घरटे : एखाद्या प्राण्याने अंडी घालण्यासाठी आणि त्यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या पिल्लांची जोपासना करण्यासाठी किंवा विसाव्यासाठी अथवा स्वसंरक्षणासाठी तयार केलेल्या सुरक्षित जागेला घरटे म्हणतात. घरटे म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यांसमोर पक्ष्याचे घरटे उभे राहते, पण प्राणिजगतात फक्त पक्षीच घरटे बांधतात असे नव्हे तर कित्येक अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेले) प्राणी, मासे, उभयचर (जमिनीवर व पाण्यात राहणारे), सरीसृप (सरपटणारे) आणि सस्तन प्राणीही घरटी तयार करतात. घरटे बांधण्याच्या प्रक्रियेतील पहिली महत्त्वाची पायरी म्हणजे योग्य जागेची निवड ही होय. अंडी घालण्याच्या किंवा पिल्ले जन्मण्याच्या आधीपासून प्राणी अतिशय श्रम घेऊन घरटे बांधण्याची तयारी करीत असतात. आसपासची परिस्थिती आणि अंड्यातून बाहेर पडणाऱ्या पिल्लांची स्थिती यांवर ही तयारी बऱ्याच अंशी अवलंबून असते.

अपृष्ठवंशी प्राणी : सामान्यतः कीटक आपली अंडी जमिनीत उथळ भोक पाडून पुरतात किंवा वृक्षांच्या सालीच्या भेगांत घालतात. पुष्कळ कीटकांच्या माद्यांना अंडनिक्षेपक (अंडी घालण्याकरिता असणारी विशेषित संरचना) असल्यामुळे सालीत अथवा एखाद्या प्राण्याच्या शरीरात (परजीवी म्हणून) अंड्यांचे अंतःक्षेपण (आत घालणे) करता येते. काही कीटक अंड्यांसाठी अतिशय जटिल निक्षेपागार (अंडी घालण्याकरिता सुरक्षित जागा) तयार करतात. याचे अगदी सामान्य स्वरूप खोल भोकासारखे किंवा बोगद्यासारखे असून त्यात कीटक अंडी घालतात. पिल्लांसाठी त्यात भरपूर अन्न ठेवून त्याचे तोंड बंद करतात. निश्चित डिंभावस्थेनंतर (भ्रूणानंतरच्या स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणाऱ्या व प्रौढाशी साम्य नसणाऱ्या सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्थेनंतर) रूपांतरण होणाऱ्या उच्च कीटकांमध्ये ही सोय आढळते.

शेणकिडा जमिनीत भोक पाडून त्यात अंडी घालतो. त्याच्या अगदी वौशिष्ट्यपूर्ण डिंभावस्थेत शेणाचा अन्न म्हणून उपयोग होतो म्हणूनच त्याच्या घरट्यात शेणाच्या लहान गोळ्यांचा भरपूर साठा केलेला असतो. मधमाश्या, गांधील माश्या व करवती-माश्या या हायमेनॉप्टेरा गणातील कीटकांचे घरटे खूपच परिश्रम घेऊन बांधलेले असते. मधमाश्यांची पोळी ही लोंबती घरे असतात. करवती-माश्या वृक्षांना भोके पाडून त्यांच्या तळाला अंडी घालतात. अंड्यांतून बाहेर पडलेले डिंभ आतील साल खातात. पुष्कळ एकाकी मधमाश्या व गांधील माश्या जमिनीत किंवा लाकडाला भोके पाडून त्यांत अंडी घालतात. मधमाशी आपल्या डिंभासाठी पराग किंवा पराग व मधाचे मिश्रण अन्न म्हणून ठेवते. गांधील माश्यांच्या पिल्लांसाठी कोळी, नाकतोडे, माश्या इ. प्राणी अन्न म्हणून ठेवलेले असतात. कुंभारिणीचे घरटे चिखलाचे असते व त्याला खास अस्तर असते. अंडी घातल्यावर त्यात योग्य अन्न ठेवून ती ते बंद करते.

वाळवी (उधई), मधमाश्या व गांधील माश्या यांच्यासारख्या समूह करून राहणाऱ्या कीटकांची घरटी फार परिश्रम घेऊन आणि पिल्लांची काळजी घेण्याच्या व त्यांचे रक्षण करण्याच्या दृष्टीने बांधलेली असतात. मधमाश्या व गांधील माश्या यांच्या फक्त माद्याच व बहुधा कामकरी माश्या घरटे बांधण्याचे काम करतात. मधमाश्यांचे पोळे मेणाचे असून त्याची रचना जटिल असते व त्यात प्रत्येक अळीसाठी वेगळा कप्पा असतो. वाळवी आपले वारूळ जमिनीत तयार करते आणि ते नर व माद्या मिळून तयार करतात.

काही पतंगांच्या अळ्या रेशमी धाग्याचे घरटे विणतात. मुंग्यांची घरटी जमिनीत किंवा पानांमध्ये असतात. मुंग्या आपले कोष व अळ्या इकडून तिकडे ने-आण करताना पुष्कळदा दिसतात. प्रतिकूल हवामान व इतर धोक्यापासून त्यांचे रक्षण करण्यासाठी त्या हे करीत असतात. मुंगळे आपले घरटे जमिनीत बीळ पाडून करतात.

आ. १. अंड्यांचा कोष आपल्या बरोबर नेणारा कोळी. कोळ्यांच्या माद्या आपली अंडी एका पिशवीत बंद करून त्यांचे रक्षण करतात. मादीच्या तनित्रापासून (रेशमी धागा तयार करणाऱ्या इंद्रियापासून) काढलेल्या रेशमी धाग्यापासून ही पिशवी विणलेली असते. ती झाडाच्या सैल सालीत किंवा दगडाखाली पानांमध्ये टांगती ठेवलेली असून मादी त्यावर पहारा करते. लांडगा-कोळ्याची मादी पिशवी आपल्याबरोबर घेऊन हिंडते. पाणकोळ्याची मादी मिशवी आपल्याबरोबर घेऊन हिंडते. पाणकोळ्याचे घरटे विशेष उल्लेखनीय आहे. पाण्याखाली एक रेशमी पिशवी तयार केलेली असून ती पाणवनस्पतींना घट्ट बांधलेली असते. तिच्यात हवा भरलेली असते. कोळी वेळोवेळी आपल्या पायात पृष्ठभागावरून हवेचा बुडबुडा आणून पिशवीत घालतो. अशा प्रकारे तयार केलेल्या घरट्यात हा पाणकोळी राहतो.

उष्ण कटिबंधात मुबलक आढळणारा कूटद्वार-कोळी जमिनीत सु. १५ सेंमी. खोल आणि ३ सेंमी. व्यासाचे बीळ तयार करून त्याला रेशमी अस्तर लावतो. बिळाच्या जमिनीवरील टोकाच्या कडा सारख्या करून त्याच्यावर झाकण अथवा कूटद्वार बसवितो. हे झाकण रेशमी धाग्यांचे दाट जाळे आणि माती यांचे बनविलेले असून बिळाच्या काठावर रेशमाच्या बिजागरीनेच बसविलेले असते व ते बाटलीच्या बुचाप्रमाणे घट्ट बसते. झाकणाच्या वरच्या बाजूचा रंग आजूबाजूच्या जमिनीच्या रंगासारखा असल्यामुळे ते बंद असताना मुळीच दिसत नाही. पिल्ले आईच्याबरोबर तिच्या बिळात पूर्ण वाढ होईपर्यंत म्हणजे सु. आठ महिन्यांपर्यंत सुद्धा असातात. नंतर बाहेर पडून ती आपल्याकरिता स्वतंत्र बिळे करू लागतात.

आर्थ्रोपोडा संघातील प्राण्यांखेरीज इतर अपृष्ठवंशी संघांतील प्राणी क्वचितच घरटे तयार करतात. काही ॲनेलिड कृमी ज्या बिळात राहतात त्यात आणि कित्येक नलिका-कृमी आपल्या नलिकेतच अंडी घालतात. काही जळवा सापेक्षतः थोडी अंडी घालतात व पिल्ले त्यांच्या अंगाला चिकटून त्यांच्या बरोबर जातात. एक समुद्री अर्चिन (हेमीॲस्टर फिलिप्पाय ) आपली पिल्ले पाठीवरील भ्रूणधानीत ठेवतो, तर एक तारामीन (ॲस्टेरिॲस स्पायरॅबिलिस) मुखाभोवती असणाऱ्या भ्रूणधानीतून पिल्ले आपल्याबरोबर नेतो.

पृष्ठवंशी प्राणी : मासे : सर्वच मासे घरटे तयार करीत नाहीत. सायक्लोस्टोमाटा वर्गातील लँप्री मासा घरटे तयार करतो. प्रजोत्पादनाच्या काळात नर आणि मादी ज्या ठिकाणी पाणी

आ. २ स्टिकलबॅक (कंटकपृष्ठ) माशाचे घरटे.

स्वच्छ असेल अशा उथळ जागी जातात आणि तळावरील दगड हलवून, पुढेमागे करून फक्त वाळू असलेला एक उथळ वाटोळा खळगा तयार करतात हे लँप्रीचे घरटे होय. मादी त्यात अंडी घालते व तेथेच त्यांचे निषेचन (फलन) होऊन सु. एक महिन्याने डिंभ बाहेर पडतात. ॲमिया काल्व्हा  हा मासादेखील सरोवराच्या कडेला दलदलीच्या जागी अशाच तऱ्हेचा सु. ३०-३५ सेंमी. व्यासाचा एक खळगा करून त्यात अंडी घालतो. काही मार्जारमीन अशीच खळग्यासारखी घरटी तयार करतात. स्टिकलबॅक (कंटकपृष्ठ) मासे गोड्या पाण्यात त्याचप्रमाणे समुद्रात राहणारे आहेत. ते पाण्यातील तणाची घरटी बांधतात. घरटे बांधण्याचे काम नर करतो. त्याच्या वृक्कापासून (मूत्र तयार करणाऱ्या इंद्रियापासून) निघणाऱ्या एक प्रकारच्या चिकट स्रावाने तणे एके ठिकाणी चिकटवून तो सुंदर घरटे बनवितो. मादीने घरट्यात अंडी घातल्यावर नर त्यांचा ताबा घेतो व ती फुटून पिल्ले बाहेर पडेपर्यंत त्यांची काळजी घेतो. भारतीय चित्रमत्स्य (रेनबो मासा) व मलेशिया द्वीपकल्पातील गुरामी (ऑस्फ्रोनेमस ) हे मासे समुद्रपृष्ठावरील वनस्पतींमध्ये हवेचे बुडबुडे फुंकून घरटे तयार करतात एक भारतीय चित्रमत्स्याचे (रेनबो फिश) घरटे.प्रकारच्या लाळेमुळे हे बुडबुडे टणक आणि टिकावू झालेले असतात. सयामी उडत्या माशाचे घरटे असेच हवेच्या बुडबुड्यांचे असते. मादी अंडी घालू लागली म्हणजे नर एकेक अंडे उचलून बुडबुड्यांच्या पुंजक्यात ठेवतो. तो अंड्यांची काळजी घेतो. सायक्लिडी कुलातील मासे, काही मार्जारमीन व सिल्युरिडी कुलातील काही मासे (उदा., शिंगाळा) या माशांचे नर (काही जातींत नर आणि मादी) मुखगुहेचा (तोंडातील पोकळीचा) किंवा ग्रसनीचा (घशाचा) उपयोग भ्रूणधानीसारखा (भ्रूण ठेवलेल्या पिशवीसारखा) करून त्यात अंडी व पिल्ले बाळगतात. पिल्ले मोठी होऊन मुखातून बाहेर पडेपर्यंत नराला बहुधा उपाशी रहावे लागते. अश्वमीन (सीहॉर्स) आणि नलमीन (पाइपफिश) यांच्या नरांच्या उदरावर भ्रूणधानी असते. पिल्ले बाहेर पडेपर्यंत अंडी या भ्रूणधानीत असतात. गियानात आढळणाऱ्या ॲस्प्रेडो माशाच्या मादीची अंडी नेण्याची रीत विलक्षण असते. प्रजोत्पादनाच्या काळाच्या सुमारास शरीराच्या अधर बाजूची त्वचा छिद्रिष्ट (खळगे किंवा भोके असलेली) होते अंडी घातल्यानंतर ती शीर्ष, उदर आणि युग्मित पक्षांच्या (हालचालीस उपयुक्त असणाऱ्या त्वचेच्या स्नायुमय घड्यांच्या, परांच्या) खालच्या पृष्ठाला चिकटतात व प्रत्येक अंडे एका खळग्यात बसते.


उभयचर : उभयचर क्वचितच घरटे तयार करतात. घरटे असल्यास चिखलात केलेल्या एका लहान खळग्यासारखे असते, तर कधी अंड्यांच्या पुंजक्याभोवती पान गुंडाळलेले असते. काही सॅलॅमँडर खडकाखाली किंवा ओंडक्यांखाली लहान खळग्यात अंडी घालतात. मादी अंड्यांचे रक्षण करते. पाण्यात घातलेल्या बेडकाच्या अंड्यांना जेलीसारख्या पदार्थाचे घट्ट आवरण असते. त्यावर फेस असतो. या फेसाची बाहेरची बाजू कठीण होऊन अंड्यांवर संरक्षक थर तयार होतो आणि या सगळ्यांचे तरंगते घरटे तयार होते. हायला  वंशातील वृक्षवासी बेडकाचा नर चिखलाची कुंडी तयार करतो त्यात असलेल्या पाण्यात मादी अंडी घालते. अंडी फुटून भैकेर (बेडकांचे डिंभ) बाहेर पडतात व रूपांतरणाने त्यांच्यापासून प्रौढ प्राणी तयार होईपर्यंत ते या कुंडीतच राहतात. फायलोमेडुसा  वंशातील बेडूक शिंपी पक्ष्याच्या घरट्यासारखे पान गुंडाळून घरटे तयार करतात व मादी त्यात अंडी घालते.

सरीसृप : सरीसृपांची घरटी साधी असतात. उथळ खळग्यांमध्ये किंवा मातीत ते अंडी घालतात. खळगे काळजीपूर्वक झाकलेले असल्यामुळे ओळखू येत नाहीत. पुष्कळ साप अशाच प्रकारे खळग्यात, बिळात किंवा मातीत अंडी घालतात. विरोळा आपली अंडी तणाचा ढिगारा करून त्यात घालतो. अजगर जमिनीवरच अंडी घालतो आणि अंड्यांच्या ढिगाभोवती वेटोळे घालून जवळजवळ दोन महिने त्यांचे रक्षण करतो. या मुदतीनंतर अंडी फुटून पिल्ले बाहेर पडतात.

मगरी (मगराची मादी) आपली अंडी रात्री वाळूत वा जमिनीत सु. ६० सेंमी. खोल बीळ खणून त्यात घालते. बीळ तयार झाल्यावर त्याच्या बुडाशी ती सु. २०-३० अंडी घालते व ती वाळूने अथवा मातीने झाकते व नंतर त्यावर पुन्हा अंडी घालते. या दुसऱ्या गटातील अंड्यांची संख्या पहिल्या गटातल्या इतकीच असते. नंतर ती बीळ इतके बेमालूम बुजवून टाकते की, बाहेरून त्याची जागा ओळखू येत नाही. अंड्यांचे रक्षण करण्याकरिता मगरी नेमाने घरट्यावर झोपते. अंड्यांत पिल्लांची पूर्ण वाढ झाल्यावर ती एक प्रकारचा कर्कश आवाज करतात. तो ऐकल्यावर ती खड्डा उकरून पिल्लांना बाहेर काढते. घडियालची मादी अंडी घालण्याकरिता वाळूत खोल खड्डा खणून त्यात अंडी घालते. मगरीप्रमाणेच अंड्यांचे दोन गट असतात. पहिल्या गटातील अंडी घालून झाल्यावर मादी वाळूच्या एका जाड थराने (सु. ३० सेंमी. जाड) ती झाकते व त्यावर अंड्यांचा आणखी एक थर घालून घरटे बुजवून टाकते. अमेरिकेतील ॲलिगेटरची मादी नदीच्या किंवा तलावाच्या काठावर आपले घरटे बांधते. कुजणाऱ्या पालापाचोळ्याचा सु, ९० सेंमी. उंचीचा एक ढिगारा ती तयार करते. अशा काही ढिगाऱ्यांच्या बुडाचा व्यास सु. २५० सेंमी. असतो. या ढिगाऱ्याच्या शेंड्यावर ती एक बीळ करते व त्यात सु. २० सेंमी. खोलावर अंडी घालून बीळ बंद करते.

समुद्रातील वा गोड्या पाण्यातील कासवांची (कूर्म) मादी किनाऱ्यावरील वाळूत खड्डा खणून त्यात अंडी घालते व तो बुजविते.

पक्षी : प्रजोत्पादनाच्या काळात नर आणि मादीची जोडी जमल्यावर हे जोडपे घरटे बांधण्याच्या तयारीला लागते. घरटे ज्या क्षेत्रात बांधावयाचे ते क्षेत्र निवडण्याचे काम नर करतो, परंतु प्रत्यक्ष घरट्याची जागा मादी ठरविते.

अंडी व पिल्ले सुरक्षित रहावीत म्हणून पक्षी घरटी बांधतात. आपल्या चोचींचा आणि पायांचा उपयोग करून सामान्यतः मादी घरटे बांधते परंतु थोड्या जातींत फक्त नरच घरटे बांधतो तर पुष्कळ जातींत नर आणि मादी दोघेही हे काम करतात. पक्ष्यांची घरटी सामान्यतः गवत, काटक्या, झाडांची साल, पिसे, कागदांचे तुकडे, चिंध्या, दोऱ्यांचे तुकडे, चिखल, केस, तंतू इ. पदार्थांचा उपयोग करून बनविलेली असतात. निरनिराळे पक्षी घरटी बांधण्याच्या कामी वेगवेगळे पदार्थ वापरतात.

आ. ४. टिटवीचे घरटेपक्ष्यांची घरटी विविध प्रकारची असतात. काही अगदी साधी, तर काही अतिशय कौशल्याने तयार केलेली असतात. टिटवीचे घरटे अगदी साधे असते. त्याला घरटे हे नाव देता येणार नाही, पण अंडी घालण्याच्या जागेला घरटे म्हणतात म्हणूनच त्याला घरटे म्हणावयाचे. थोडीशी जागा खरडून त्या ठिकाणी टिटवी अंडी घालते. कुररीचे घरटेही असेच असते. लावा, रानकोंबडा व इतर शिकारीचे पक्षी जमीन खरवडून त्या ठिकाणी गवताच्या काही काड्या किंवा दोनचार पाने टाकतात व नंतर तेथे अंडी घालतात. या पक्ष्यांच्या अंड्यांचे रंग भोवतालच्या परिस्थितीशी इतके मिळतेजुळते असतात की, ती मुळीच दिसत नाहीत व त्यामुळे त्यांचे रक्षण होते.

कावळा, घार, होला, गिधाड, पाणकावळा, बलाक इ. पक्षी शिरकुट्यांची व लहानमोठ्या काटक्यांची घरटी तयार करतात. पक्ष्यांच्या आकारमानाप्रमाणे व गरजेप्रमाणे ती लहानमोठी असून झाडे, इमारती अथवा खडकांच्या कड्यांवर बांधलेली असतात. घरटे एखाद्या माच्यासारखे असून त्याच्या मध्यभागी वाटीसारखा खळगा असतो व तो गवत, पिसे इ. मऊ पदार्थांनी आतून मढविलेला असतो.आ. ५. कावळ्याचे घरटे


तांबट, सुतार यांच्यासारखे काही पक्षी झाडांच्या खोडांत अथवा फांद्यांत खोल बिळे करून त्यांचा घरटी म्हणून उपयोग करतात. या बिळांना मऊ पदार्थांचे पातळ अस्तर असते वा अस्तर मुळीच नसते. पिवळ्या गळ्याची रानचिमणी, टिट वगैरे पक्ष्यांची अशीच बिळे असतात. अशा प्रकारची बिळे रिकामी असली, तर इतर पक्षी घरटी म्हणून ती वापरतात. घुबडे, धनेश, भारतीय बदके इ. पक्षी झाडाच्या ढोलीचा घरटे म्हणून उपयोग करतात. भारतातील रहिवासी बदकांच्या प्रजोत्पादनाचा काळ नैर्ऋत्य मॉन्सूनाच्या वेळी असतो. त्यांची घरटी तलावांच्या काठी अथवा तलावात असणाऱ्या झाडांवर उंच जागी असणाऱ्या ढोल्यांत असतात, म्हणून तलावातील पाण्याच्या पातळीत बरीच वाढ झाली, तरी घरट्याला धोका पोहोचत नाही. सर्वत्र आढळणाऱ्या करड्या धनेशाच्या प्रजोत्पादनाचा काळ मार्च ते जून असतो. नर आणि मादीची आ. ६. सुतार पक्ष्याचे घरटे जोडी जमल्यानंतर मादी एखाद्या उंच झाडावर असलेल्या ढोलीत शिरते आणि तेथे अंडी घालते. मादी ढोलीतच राहते आणि ढोलीचे दार स्वतःची विष्ठा आणि नराने आणलेला चिखल यांच्या मिश्रणाने लिंपून बंद करते. या भिंतीकरता वापरलेले मिश्रण अतिशय कठीण व मजबूत होते आणि त्यामुळे मादी व तिची अंडी अथवा पिल्ले यांना पूर्ण संरक्षण मिळते. या भिंतीत चोच शिरू शकेल एवढी फट ठेवलेली असते. अंडी फुटून बाहेर पडलेली पिल्ले सु. १५ दिवसांची होईपर्यंत मादी घरट्याच्या आतच राहते. या काळात नर वेळीवेळी चोचीतून खाद्यपदार्थ आणून आपली चोच फटीतून आत घालून मादीला भरवतो. पिल्ले १५ दिवसांची झाल्यावर मादी आपल्या चोचीने ढोलीची भिंत फोडते व बाहेर पडते. पण बाहेर पडल्यावर ती ढोलीचे दार पुन्हा लिंपून पिल्लांना ढोलीत बंद करून ठेवते. नर आणि मादी दोघेही पिल्लांना खाऊ घालतात. पिल्ले स्वतंत्रपणे अन्न मिळविण्यालायक झाली म्हणजे आईबाप त्यांना ढोलीतून बाहेर काढतात.

आ. ७. वेड्या राघूचे दगडातील घरटेकाही पक्षी नदी, ओढे किंवा तलाव यांच्या काठावरील दरडीत बोगद्यांसारखी घरटी तयार करतात. वेडा राघू, खंड्या हे पक्षी याची उदाहरणे होत. हे पक्षी आपल्या चोचीने खणण्याचे काम करतात व पायांनी माती मागे लोटतात. बोगदे काही सेंमी. पासून काही मी. पर्यंत लांब असतात. आतल्या टोकाशी बोगदा बराच रुंद असतो. या भागाला अंडकक्ष म्हणतात व पक्षी या ठिकाणी अंडी घालतो. हुप्पी पक्षी इमारतींच्या भिंती, छते इ. ठिकाणी असलेल्या लांब बिळात किंवा झाडांच्या पोकळीत अंडी घालतात. या बिळात गवत, चिंघ्या आणि केरकचरा कसा तरी पसरलेला असतो.

आ. ८. भांडीकाच्या बोळक्यासारख्या चिखलाच्या घरट्यांचा समूह. काही घरटी निवळ चिखलाची बनविलेली असतात, तर काही चिखलात इतर पदार्थ मिसळून त्यांची बनविलेली असतात. भांडीक, शीळ घालणारा कस्तूर, कस्तूरक, मार्टिन इ. पक्षी अशा प्रकारची घरटी बांधतात. भांडीक पक्ष्याच्या दोन तीन जातींपैकी एक चिखलाची बोळक्यासारखी घरटी बांधते. हे पक्षी पाण्याच्या डबक्यांच्या काठावरील चिखल चोचीत घेऊन त्यात लाळ मिसळून त्याच्या गोळ्या बनवितात आणि या गोळ्यांचे एकावर एक थर रचून घरटी तयार करतात. या घरट्यांचा समूह असून त्यात ६०० पर्यंत घरटी असतात. ही घरटी सामान्यतः कड्यांवर किंवा पुलांच्या कमानींखाली बांधलेली असतात.

हळदी, कोतवाल, माशीपकड्या, बुलबुल, शुकिका (आयोरा), चष्मेवाला, मिनिव्हेट, खाटीक इ. पुष्कळ पक्षी फांद्यांच्या दुबेळक्यात वाटीसारखी घरटी बांधतात. ती गवत, वेगवेगळ्या प्रकारचे तंतू, लोकरीचे धागे इ. पदार्थ कोळिष्टकांनी एकेठिकाणी घट्ट चिकटवून बनविलेली असतात. घरटे फांद्यांना एके जागी घट्ट बांधण्याकरिता सुद्धा कोळिष्टकांचा उपयोग केलेला असतो.आ. ९ हळदी पक्ष्याचे वाटीसारखे घरटे

सर्व जातीच्या मुनिया, तांबूस पोटाचा सातभाई वगैरे पक्षी चेंडूच्या आकाराचे किंवा वर घुमट असलेले घरटे बांधतात हे घरटे गवत, बांबूची पाने, लहान डहाळ्या, बारीक मुळ्या यांचे बनविलेले असून झुडपांमध्ये जमिनीपासून सु. १००—१५० सेंमी. उंचीवर असते. घरट्याचे प्रवेशद्वार एका बाजूवर असते.

आ. १०. सूर्यपक्ष्याचे घरटेसूर्यपक्षी (शिंजिर), फूलटोच्या, सुगरण वगैरे पक्ष्यांची घरटी लोंबती असतात. सूर्यपक्ष्याचे घरटे उभ्या आयताकृती (लांबट) पिशवीसारखे असून राहत्या इमारतीला लागून असणाऱ्या एखाद्या झुडपाच्या किंवा वेलीच्या पुढे आलेल्या बारीक डहाळीच्या टोकाला टांगलेले असते. जमिनीपासून ते विशेष उंचीवर नसते. ते गवत, काडीकचरा व कोळिष्टकांचे बनविलेले असून बाहेरून सालीच्या आणि लाकडाच्या बारीक तुकड्यांनी, सुरवंटांच्या विष्ठेने व कोळ्यांच्या अंडावरणांनी झाकलेले असते. त्यामुळे ते लवकर दिसून येत नाही. प्रवेशद्वार एका बाजूवर असून त्यावर ढेलजासारखा एक पुढे आलेला भाग असतो.


आ. ११. सुगरण पक्ष्याचे घरटेसुगरण पक्ष्याचे घरटे लोंबते, मोठ्या कौशल्याने बनविलेले सुंदर असते. घरटे नर तयार करतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला नर घरटी बांधायला सुरुवात करतात. ही घरटी पाण्यात असलेल्या किंवा पाण्यावर आलेल्या बाभळीच्या आणि ताडाच्या झाडांवर बांधलेली असतात. घरटे लांब गळ्याच्या पालथ्या चंबूसारखे असून गवत व भाताच्या रोपांचे सोलून काढलेले धागे, केळीची सोपटे, काथ्या इ. विणून बनविलेले असते. १०-५० नरांचा तांडा एकदम घरटी बांधण्याच्या कामाला सुरुवात करतो. प्रत्येक नर झाडाच्या योग्य डहाळीची निवड करून तिच्याभोवती धाग्यांचा दोर बनवून तो घट्ट गुंडाळतो. हा दोर तयार करावयाच्या घरट्याचा मजबूत पाया व आधार होय. नंतर या दोरापासून लोंबत असलेले सुटे धागे विणून तो एक लोंबता फास तयार करतो व त्याच्या वरच्या भागाच्या प्रत्येक बाजूवर ढेलजा तयार करतो. यांपैकी एकीपासून तो फुग्यासारखा रुंद अंडकक्ष तयार करतो आणि नंतर दुसरीपासून प्रवेश नलिका बनवितो. अंडकक्ष विणून तयार झाल्यावर घरट्यांच्या निवहात (समूहात) माद्या येऊ लागतात. त्या वेगवेगळ्या घरट्यांची तपासणी करतात. प्रत्येक मादी तिला जे आवडेल ते घरटे पसंत करते. ज्या नराने ते बांधले असेल त्याच्याशी तिची जोडी जमते. येथपासून पुढे मादी घरट्याच्या आतला भाग नीटनेटका करते व नर प्रवेशनलिका विणून पुरी करतो. अंडकक्षाला आतून अस्तर नसते परंतु त्याच्या भित्तीत चिखलाच्या गोळ्या बसविलेल्या असतात. घरटे विणण्याचे काम पुरे होताच मादी अंडकक्षात अंडी घालते आणि ती उबविते. नर मात्र एखाद्या जवळच्याच डहाळीवर पुन्हा नवीन घरटे बांधू लागतो. अशा तऱ्हेने तो लागोपाठ तीनचार माद्या तरी मिळवितो.

आ. १२. शिंपी पक्ष्याचे घरटे

फुटकी (रेन- वॉर्ब्‌लर) पक्ष्याचे घरटे नासपतीच्या आकाराच्या पिशवीसारखे असून गवताच्या ततूंनी विणलेले असते. त्याची वरची बाजू उघडी असते अथवा ती बंद असून घरट्याच्या एका बाजूवर प्रवेशद्वार असते. ते उंच गवताच्या उभ्या खोडांना बांधलेले असून लोंबते असते. सामान्यतः जमिनीपासून सु. ६० सेंमी. वा त्यापेक्षाही थोड्या कमी उंचीवर ते असते. शिंपी पक्षी आपले घरटे एखाद्या झुडपावर किंवा झाडावर बांधतो. सहज वळविता येणारी दोनतीन पाने उभी गुंडाळून त्यांच्या कडा घाग्यांनी अथवा कोळिष्टकाने शिवलेल्या असतात. या पानाच्या नसराळ्यात मऊ तंतू, पिंजलेला कापूस, वनस्पतींवरील लव, केस व क्वचित थोडे मऊ गवत घालून घरटे तयार केलेले असते. घरटे बहुधा जमिनीपासून ९० ते १८० सेंमी. उंचीवर असते. घरटे हिरव्या पानांचे बनविलेले असल्यामुळे सहसा दिसून येत नाही. राखी रंगाचा फुटकी पक्षी कधीकधी अशा प्रकारचे घरटे बांधतो.

सस्तन प्राणी : ज्या सस्तन प्राण्यांची पिल्ले असहाय अवस्थेत जन्मतात त्यांनाच पिल्लांच्या संगोपनाकरिता घरटे बांधण्याची आवश्यकता असते. पण बहुतेक खुरी प्राण्यांची पिल्ले जन्मल्यानंतर लगेच मातेबरोबर हिंडूफिरू लागतात त्यामुळे हे प्राणी कोणत्याही प्रकारचे घरटे बांधीत नाहीत. प्लॅटिपस हा अंडजस्तनी (अंडी घालणारा सस्तन) प्राणी नदीच्या अथवा सरोवराच्या काठावर राहण्याकरिता बीळ करतो. प्रजोत्पादनाच्या काळात मादी या नेहमीच्या बिळापेक्षा जास्त खोल बीळ करून त्याला गवत आणि पानांचे अस्तर लावते व त्यात दोन अंडी घालते. बिळाचे दार बंद करून अंड्यांच्या भोवती अंगाचा घट्ट विळखा घालते. अंडी सु. दोन आठवड्यांनी फुटून पिल्ले बाहेर पडतात. पिल्ले जन्मल्यानंतर मादीच्या पोटावरील स्तनग्रंथींच्या छिद्रांतून दूध वाहू लागून तिच्या पोटावरचे केस भिजतात. हे केस चोखून पिल्ले दूध पितात. सु. चार महिन्यांनी पिल्ले बिळातून बाहेर पडतात. शिशुधान-प्राणी (नुकतेच जन्मलेले पिल्लू उदरावरील पिशवीत ठेवणारे कांगारूसारखे प्राणी) आणि वटवाघळे यांची नुकतीच जन्मलेली पिल्ले दुबळी असतात पण मादी त्यांना आपल्याबरोबर घेऊन हिंडते त्यामुळे घरट्याची जरूर नसते.

बहुतेक कृंतक (कुरतडणारे प्राणी) आणि कीटकभक्षक प्राणी बिळे करतात. मोल हा चिचुंदरीसारखा प्राणी झाडांच्या मुळांखाली बीळ करतो. बिळाचा मध्यभाग बराच मोठा व रुंद असून त्याच्यापासून अनेक मार्ग निघून दूरवर गेलेले असतात. चिचुंदरी आपल्या पिल्लांसाठी दगड, लाकडाचे ओंडके याच्या खाली गवत, वाळलेली पाने आणि इतर काडीकचरा यांचे घरटे तयार करते. घरातील उंदीर अडगळीच्या ठिकाणी किंवा जमिनीत फटी अथवा बिळे असल्यास तेथे मऊ पदार्थांचे घरटे तयार करतात. शेतातील उंदीर जमिनीत बिळे करून त्यांची तोंडे गोट्यांनी बंद करतात. वृक्षवासी उंदीर झाडांच्या ढोलीत किंवा कधीकधी फांद्यांत गवत आणि वाळलेली पाने यांचे घरटे तयार करतात. घुशी सामान्यतः गटारात राहतात किंवा जमिनीत मोठी बिळे करतात पण झाडाझुडपात राहणारी घूस झूडपात किंवा जमिनीवर काटक्या, देठ, तंतू इ. पदार्थांचे घरटे तयार करते. खार एखाद्या झाडावर, घराच्या छपरात अथवा भिंतीतल्या बिळात पाने, गवत व तंतू यांचे गबाळ घरटे तयार करते. मात्र उडणाऱ्या खारी झाडाच्या ढोलीत घरटे करतात. ससा जमिनीत बीळ करतो. ऊद मांजर आपल्या पिल्लांसाठी पाण्याच्या काठावर मोठे बीळ तयार करते. या बिळाला पुष्कळ प्रवेशद्वारे असून त्यांपैकी एक पाण्याखाली असते. बीव्हर घरटे (याला घर म्हणणेच योग्य होईल) पाण्यात बांधतो. हे घरटे लाकडांचे असते व ही लाकडे झाडांच्या फांद्या, डहाळ्या वगैरे तोडून तो मिळवितो. घरटे जरी पाण्यात असले, तरी त्यातली राहण्याची खोली नेहमी पाण्याच्या पातळीच्या वर असते. घराभोवतालच्या पाण्याची पातळी कायम ठेवण्याकरिता जरूर तेथे तो लाकडांचे बंधारे बांधतो. ही घरे राहण्याकरिता आणि पिल्लांच्या संगोपनाकरिता बीव्हर वापरतो.

आ. १३. बीव्हरचे घरटे (घर)मांसाहारी प्राणी खऱ्या अर्थाने घरटी तयार करीत नाहीत. वाघ, सिंह वगैरे प्राणी झाडाझुडपांच्या दाट जाळीत किंवा खडकातील गुहांत राहतात व तेथेच पिल्लांचे संगोपन करतात. कोल्हे, लांडगे वगैरे प्राणी जमिनीत मोठी बिळे करतात.

माकडांना घरटे बांधण्याची गरज नसते, कारण जन्मल्याबरोबर पिल्लू आईला चिकटते आणि ती त्याला नेहमी आपल्याबरोबर घेऊन हिंडते. मानवसदृश कपी मात्र घरटी बांधतात. चिंपँझी तिन्हीसांजांच्या सुमारास झाडावर डहाळ्या आणि पाने यांचे ओबडधोबड घरटे बांधतो. नर आणि मादी वेगवेगळी घरटी बांधतात आणि त्यांचा उपयोग एक रात्रच विश्रांती घेण्याकरिता करतात. गोरिलाची मादी रात्री विश्रांती घेण्याकरिता झाडावर डहाळ्या आणि पानांचे घरटे बांधते, तर नर झाडाखाली जमिनीवर घरटे बांधतो. ओरँगउटान झाडावर काटक्या आणि वेली यांचे माच्यासारखे घरटे बांधून त्यात रात्रभर विश्रांती घेतो. कधीकधी हे घरटे झाडाच्या बेचक्यात असते.

कर्वे, ज.नी. जमदाडे, ज. वि.