श्लेगेल, फ्रीड्रिख फोन : (१० मार्च१७७२ – १२ जानेवारी १८२९). जर्मन साहित्यिक व समीक्षक. जर्मन साहित्यिक ⇨आउगुस्ट व्हिल्हेल्म फोन श्लेगेल ह्याचा धाकटा भाऊ. ह्याचा जन्म हॅनोव्हर येथे धर्मोपदेशकाच्या गरीब कुटुंबात झाला. गटिंगन विदयापीठात आणि पुढे लाइपसिक येथे तत्त्वज्ञान आणि साहित्य ह्या विषयांचे त्याने अध्ययन केले.१७९७ मध्ये तो बर्लिनला आला. ⇨लूटव्हिख टीक आणि अन्य काही स्वच्छंदतावादयांशी त्याचा फ्रीड्रिख फोन श्लेगेलपरिचय झाला. पुढल्याच वर्षी येना येथे आपला भाऊ आउगुस्ट ह्याच्यासह त्याने आथेनेउम ह्या नियतकालिकाच्या संपादनात भाग घ्यावयास आरंभ केला त्यात लेखनही केले. ह्याच वर्षी ‘ ऑन द स्टडी ऑफ ग्रीक पोएट्री ’ आणि ‘हिस्टरी ऑफ द पोएट्री ऑफ द ग्रीक अँड रोमन्स’ (दोन्ही इं. शी.) हे दोन निबंध त्याने लिहिले. ग्रीकांनी आपल्या कलेत आणि संस्कृतीत परिपूर्ण सुसंवाद साधलेला होता, असा विचार त्याने ह्या निबंधांतून मांडला. ग्रीक तत्त्वज्ञान आणि संस्कृती ह्यांचा अभ्यास केल्यावाचून शिक्षणात परिपूर्णता येणार नाही, अशी त्याची धारणा होती. जर्मन साहित्यातील स्वच्छंदतावादाच्या प्रवर्तकांपैकी फ्रीड्रिख हा सर्वांत बुद्धिमान आणि सखोल तत्त्वचिंतक होता आणि आथेनेउम च्या माध्यमातून स्वच्छंदतावादाला भक्कम तात्त्विक पाया मिळवून देण्यात त्याचा मोठा वाटा होता. त्याच्या तत्त्वचिंतनावर विख्यात जर्मन तत्त्ववेत्ता मयोहान गोटलीप फिक्टे ह्याचा मोठा प्रभाव होता. फिक्टेच्या तत्त्वमीमांसेत आणि ज्ञानमीमांसेत मूळ वा अंतिम अस्तित्वाची मीमांसा करताना ‘अहम्‌ ’ला वा आत्मतत्त्वाला स्वतंत्र आणि सार्वभौम असे स्थान देण्यात आलेले आहे. फ्रीड्रिखने त्याचा अन्वयार्थ लावताना त्या ‘अहम्‌ ला ‘कवीचा व्यक्तिगत अहम्‌ मानले आणि कवीने आपल्या अंतरात्म्याचा सातत्याने विकास घडवून आणला पाहिजे अशी भूमिका घेतली, तसेच स्वच्छंदतावादी कविता म्हणजे ‘ सतत विकसत जाणारे वैश्विक काव्य ’ अशी धारणा व्यक्त केली. ह्या वैश्विक काव्याचा आशय जीवनाची सारी अंगे सामावून घेण्याइतका व्यापक होत जाईल, असे त्याचे प्रतिपादन होते.

फ्रीड्रिख १८०२ साली पॅरिसला आला. पॅरिस हे त्या काळी प्राच्य-विदयाभ्यासाचे यूरोपातील एक प्रमुख केंद्र होते. फ्रीड्रिखने तेथे संस्कृत भाषेचे अध्ययन केले. त्यातूनच युबर डी श्प्राख ऽ उण्ट वाइझहाइट डेअर इण्डर (१८०८, इं. शी. ऑन द लँग्वेज अँड विजडम ऑफ द इंडियन्स) हा त्याचा गंथ निर्माण झाला. तौलनिक इंडो-जर्मानिक भाषाशास्त्राचा, भारतीय भाषांच्या अभ्यासाचा आणि तौलनिक भाषाशास्त्राचा आरंभबिंदू म्हणून हा गंथ महत्त्वाचा मानला जातो.

विख्यात ज्यू तत्त्वज्ञ ⇨मोझेस मेंडेल्सझोन ह्याची ज्येष्ठ कन्या आणि झीमॉन व्हाइट ह्याची घटस्फोटित पत्नी डोरोटेआ हिच्याशी फ्रीड्रिखने विवाह केला होता (१८०४). ह्या दोघांनीही रोमन कॅथलिक पंथाचा स्वीकार केला (१८०८). फ्रीड्रिख स्वच्छंदतावादाची आपली संकल्पना आणि मध्ययुगीन ख्रिस्ती धर्मकल्पना ह्यांची एकात्मता साधण्याचा प्रयत्न करू लागला. विचार आणि कृती ह्यांचे पूर्ण स्वातंत्र्य, विमुक्त प्रेम ह्यांचा निष्ठेने पुरस्कार करणारा फ्रीड्रिख आपल्या उत्तरायुष्यात प्रतिगामित्वाकडे झुकत चालला. उजव्या विचारसरणीच्या काँकॉर्डिआ या कॅथलिक नियतकालिकाचा तो संपादक झाला (१८२०). ह्याच नियतकालिकातून आपल्या पूर्वीच्या विचारांना आणि निष्ठांना छेद देणारे लेखन केल्यामुळे तो आणि त्याचा भाऊ आउगुस्ट ह्यांच्यांत अंतराय निर्माण झाला.

फ्रीड्रिखच्या इतर लेखनात लुसिंड ऽऽ (१७९९, इं. भा. १९१३-१५) ही कादंबरी, आलार्‌कॉस (१८०२) ही शोकात्मिका ह्यांचा समावेश होतो. लुसिंड ऽऽ ही अंशतः आत्मचरित्रात्मक अशी मुक्त प्रेमाची कहाणी आहे. ती फारशी यशस्वी ठरली नाही तथापि तीत त्याची पत्नी डोरोटेआ आणि भावजय कारोलिन यांनी जर्मनीतील स्वच्छंदतावादी चळवळीत पार पाडलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकांचे दर्शन घडते. यांशिवाय त्याने व्हिएन्नात१८१० आणि१८१२ मध्ये दिलेली काही व्याख्याने पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली आहेत. त्यांत ए कोर्स ऑफ लेक्चर्स ऑन मॉडर्न हिस्टरी (१८११, इं. भा.१८४९) आणि लेक्चर्स ऑन द हिस्टरी ऑफ लिटरेचर (१८१५, इं. भा.१८१८) ह्यांचा समावेश होतो. त्यांत त्याने आपली नव मध्ययुगाची संकल्पना स्पष्ट केली आहे. त्याचे संकलित साहित्य प्रथम दहा खंडांत (१८२२-२५) प्रसिद्ध झाले, तर१८४६ साली त्यात भर घालून त्याचे पंधरा खंड प्रसिद्ध करण्यात आले. याशिवाय त्याचा भावाबरोबरचा पत्रव्यवहार १८९० मध्येच प्रकाशित झाला होता.

ड्रेझ्डेन येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.