वाम : (बाले). या माशाचा समावेश अँग्विलिफॉर्मिस गणातील म्युरीनिसॉसिडी कुलात करतात. या कुलातील म्युरिनीसॉक्स सिनेरिअसम्यु. टॅलॅबोनॉयडीस या दोन जाती वाम या नावाने ओळखल्या जातात. त्यांचा प्रसार तांबडा समुद्र, भारतात नदीमुखे व समुद्रात, मलयाद्वीपसमूह व ऑस्ट्रेलिया येथे आहे. तसेच भारताच्या सागरी, नदीमुखखाड्यांत व द्वीपकल्पीय भागात गोड्या पाण्यात तो सर्रास आढळतो. याचे शरीर सापासारखे खूपच लांब असते. पाठीवरील, शेपटीवरील व गुदाजवळील पर (हालचालींस व तोल सांभाळण्यास उपयुक्त स्नानुमय घड्या) एकत्र जुळून झालर तयार झालेली असते आणि शेपटी चापट असते. सामान्यतः लांबी ७५ सेंमी. असते पण १५२ सेंमी. पर्यंत लांबीचे मासेही आढळतात. मुस्कट लांबट असते. तोंड मोठे असून डोळ्यांच्या मागे गेलेले असते. दात मोठे व बळकट असतात. त्याचा रंग रुपेरी असून पोटावर तो पांढरा होत जातो. उभा पक्ष (पर) पिवळसर असतो व त्याच्या कडा काळ्या असतात. अंसपक्ष (छातीवरील पर) पिवळा किंवा काळा असतो. म्यु. टॅलॅबोनॉयडीस या जातीचा अंसपक्ष लहान असतो, हे तिचे वैशिष्ट्य होय.

वाममहाराष्ट्रात याच्या चार कुलांतील सहा जाती आढळतात. व्यापारी दृष्ट्या म्यु. टॅलॅबोनॉयडीस ही जाती महत्त्वाची असून ती किनाऱ्यापासून आत समुद्रतळाला राहणारी आहे. तिची दर वर्षी सु. ५,००० टन मासेमारी होते. इतर वाम मासे (यांना इंग्रजीत मोरे म्हणतात) समुद्रकिनारी प्रदेशात, विशेषतः खडकांतील किंवा दगडांतील कपारींत, आढळतात. जगभरच्या जलजीवालयांत ते ठेवलेले असतात. ऑफिक्थिइडी कुलातील पिसोडोनोफीस बोरो ही एकच जाती नदीमुखात आढळते व ती बहुधा वाळूमध्ये सापडते. वाम माशाचे मांस खाण्याच्या दृष्टीने उत्तम असते.

पहा : ईल

जमदाडे. ज. वि.