रुग्णवाहक : रुग्णाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणाऱ्या साधनाला रुग्णवाहक म्हणतात. बहुधा हे साधन स्वयंचिलत वाहन असते. प्रथम घोडागाडी, नंतर मोटारगाडी व त्यानंतर हेलिकॉप्टर आणि विमानांचाही समावेश या साधनात झाला. अधिकाधिक उपयोग मोटारगाड्यांचा होत असल्यामुळे रुग्णवाहक मोटारगाडीला ‘रुग्णवाहिका’ (अँब्यूलन्स) हे नाव रूढ झाले आहे. रुग्णाला रुग्णकक्षातून किंवा भूलकक्षातून शस्त्रक्रियागृहापर्यंत वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनाला ‘रुग्णवाहक ढकलगाडी’ (ट्रॉली) म्हणतात. प्रस्तुत नोंदीत रुग्णवाहिका या साधनावर अधिक भर दिला आहे.

आ. १. इ. स. १८७०-७१ मध्ये वापरलेली ब्रिटिश रुग्णवाहिका चौचाकी घोडागाडी.युद्धभूमीवर जखमी सैनिकाला उपचारासाठी वाहून नेण्याकरिता चौचाकी घोडागाडी वापरण्याची कल्पना फ्रेंचांनी अठराव्या शतकाच्या शेवटास प्रथम उपयोगात आणली. दॉमीनीक झां लारे (१७६६−१८४२) या फ्रेंच शस्त्रक्रियाविशारदांनी हा शोध लावला आणि नेपोलियन यांनी ती कल्पना उचलून धरली. लारे हे स्वतः युद्धाच्या प्रत्यक्ष धुमश्चक्रीत या रुग्णवाहिकेसहित भाग घेत असत. बोरोदीनॉ येथे एका आ. २. (अ) दुसऱ्या महायुद्धातील (१९३९-४५) घडीच्या चार रुग्णडोल्या वाहून नेणारी मोटार रुग्णवाहिका (आ) वाहून नेणारी मोटार रुग्णवाहिका (आ) त्याच रुग्णवाहिकेचा आतील भाग.धुमश्चक्रीत त्यांनी स्वतः चोवीस तासांत दोनशे अवयवच्छेदन शस्त्रक्रिया केल्या होत्या. रुग्णोपचार रुग्णापर्यंत नेऊन पोहोचविण्याचा उद्देशाने रुग्णवाहिका लारे यांनी युद्धभूमीवर नेल्या होत्या. 

    

रुग्णवाहिकांत हळूहळू सुधारणा होत गेल्या आणि रुग्णवाहिकांचा सेनाभाग (रुग्णवाहक दल) स्थापन करण्यात आला. क्रिमियन युद्धाच्या काळात ब्रिटिश सैन्यात अशी व्यवस्था नव्हती. १८५७-५८ मध्ये लॉर्ड सिडनी हर्बर्ट यांच्या रॉयल कमिशनने याकडे लक्ष वेधल्यानंतर रुग्णवाहिका सेवा पद्धतशीरपणे आखली गेली. कालांतराने युद्धातील जखमींपर्यंत प्रथमोपचार नेऊन पोहोचविण्याची कल्पना इतर देशांनीही उचलली आणि १८६४ मध्ये जिनीव्हा येथे रुग्ण व त्यांची सेवा करणाऱ्यांना तटस्थ मानले जाण्याचे ठरून संरक्षण मिळाले.           

आ. ३. जखमी सैनिकाला रुग्णडोलीतून रुग्णवाहक विमानात चढविताना (ट्युनिशिया, दुसरे महायुद्ध). 

रुग्णवाहिका या अर्थाचा इंग्रजी शब्द ‘अँब्यूलन्स’ हा असून तो मूळ लॅटिन शब्द ‘अँब्यूलेर’ यावरून बनला आहे. अँब्यूलेरचा अर्थ हालचाल करणे अथवा फिरणे असा असून त्यावरून आलेला ‘अँब्यूलंट’ हा शब्द ‘फिरते रुग्णालय’ या अर्थाने वापरला होता. आजही सैन्यदलात वापरण्यात असलेली ‘फील्ड अँब्यूलन्स यूनिट’ ही संज्ञा ‘फिरते रुग्णालय पथक’ या अर्थानेच वापरली जाते. 

प्रत्यक्ष वाहनात नंतर सुधारणा होत गेल्या. प्रथम वापरलेल्या चौचाकी घोडागाडीला कमानी स्प्रिंगा बसविलेल्या असल्यामुळे खाचखळग्यांतून जाताना रुग्णाला कमी त्रास होई. मोटारगाडीच्या वापरामुळे वेग व आराम या दोन्हींत वाढ झाली. त्यानंतर मोटार बोटींचा, विमानांचा व हेलिकॉप्टरांचा रुग्णवहनाकरिता आ. ४. जखमी सैनिकासहित हेलिकॉप्टरला बाहेरील बाजूस बांधलेली रुग्णडोलीकरण्यात आलेला उपयोग प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा ठरला.   

रुग्णवाहक आगगाडीची कल्पना क्रिमियन युद्धात १८५५ मध्ये प्रथम सुचली असली, तरी सुरुवातीची अवस्था ओबडधोबड स्वरूपाचीच होती. १९०० च्या सुमारास आफ्रिकेतील बोअर युद्धात ब्रिटिश रेड क्रॉस सोसायटीने मुद्दाम बनविलेली रुग्णवाहक आगगाडी वापरली गेली. पहिल्या महायुद्धाच्या वेळी १९१५ मध्ये अधिक सुधारित रुग्णवाहक गाडी फ्रान्समध्ये प्रथम वापरली गेली. ती इंग्लंडमध्ये बर्मिगहॅम रेल्वे कंपनीने बनविली होती व तीनमध्ये प्रत्येक डब्यात छत्तीस झोपलेले रुग्ण नेण्याची व्यवस्था होती. याशिवाय स्वयंपाक विभाग, सेवेकरी निवास,शस्त्रक्रियागृह इ. सोयी होत्या. दुसऱ्या महायुद्धात अशाच प्रकारच्या आगगाड्या अधिक आधुनिक व वाढीव सुखसोयीसहित वापरण्यात आल्या होत्या. 


दुसऱ्या महायुद्धात रुग्णवाहक विमाने मोठ्या प्रमाणावर वापरली गेली. अतिजलद व अत्यल्प त्रासात युद्धक्षेत्रातून जखमींना योग्य त्या सुसज्ज रुग्णालयात पोहोचविणे शक्य झाले. काही जखमांकडे लवकर लक्ष दिले न गेल्यास भयंकर दुष्परिणाम होतात, उदा., चेहऱ्यावरील जखमा भयंकर विद्रूपतेस कारणीभूत होतात.              

प्रारंभी युद्धातील जखमींना रुग्णालयात नोण्याकरिता उपयोगात आणली गेलेली योजना पुढे अनेक धर्मादाय संस्थांनीही उपयोगात आणली. इंग्लंडमध्ये पहिली मुलकी अँब्यूलन्स ॲसोशिएशन १८७८ मध्ये स्थापना झाली.

इंग्लंडमध्ये १९१४ पूर्वी रुग्णवाहिका सेवा जवळजवळ अस्तित्वातच नव्हती. क्वचितच एखादे मलिन वाहन फक्त संसर्गजन्य रुग्णात हलविण्याकरिता वापरात असे. लंडनसारख्या शहरात पोलिस रुग्णडोली (स्ट्रेचर) वाहून नेणाऱ्या हातगाड्या वापरीत. १९०९ मध्ये सर डब्ल्यू. जे. कॉलिन्स यांनी पार्लमेंटमध्ये एका विधेयकाद्वारे लंडन काऊंटी कौन्सिलमध्ये रुग्णवाहिका सेवा स्थापन करण्याकरिता प्रयत्न केला परंतु त्याला मूर्त स्वरूप १९१५ मध्येच आले. १९१४ मध्ये रॉयल ऑटोमोबइल क्लब या संस्थेच्या काही सभासदांनी ब्रिटिश रेड क्रॉस या संस्थेला आपली मोटारगाडीसहित सेवा घेण्याची विनंती केली. १९१५ च्या जानेवारी महिन्यात जवळजवळ ८३० मोटार रुग्णवाहिका फ्रान्सच्या युद्धभूमीवर पाठविल्या गेल्या.

     

हळूहळू मुलकी व्यवस्थेतही या सेवेचे महत्त्व पटून ब्रिटिश नॅशनल हेल्थ सर्व्हिसचा ‘रुग्णवाहिका सेवा’ हा एक अविभाज्य घटक बनला. १९४६ मध्ये कायद्याने स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांचे रुग्णवाहिका व इतर वाहक साधने आजाऱ्यास, मानसिक दुर्बलता असणाऱ्या, गर्भार किंवा नवप्रसूत स्त्रियांस, जरुर पडल्यास त्यांच्या भागात किंवा भागाबाहेर नेण्याकरिता पुरविणे हे कर्तव्य ठरविण्यात आले. दरवर्षी रुग्णवाहिका सेवेची मागणी वाढतच गेली. १९५०-५१ मध्ये ब्रिटनमध्ये ६८,८९,३७५ रुग्णांनी या सेवेचा फायदा घेतला व १९५६-५७ मध्ये ही संख्या १,४९,७५,३३१ एवढी झाली होती.

      

रुग्णवाहिका सेवा अधिक उपयुक्त होण्याकरिता तीत सतत सुधारणा होत गेल्या. संदेशवहनाद्वारे सतत संपर्कित असणे हा या सेवेचा आत्माच असल्यामुळे ही व्यवस्था जेवढी कार्यक्षम तेवढी सेवा-तत्परता अधिक. ब्रिटनमध्ये ग्रामीण भागात कोठेही आवश्यकता भासल्यास जवळच्या दूरध्वनीवरून ठराविक क्रमांकाला कळविल्यास रुग्णवाहिका उपलब्ध होते. याशिवाय आता बहुसंख्य रुग्णवाहिका नियंत्रकाशी रेडिओ दूरध्वनीने संपर्कित असल्यामुळे, नियंत्रक जरुर त्या ठिकाणी अगदी जवळच्या रुग्णवाहिका चालकाशी प्रत्यक्ष बोलून रुग्णवाहिका पाठवू शकतो. नियंत्रक आणि चालक दोघेही ज्या रुग्णालयात रुग्ण न्यावयाचा असेल तेथील वैद्याशी संपर्क साधून रुग्णाची माहिती देऊ शकल्यामुळे पूर्व सूचना मिळून सर्व पूर्व तयारी करणे शक्य होते.

आ. ५. रुग्णवाहिका रेडिओ नियंत्रक स्थानकः येथून नियंत्रक निरनिराळ्या रुग्णवाहिका चालकांशी संपर्क साधतो.प्रत्येक रुग्णवाहिकेत योग्य ती उपकरणे−मूत्रपात्रासून ते रक्ताधानाकरिता (रक्त देण्याकरिता) वापरावयाच्या बाटल्या धरण्याच्या साधनापर्यंत−असावयासच हवीत. कधी कधी ऑक्सिजन देता  येण्याची सोयही असते. रुग्णवाहिका वापरल्यानंतर ती आतून व बाहेरून स्वच्छ करणे आणि तिच्यातील उपकरणांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असते.

रुग्णवाहिकेबरोबर असणारे कर्मचारी काळजीपूर्वक निवडलेले असतात. त्यांना प्रथमोपचारांचे सखोल ज्ञान असलेच पाहिजे. या कर्मचाऱ्यांत दयाळूपणा, सभ्याता व समर्पकता हे गुण असण्याबरोबरच त्यांची शरीर प्रकृती उत्तम असणे आवश्यक असते. ब्रिटनमध्ये रुग्णवाहिका सेवा लोकप्रिय ठरली आहे. तिथे प्रतिवर्षी दोन कोटी रुग्ण वाहून नेले जातात व रुग्णवाहिका २० कोटी किमी. धावतात.

अमेरिकेसारख्या प्रगत देशातून रुग्णवाहिका सेवेमध्येही विशिष्ट सेवेकरिता खास रुग्णवाहिका वापरात आहेत. प्रतिवर्षी सु. ६,५०,००० रुग्ण (१९७९) हद्द आघाताने तिथे मरण पावतात. त्यांमध्ये निम्म्याहून अधिक पहिल्या तासातच दगावतात. अशा रुग्णाला अगदी सुरुवातीसच योग्य उपचार मिळून तो रुग्णालय पोहोचेपर्यंत तज्ञ वैद्यकीय साहाय्यकाकडून देखरेख झाल्यास तो वाचू शकतो, हे लक्षात येताच अनेक मोठ्या शहरांतून खास रुग्णवाहिका सेवा योजण्यात आल्या. शिकागो शहरात अतिदक्षता व्यवस्था असलेल्या ३६ फिरत्या रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत. या प्रत्येक रुग्णवाहिकेत तीन प्रशिक्षक वैद्यकीय साहाय्यक, सर्व प्रकारची तातडीच्या उपचारांची साधने व विद्युत् हृल्लेख (हृदयक्रियेमध्ये विद्युत् दाबात होणारे बदल दर्शविणारी आलेखरूप नोंद) घेण्याचे साधन असते. विशेष म्हणजे ज्या रुग्णालयात रुग्ण न्यावयाचा त्या रुग्णालयाशी रुग्णवाहिका संपर्कित असल्यामुळे विद्युत् हृल्लेख रेडिओ दूरमापनाद्वारे तेथील तज्ञ वैद्याला मिळून, साहाय्यकांना ताबडतोब योग्य सूचना दिल्या जातात. या साहाय्यकांना सहा महिन्यांच्या संपूर्ण शिक्षणात शारीर, शरीरक्रिया विज्ञान, वैद्यकीय परिभाषा, औषधांचे परिणाम, हृदय-संरोध, तातडीचे बाळंतपण इ. विषय शिकविले जातात.

शिकागोमधील रुग्णवाहिका व्यवस्थेचे फायदे पटल्यामुळे इतर अनेक ठिकाणी तशीच रुग्णवाहिका सेवा ठेवण्यात आली. १९७९ च्या सुमारास २,८७,००० प्रशिक्षित वैद्यकीय साहाय्यक अमेरिकेत काम करीत होते. अशा सुसज्ज रुग्णवाहिकेची किंमत ४०,००० डॉलर होती.

भारतात अनेक सेवाभावी संस्था थोड्याफार मोबदला घेऊन रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देत आहेत. याशिवाय काही मोठ्या शहरांतून प्रसिद्ध रुग्णालये अद्ययावत् रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देत आहेत. इतर देशांप्रमाणेच भारतीय सैन्यात खास रुग्णवाहिका पथके आहेत.

                                                               

भालेराव, य. त्र्यं.