करण्याकरिता राठ केस सर्व शरीरावर पसरलेले असतात. मिंकची फर अत्यंत उच्च दर्जाची समजली जाते व तीस किंमतही पुष्कळ येते. 

अमेरिकन मिंक (मुस्टेला व्हीनस) मिंक सफाईदारपणे पोहतात आणि मासे पकडण्यातही पटाईत असतात. हे प्राणी निशाचर आहेत. माशांखेरीज त्यांच्या आहारात बेडूक, उंदीर, कवचधारी प्राणी, अंडी, गांडूळ, लहान पक्षी यांचाही समावेश असतो. हे फार रक्तपिपासू प्राणी आहेत. स्तनी वर्गात इतके रक्तपिपासू प्राणी फार थोडे आहेत. यांच्या शरीराला एक दुर्गंधीयुक्त वास येतो. हा वास गुदद्वाराजवळ असलेल्या ग्रंथींच्या स्त्रावाचा असतो. स्कंकच्या दुर्गंधीयुक्त स्त्रावाचा फवारा सोडला जातो, तर मिंकच्या ह्या स्त्रावाचे थेंब टाकले जातात. यांची बिळे ओढे, नद्या, डबकी, तळी किंवा समुद्र यांच्या काठावर असतात. ही बिळे उंदीर किंवा इतर तत्सम प्राण्यांनी केलेली असतात. त्यांना मारून मिंक बिळाचा ताबा घेतात. काही दिवस त्यांत राहिल्यावर ते बाहेर पडून दुसरी बिळे शोधतात व या प्रकारे एका समूहाचे अनेक समूह तयार होतात.

मिंकचा विणीचा हंगाम साधारणपणे फेब्रुवारीच्या सुमारास सुरू होतो. एक नर अनेक माद्या फलित करतो. यांचा गर्भावधी साधारणपणे ३० ते ५६ दिवसांचा असतो. एक मादी एका वेळेस चार ते आठ पिलांना जन्म देते. जन्मतः पिलांना दृष्टी नसते आणि त्यांच्या शरीरावर लहान केस असतात. सुरुवातीस मादी पिलांना अंगावर पाजते पण ५–६ आठवड्यांनी, डोळे जरी उघडले नसले, तरी पिले मांसाचे तुकडे खाऊ लागतात. सु. एक ते दीड वर्षात पिलाची वाढ पूर्ण होते.

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील काही दक्षिणेकडील राज्यांत मिंकची पैदास वाढविण्याकरिता काही क्षेत्रे निर्माण करण्यात आली आहेत. या क्षेत्रांत असणाऱ्या माद्या स्वभावाने रागीट व कधीकधी स्वतःच्या पिलांचीच हत्या करताना आढळल्या आहेत. या पैदाशीत काही उत्परिवर्तित (आनुवंशिक लक्षणांमध्ये आकस्मिक बदल झालेले) मिंक आढळतात व त्यांची फर निराळ्या रंगाची असते, तरी पण सर्व साधारणपणे नैसर्गिक मिंकची फरच जास्त चांगली समजली जाते. या मौल्यवान मिंक फरचा उपयोग स्त्रियांचे कोट करण्याकरिता केला जातो. 

पहा : फर-२.

जोशी, लीना