ब्रॅडली, फ्रान्सिस हर्बर्ट: (३० जानेवारी १८४६-१८ सप्टेंबर १९२४). हे चिद्वादी तत्त्ववेत्ते त्यांच्या काळातील सर्व श्रेष्ठ ब्रिटिश तत्त्ववेत्ते म्हणून मान्यता पावले होते. उत्कृष्ट, वादकुशल, शैलीदार गद्याचे लेखक म्हणूनही ब्रॅड्ली प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म क्लॅपम येथे झाला. शिक्षण युनिव्हर्सिटी कॉलेज, ऑक्सफर्ड येथे. १८७० साली त्यांना मर्टन कॉलेज ऑक्सफर्ड येथे फेलो म्हणून निवडण्यात आले. ही फेलोशिप ते लग्‍न करीपर्यंत टिकणारी होती पण ब्रॅड्ली आजन्म अविवाहित राहिले आणि ती जन्मभर टिकली. फ्रेंच साहित्याचाही त्यांचा सखोल व्यासंग होता. ऑक्सफर्ड येथेच त्यांचे निधन झाले.

ब्रॅड्ली यांच्या तत्त्वज्ञानावर सर्वांत अधिक प्रभाव ⇨जी. डब्ल्यू. एफ्. हेगेल (१७७०-१८३१) यांचा आहे पण ते पूर्णपणे हेगेलचेफ्रान्सिस हर्बर्ट ब्रॅड्‌ली अनुयायी नव्हते. पूर्ववयात ब्रिटिश अनुभववादी मताचे आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या उपयुक्ततावादी नीतिमीमांसेचे खंडन त्यांनी केले. ह्या खंडनात ⇨ जॉन स्ट्यूअर्ट मिल (१८०६-७३) हे त्यांचे प्रमुख लक्ष्य होते. पण खंडनाबरोबरच हेगेल वादी वळणाच्या नीतिमीमांसेची आणि तर्कशास्त्राची मांडणीही ब्रॅड्ली यांनी केली. ब्रॅड्ली यांच्या उतारवयात त्यांच्या चिद्वादी सिद्धांतांची चिकित्सा करून आणि त्यांचे खंडन करून ⇨जी. ई. मुर (१८७३-१९५८) आणि⇨बर्ट्रंड रसेल (१८७२-१९७०) यांनी आपल्या वास्तववादी तत्त्वज्ञानाचा पाया घातला. रसेल यांच्या टिकेला ब्रॅड्ली यांनी प्रत्युत्तर देऊन त्यांच्या सिद्धांतांवर टीकाही केली आहे. ह्या तत्त्ववेत्त्यांशिवाय ⇨विल्यम जेम्स (१८४२-१९१०) ज्या ⇨फलप्रामाण्यवादी मताचा पुरस्कार करीत होते, त्याचेही खंडन ब्रॅड्ली यांनी केले आहे. पण जेम्स यांनी अनुभवाच्या स्वरूपाचे जे वर्णन आणि विश्लेषण केले आहे, त्याला ब्रॅड्ली यांची बरीच मान्यता होती.

ब्रॅड्ली यांची नीतिमीमांसा त्यांच्या एथिकल स्टडीज (१८७६, म. शी. नीतिविषयक निबंध) ह्या ग्रंथात मांडण्यात आली आहे. ह्याच्यात मिलच्या सुखवादी-उपयुक्ततावादी नैतिक उपपत्तीचे तसेच कांटच्या नैतिक सिद्धांतांचे त्यांनी खंडन केले आहे आणि हेगेलवादी नीतिमीमासेचे समर्थन केले आहे. मिलच्या सुखवादावरील त्यांचा प्रमुख आक्षेप असा, की फुटकळ इच्छांच्या तृप्तीत सुख असते असे मिल मानतो, पण असे सुख क्षणिक असते, अशा क्षणिक सुखाचा, प्राप्त होताच नष्ट होणाऱ्या सुखांचा संग्रह करता येत नाही व म्हणून ‘अधिकात अधिक सुख’मिळविणे हे माणसाला प्राप्त करून घेता येईल असे साध्य नाही. तेव्हा ‘जे अधिकात अधिक व्यक्तींना अधिकात अधिक सुख प्राप्त करून देते, ते नैतिक दृष्ट्या योग्य कृत्य होय’ह्या मिलप्रणीत तत्त्वापासून नैतिक कृत्याचा निकष लाभत नाही. कांटच्या नैतिक उपपत्तीवरील ब्रॅड्लीची आक्षेप असा, की ती केवळ ‘आकारिक’आहे. म्हणजे हे कृत्य माझे कर्तव्य आहे म्हणून केवळ ते मी करीत असेन तरच माझे कृत्य नैतिक ठरते आणि सार्वत्रिक नियमांचे, सर्वांवर निरपवादपणे बंधनकारक असणाऱ्या नियमांचे पालन करणारी कृत्येच कर्तव्ये ठरू शकतात एवढेच ही उपपत्ती सांगते. पण विशिष्ट माणसांची विशिष्ट प्रसंगी कोणती कर्तव्ये असतात, हे ती सांगू शकत नाही. म्हणजे ती नीतीचा ‘आकार’स्पष्ट करते, पण तिचा ‘आशय’निश्चित करू शकत नाही. नीतीचे समाधानकारक स्पष्टीकरण करू शकणाऱ्या उपपत्तीचे सार ब्रॅड्ली यांना, ‘माझे सामाजिक स्थान आणि त्याची कर्तव्ये’ह्या वचनात आढळते. ह्या वचनाचे विवरण असे, कीव्यक्ती ही मूलतः सामाजिक असते, ती एका विशिष्ट समाजाचा घटक असते, समाजात तिचे एक विशिष्ट स्थान असते आणि ह्या स्थानाशी निगडित अशी जी विशिष्ट कार्ये असतात, ती तिची ‘कर्तव्ये’ असतात. सर्व व्यक्तींनी आपापल्या स्थानाशी निगडीत असलेली कार्ये, म्हणजे आपापली कर्तव्ये पार पाडल्याने सामाजिक जीवनाची धारणा होत असते. ह्या सामाजीक जीवनात त्या विशिष्ट समाजाच्या चैतन्याचा आविष्कार झालेला असतो. ह्या सामाजिक चैतन्याशी, म्हणजे आपल्या समाजाच्या जीवनाशी एकरूप होऊन आपल्या स्थानाशी निगडीत असलेली कर्तव्ये करण्यात नीती असते. नीतीने व्यक्तीला साफल्याचा लाभ करून दिला पाहीजे, हा जो सुखवादी नैतिक उपपत्तीचा आग्रह आहे त्याचे समाधान नीतीच्या ह्या मीमांसेमुळे होते, असे ब्रॅड्ली यांचे म्हणणे आहे. कारण व्यक्ती स्वतःच्या सामाजिक स्थानाशी संबंधित असलेली कार्ये करीत असल्यामुळे त्यांतून तिचे स्वतःचे समाधान होत असते. व्यक्ती मूलतः सामाजिक असल्यामुळे तिचे सामाजिक स्थान हा तिच्या व्यक्तित्वाचा अविच्छद्य भाग असतो आणि त्याच्याशी संबंधित कार्ये करण्यात तिच्या व्यक्तित्वाचे साफल्य असते. पण ह्याबरोबरच नैतिक नियमांनी व्यक्तीच्या विशिष्ट इच्छांचे नियंत्रण केले पाहिजे, असे नियमन करणे, व्यक्तीपुढे आदेश म्हणून उभे राहणे हा नैतिक नियमांचा आधिकार असतो हे जे कांटचे मत आहे, त्याचाही आदर ही नीतिमीमांसा करते, असा ब्रॅड्ली यांचा दावा आहे. कारण व्यक्तीच्या केवळ ‘खाजगी’ इच्छा आणि तिच्या स्वतःच्याच सामाजिक स्थानापासून प्राप्त होणारी कर्तव्ये यांच्यात जेव्हा विरोध असतो, तेव्हा स्वतःच्याच कर्तव्यांचा स्वतःवरील अधिकार मान्य करून त्यांच्या आड येणाऱ्या इच्छांचे दमन करण्यात व्यक्तीची नीती सामावलेली असते.

तर्कशास्त्राविषयीचे ब्रॅड्ली यांचे विवेचन प्रिन्सिपल्स ऑफ लॉजिक (१८८३, तर्कशास्त्राची तत्त्वे) ह्या ग्रंथात आढळते. सर्व निर्णय-जजमेन्ट-हे उद्देश्य-विधेय या स्वरूपाचे असतात, हा पारंपारिक तर्कशास्त्रातील सिद्धांत आणि त्यावर आधारलेला, सर्व प्रमाण अनुमाने संवाक्य ह्या प्रकारची असतात, हा सिद्धांत ब्रॅड्ली नाकारतात. अनेक निर्णय संबंधात्मक स्वरूपाचे असतात व म्हणून अनुमानेही संबंधात्मक असतात, असे त्यांनी प्रतिपादन केले आहे.

पारंपारिक तर्कशास्त्राप्रमाणे मिल यांच्या नवीन अनुभववादी, विगामी तर्कशास्त्रावरही ब्रॅड्ली यांनी टीका केली आहे. ह्या तर्कशास्त्राप्रमाणे सर्व ज्ञान अनुभवापासून लाभले. विशिष्ट संवेदना आणि त्यांच्या प्रतिमा हे अनुभवाचे घटक असतात. भिन्न विशिष्ट संवेदना वारंवार एकत्र लाभत असल्यामुळे त्यांच्यात साहचर्य निर्माण होत असते. (उदा., धुराची संवेदना व विस्तवाची संवेदना) ह्या साहचर्यामुळे जेव्हा आपल्याला धुराची संवेदना लाभते तेव्हा आपल्या मनात विस्तवाची प्रतिमा जागृत होते. येथे विस्तव असला पाहिजे असे आपण म्हणतो. हे अनुमान होय.


ह्यावर ब्रॅड्ली यांची टीका अशी, की अनुमानाला आधारभूत असलेला जो संबंध असतो, तो कधीही विशिष्ट संवेदना व प्रतिमा यांच्यामधील संबंध असू शकत नाही. तो सामान्यांमधील संबंध असावा लागतो. कारण विशिष्ट संवेदना व प्रतिमा क्षणजीवी असतात आणि त्या भूतकालात गडप झाल्यावर त्यांचा पुनरुद्धार करणे अशक्य असते. पण धूर असण्याचा धर्म आणि विस्तव असण्याचा धर्म या सामान्यांमधील संबंध जर आपण ग्रहण केला, तर येथे धूर असण्याच्या धर्माचे विशिष्ट उदाहरण आहे-येथे धूर आहे-ह्यावरून येथे विस्तव असला पाहिजे, हे अनुमान आपण करू शकतो. अनुमानामध्ये नेहमी सामान्यांमधील संबंध अनुस्यूत असतात. विशिष्टांविषयीचे जरी अनुमान असले, तरी ते सामान्यांमधील संबंधांद्वारा होत असते आणि त्यांच्यावर आधारलेले असते. निर्णयाविषयीची ब्रॅड्ली यांची उपपत्ती अशी, की कोणताही निर्णय सत्य असल्याचा दावा करतो, म्हणजे वास्तवतेचे (रिॲलिटी) स्वरूप कसे आहे हे सांगण्याचा दावा करतो. तेव्हा अखेरीस प्रत्येक निर्णय वास्तवतेविषयी असतो वास्तवता हे त्याचे खरेखुरे उद्देश्य असते. उदा., ‘येथे कुत्रा आहे’ हा निर्णय त्याच्या सम्यक् स्वरूपात असा मांडावा लागेल : ‘वास्तवता अशी आहे की येथे कुत्रा आहे’ किंवा ‘वास्तवता कुत्र्याच्या येथे असण्याने विशिष्ट अशी आहे’. निर्णयामध्ये वास्तवतेविषयी विधेयन केलेले असते आणि जे विधेय असते ती सामान्यांची एक रचना असते. उदा., वरील निर्णयात कुत्रा हे एक सामान्य आहे. निर्णयाचे विधेय असलेली ही जी सामान्यांची रचना असते तिच्या घटकांचे परस्परांशी हरतऱ्हेचे संबंध असतात – उदा., अवकाशात्मक, कालिक, कार्यकारणभाव इ.-व म्हणून जरी कोणत्याही निर्णयाचे वास्तवता हे अंतिम उद्देश्य असले, तरी प्रत्येक निर्णय उद्देश्य विधेयाच्या स्वरूपाचा असतो हा सिद्धांत ब्रॅड्ली नाकारतात. निर्णयाचा जो आशय असतो म्हणजे त्याचे विधेय त्याच्यात उद्देश्य विधेयाहून भिन्न असे अनेक संबंध अंतर्भूत असतात.

निर्णयाचे विधेय असलेल्या सामान्यांच्या रचनेत अनुभवापासून लाभणारा आशय सुसंगतपणे समाविष्ट करावा लागतो. असा नवीन आशय, प्राप्त विधेयात सुसंगतपणे समाविष्ट करण्याचा मार्ग म्हणजे अनुमान होय. तेव्हा अंतिम दृष्ट्या निर्णय आणि अनुमान यांच्यात भेद नसतो. वास्तवतेच्या स्वरूपाचे वर्णन करणारी सामान्यांची सुसंगत व समावेशक रचना प्राप्त करून देणे हे दोघांचेही फलित असते. अनुमान म्हणजे केवळ विकसनशील निर्णय होय. वास्तवता ही एक पूर्णपणे सुसंगत व समावेशक अशी व्यवस्था असते, हे अनुमानाचे गृहीत कृत्य होय. हे गृहीत कृत्य तपासून पहाणे हे ब्रॅड्ली यांच्या म्हणण्या प्रमाणे तत्त्वमीमांसेचे कार्य होय. [→ तर्कशास्त्र, आकारिक तर्कशास्त्र, पारंपारिक तर्कशास्त्र, विगामी].ॲपिअरन्स अँड रिॲलिटी (१८९३, आभास आणि वास्तवता) हा तत्त्वमीमांसेवरील ब्रॅड्ली यांचा प्रख्यात ग्रंथ होय. ह्याच्या पहिल्या, ‘आभासा’ला वाहिलेल्या भागात संबंध हा संबंध म्हणूनच आत्मविसंगत किंवा आत्मव्याघाती असतो, असे दाखवून देण्याचाप्रयत्नकेला आहे. जे आत्मव्याघाती आहे ते असू शकत नाही, ते अनुभवाला आले तरी तो आभास असतो आणि म्हणून ज्याचे ज्याचे स्वरूप संबंधात्मक असते ते ते आभासात्मक असते, असा निष्कर्ष यापासून काढला आहे. हा युक्तिवाद थोडक्यात असा : समजा अ आणि ब यांच्यात संबंध आहे. मग ब शी संबंधित अ घेतला तर त्याचे स्वरूप दुहेरी ठरते. अ चे स्वतःचे स्वरूप व ब शी संबंधित असल्यामुळे त्याला प्राप्त झालेले स्वरूप. म्हणजे संबंधित असल्यामुळे अ च्या स्वरूपात भेद निर्माण होतो. आता अ च्या ह्या भिन्न रूपांमध्ये परस्पर संबंध असला पाहिजे. म्हणजे वरील युक्तीवादाला अनुसरून ह्या प्रत्येक रूपामध्ये भेद असला पाहिजे. पण हे भेदही परस्परसंबंधित असले पाहिजेत. म्हणजे प्रत्येक भेदही विभाजित होत असला पाहिजे …… तेव्हा जे संबंधित असते ते संबंधित असल्यामुळे त्याच्या स्वरूपाचे अंतर्गत विभाजन होत होत त्याचे स्वतःचे असे स्वरूप उरत नाही. ते संबंधित असते पण ते असे काही असत नाही. हा मूळ आत्मव्याघात होय. आता अवकाश आणि काल, वस्तू आणि तिचे गुण, कार्यकारणभाव, कृती, व्यक्ती व तिचे अनुभव इ. अस्तित्वाचे सर्व प्रकार हे संबंधात्मक असल्यामुळे आभास आहेत. ही ब्रॅड्ली यांच्या तत्वमीमांसेची खंडनात्मक, निषेधक बाजू झाली. ह्या तत्त्वमीमांसेची विधायक बाजू अशी : एखादे अस्तित्व आभासरूप आहे असे म्हणून त्याची वासलात लावता येत नाही. ते आभासात्मक असले, तरी असते. जे आत्मव्याघाती असते ते आभासात्मक असते, ह्या म्हणण्यात अभिप्रेत असलेले मूलभूत तत्त्व असे, की जे वास्तव आहे ते सुसंगत असले पाहिजे आणि जे कोणत्याही अर्थाने आहे ते वास्तवतेत समाविष्ट असल्यामुळे वास्तवता सर्वसमावेशक आणि आत्मसुसंगत असली पाहिजे. ब्रॅड्ली यांचा तिसरा मुद्दा असा, की जे आहे तो एक अनुभव असला पाहिजे, अनुभूती किंवा अनुभूत असा विषय असला पाहिजे, कारण अनुभवाशी संबंधित नसलेल्या अशा अस्तित्वाची कल्पनाही आपण करू शकत नाही (अशी कल्पना करण्यातच आपण त्याचा अनुभवाशी संबंध जुळवून आणतो.). तेव्हा निष्कर्ष निघतो असा निघतो तो असा, की वास्तवता हा पूर्णपणे सर्वसमावेशक, आत्मसुसंगत, संबंधांच्या पलीकडे असलेला असा अनुभव आहे. ह्याला ब्रॅड्ली ‘कैवल्य’ (ॲब्सोल्यूट) किंवा ‘केवल वास्तवता’ वा ‘केवल सत्ता’ (ॲब्सोल्यूट रिॲलिटी) असे नाव देतात.जे संबंधात्मक असते ते आभासात्मक असते पण ते असते ह्या म्हणण्यात प्रथमदर्शनी भासणाऱ्या आत्मविसंगतीचा परिहार ‘अस्तित्व’ आणि ‘वास्तवता’ यांच्यात भेद करून ब्रॅड्ली करतात. जे अनुभवाशी कोणत्याही प्रकारे संबंधित असते, ते अर्थात वास्तवतेत अंतर्भृत असते. पण ते किती प्रमाणात आत्मसुसंगत आणि समावेशक आहे ह्यावरून त्याच्या वास्तवतेची इयत्ता (ग्रेड) ठरते. सुसंगती आणि समावेशकता हे वास्तवतेचे निकष आहेत. अंतिम दृष्ट्या पाहता हे दोन भिन्न निकष नव्हेत. एखादी गोष्ट पूर्णपणे समावेशक नाही, ह्या म्हणण्याचा अर्थच तिच्याबाहेर किंवा तिच्या पलीकडे काहीतरी आहे असा होतो. म्हणजे ती गोष्ट स्वतःपलीकडे असलेल्या कशाशी तरी संबंधित असते आणि म्हणून वर दिलेल्या युक्तिवादप्रमाणे आत्मव्याघाती असते. एखादी गोष्ट जितकी कमी समावेशक तितकी ती अधिक बाह्य अस्तित्वाशी संबंधित असते आणि म्हणून  ती अधिक आत्मविसंगत असते. म्हणजे ती कमी वास्तव असते. तेव्हा वास्तवतेच्या इयत्ता असतात आणि पूर्णपणे समावेशक आणि पूर्णपणे आत्मसुसंगत असणारे कैवल्य हेच पूर्णपणे वास्तव असते.ब्रॅड्ली यांची तत्त्वमीमांसा हा ब्रिटिश केवल चिद्वादाचा परमोत्कर्ष बिंदू होय. त्यांच्यानंतर मुर आणि रसेल यांच्या वास्तववादी आणि अनेकतावादी तत्त्वज्ञानाचा उदय झाला व ब्रिटिश तत्त्वज्ञानाने पूर्णपणे वेगळे वळण घेतले.पहा : चिद्वाद.

संदर्भ :    1. Church, R. W. Bradley’s Dialectic, London, 1942.

          2. Eliot, T. S. Knowledge and Experience in the Philosophy of F. H. Bradley, London, 1964.

          3. Moore, G. E. Some Main Problems of Philosophy, London, 1953. 4. Wollheim, Richard, F. H. Bradley, London, 1959.

रेगे, मे. पुं.