पत्ते व पत्त्यांचे खेळ: बैठ्या खेळाचा एक लोकप्रिय प्रकार. पत्ते हे सामान्यतः आयताकृती, पातळ पुठ्ठ्याचे किंवा प्लॅस्टिकचे बनवलेले असतात. हौसेने इतर माध्यमांतही पत्ते बनविले जातात. त्यांच्या दर्शनी किंवा पृष्ठभागांवर बदाम (हार्ट), इस्पिक (स्पेड), किलावर किंवा किल्वर (क्लब) व चौकट (डायमंड) या चार प्रकारांतील विशिष्ट चिन्हदर्शक आकृत्या व आकडे दर्शविलेले असतात आणि मागील बाजूवर आकर्षक रंगीबेरंगी सजावट असते. बदाम, इस्पिक, चौकट व किलावर या चार चिन्हांचे प्रत्येकी १३ पत्ते मिळून एकूण ५२ पत्त्यांचा संच किंवा जोड (पॅक किंवा डेक) होतो. बदाम व चौकट या चिन्हांचा रंग तांबडा तर इस्पिक व किलावर यांचा काळा असतो. प्रत्येक चिन्हाच्या १३ पत्त्यांची विभागणी पुढीलप्रमाणे असते : एक्का, दुर्री, तिर्री…. या क्रमाने दश्शीपर्यंत १ ते १० आकड्यांचे पत्ते (न्यूमरल कार्ड्स) व पुढे त्याच क्रमाने गुलाम, राणी आणि राजा हे दरबारी पत्ते वा चित्रपत्ते (कोर्ट किंवा फेस कार्ड्स) असतात. प्रत्येक पत्त्याच्या डावामध्ये अतिरिक्त पत्ता म्हणजे ‘जोकर’ असतो. हे बहुधा दोन असतात. 

लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत भिन्नभिन्न वयोगटांच्या व स्तरांच्या लोकांमध्ये पत्त्यांचे विविध खेळ प्रिय ठरले आहेत. शतकानुशतके अनेकविध कायद्यांच्या बंधनांतूनही या खेळाची लोकप्रियता अखंड टिकून राहिली आहे.  विरंगुळ्याचे, वेळ आनंदात घालवण्याचे एक प्रभावी साधन म्हणून त्यास जसे लोकजीवनात स्थान आहे तसेच समाजामध्ये चारचौघांना घटकाभर एकत्र आणणारे ते एक आकर्षक, रंजनात्मक साधनही आहे. घरगुती बैठ्या खेळाचा एक प्रकार म्हणून जसा तो घरोघरी खेळला जातो, तद्वतच सहलीसारख्या प्रसंगविशेषी खेळला जाणारा सहजसुलभ प्रासंगिक खेळ (पार्टी गेम) म्हणूनही त्यास खास मान्यता लाभली आहे. खेळाव्यतिरिक्त पत्त्यांचे अन्य उपयोगही बरेच आहेत. भविष्यकथनासाठी अथवा शकुनविधीसाठी पत्ते वापरण्याची पूर्वापार प्रथा आहे. एक शैक्षणिक साधन म्हणूनही त्यांचा उपयोग केला जातो. इतिहास, भूगोल, खगोलशास्त्र, राज्यशास्त्र, युद्धनीती, व्याकरण, संगीत इ. विषयांचे सुलभ शिक्षण देण्यासाठी खास शैक्षणिक पत्ते बनवण्यात आले आहेत. पत्त्यांचे जादूचे व हातचलाखीचे खेळही लोकप्रिय आहेत.

पत्त्यांच्या खेळांचा उगम नेमका केव्हा व कुठे झाला, याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. काहींच्या मते या खेळाचा उगम चीनमध्ये इ.स. सातव्या ते दहाव्या शतकांच्या दरम्यान झाला असावा. चीनमध्ये कागदी चलनाचा वापर सातव्या शतकात रूढ होता. या चलनाचाच चिनी लोक पत्त्यांप्रमाणे वापर करीत असावेत. पत्त्यांना चिनी नाव ‘Chih P’ai’ (कागदी तिकिटे) असे आहे, ते या दृष्टीने अन्वर्थक आहे. काहींच्या मते या खेळाचा उगम भारतात झाला असावा. प्राचीन चतुर्भुज हिंदू देवतांच्या हातांमध्ये सामान्यतः चक्र, खड्ग (किंवा तलवार), पात्र व दंड असत, त्यांच्याशी यूरोपात सापडलेल्या आद्य पत्त्यांवरील चिन्हांचे साम्य आढळून येते. त्याचप्रमाणे प्राचीन काळी भारतात लोकप्रिय असलेल्या दशावतारी (गंजीफा), बुद्धिबळे व पत्ते यांतील साम्यस्थळांवरून (उदा., राजा, वजीर यांसारखी चिन्हे) या खेळाचा उगम भारतात इ.स.८०० च्या सुमारास झाला असावा, असे अनुमान काढता येते. आणखी एका उपपत्तीनुसार पत्ते व बुद्धिबळे हे दोन्ही खेळ प्राचीन काळातील आदिम मानवाच्या दैवी कौल घेण्याच्या विधीतील साधनांतून उगम पावले असावेत.

यूरोपमध्ये पत्ते पहिल्यांदा कसे प्रचारात आले, याविषयीही निश्चितपणे सांगता येत नाही. मात्र बाराव्या-तेराव्या शतकांपासून ते प्रचलित होते. ते कदाचित पूर्वेकडून प्रवासी व्यापाऱ्यांकरवी, सैनिकांकरवी वा भटक्या जिप्सींकरवी यूरोपात पोहोचले असावेत.

इटलीमध्ये १२९९ मध्ये पत्ते ज्ञात असल्याचा उल्लेख सापडतो. ते यूरोपातील सर्वांत आद्य पत्ते असावेत. इटालियन पत्त्यांना ‘टारोट’ किंवा ‘टारोची’ अशी संज्ञा होती. आधुनिक काळातील पत्त्यांचे ते पूर्वरूप होत. त्यांच्यात हळूहळू बदल होत होत त्यांना सध्याच्या पत्त्यांचे स्वरूप प्राप्त झाले.

टारोट किंवा टारोची पत्त्यांची संख्या ७८ असे व ते हाताने रंगविलेले असत. २२ आणि ५६ असे पत्त्यांचे दोन भाग असत. २२ पत्त्यांचा संच भविष्यकथनासाठी वापरीत. हल्लीच्या पत्त्यात जोकर असतात, तसा या पत्त्यांत एक ‘मूर्ख’ (Le Fou) असे. चांगले भविष्य सुचविणाऱ्या पत्त्यांबरोबर तो सापडला, तर हा मूर्ख शुभ वर्तमानाचा द्योतक ठरे. याच्या उलट तो वाईट भविष्य सांगणाऱ्या पत्त्याबरोबर असला, तर अशुभाचा द्योतक समजत.   आधुनिक पत्त्यांतील एक्का संख्येने कमी असला, तरी राजालाही भारी असतो. त्याने या मूर्खाची जागा घेतलेली असावी. या २२ पत्त्यांवर निरनिराळी चित्रे असत. ५६ पत्त्यांचा संच मात्र चार भागांत विभागलेला असे. त्या काळातील प्रमुख सामाजिक वर्गांची चिन्हे देऊन हे भाग करण्यात येत. उदा., पात्र (कप) हे चिन्ह ख्रिस्ती उपाध्यायासाठी, तलवार (स्वोर्ड) ही लढाऊ वर्गाचे प्रतीक म्हणून, चलन (मनी) हे व्यापारी वर्गाचे चिन्ह आणि दंड (बॅटन किंवा क्लब) हे शेतकरी वा अधिकारीवर्गाचे प्रतीक म्हणून मानले जाई.

विविध देशांतील पत्त्यांवर वेगवेगळी चिन्हे आढळतात. इटली, स्पेन आणि पोर्तुगाल या देशांत आजही पात्र, चलन, तलवार आणि दंड या चिन्हांचेच पत्ते वापरतात. जर्मन पत्ते पूर्वीपासूनच बदाम (हार्ट), घंटा (बेल), पर्ण (लीफ) आणि ओक झाडाचे फळ (एकॉर्न) या चिन्हांचे आहेत. फ्रान्समध्ये प्रचलित असलेली बदाम, चौकट, किल्वर व इस्पिक हीच चिन्हे इंग्रजांनी स्वीकारली व तीच भारतात रूढ झाली.

आधुनिक पत्त्यांत पात्राचा बदाम झाला. तलवारीचे चिन्ह आखूड आणि रुंद होत होत त्याला आजच्या इस्पिकचा आकार आला. चलनाचे रूप बदलले आणि त्याचे चौकटमध्ये परिवर्तन झाले. दंड किंवा फुटलेली फांदी पानाचाच आकार धारण करीत किल्वर बनली.

देशादेशांतून आढळणाऱ्या या विविध चिन्हांची आणि नावांची सरमिसळ म्हणजेच आधुनिक पत्त्यांची नावे होत. आजचे इस्पिकचे चिन्ह आणि जर्मन पर्णाचे चिन्ह यांत साम्य असले, तरी त्याचे इंग्रजी ‘स्पेड’ हे नाव मात्र इटालियन ‘स्पेडा’ या शब्दावरून पडले. आजचे क्लब किंवा किल्वर हे चिन्ह जर्मन एकॉर्नसारखे असले, तरी त्याचे आजच्या हार्ट किंवा बदाम या चिन्हाच्या आकाराशी पुष्कळ साम्य आहे. 


आधुनिक काळात भविष्यकथनासाठी वापरण्यात येणारे टारोटचे २२ पत्ते लोप पावले आणि खेळासाठी उरलेले ५६ पत्ते प्रचारात राहिले. या ५६ पत्त्यांमध्ये दरबारी पत्त्याचे प्रचलित पत्त्यांपेक्षा एक जास्त चिन्ह होते. ते सरदाराचे (नाइट) होय. या सरदाराच्या चिन्हाचे चारही पत्ते पुढे वगळण्यात येऊन, फक्त ५२ पत्त्यांचाच संच रूढ झाला. त्यातील सरदार वगळला, तरी राजा, राणी आणि गुलाम हे आजच्या पत्त्यांत कायमच राहिले. पत्त्यांचा आकडा बावन्नावर का आला, हे सांगणे कठीण आहे. पत्त्यांची विभागणी विषमसंख्येत होत असल्याने खेळ अर्धवट राहत नाही. वर्षाचे ५२ आठवडे आणि चार ऋतू यांच्या सान्निध्यामुळे ५२ पत्ते रूढ झाले असण्याचा संभव आहे.

हल्लीच्या पत्त्यांपेक्षा पूर्वीच्या पत्त्यांचा आकार मोठा असे. भविष्यकथनाचे २२ पत्ते कमी झाले व सरदाराचे चिन्ह वगळण्यात आले, त्याचवेळी पत्त्यांचा आकारही लहान झाला. राजा, राणी, गुलाम, जोकर यांचे पोशाख सातव्या हेन्रीच्या  काळी होते तेच राहिले तसेच त्यांची चेहरेपट्टीही कायम राहिली. पत्ते उलटसुलट वापरता यावेत, या उद्देशाने चित्राच्या खालच्या व वरच्या दोन्ही बाजूंना तोंडे आली व पत्ते हातात धरताना ते पंख्यासारखे धरणे सोयीचे पडते, म्हणून पत्त्यांच्या दोन्ही बाजूंना अक्षरे किंवा आकडे छापण्याची सुधारणा झाली. खेळांच्या प्रकारांनुसार आणि जादूगारांच्या गरजेप्रमाणे पत्त्यांचे विविध प्रकार छापण्यात येत असले, तरी पत्त्यांचे मूळ स्वरूप आता सर्वमान्य झालेले आहे.

पत्त्यांच्या डावातील ५२ पत्त्यांची रचना व जुळणी विविध प्रकारे करता येत असल्याने पत्त्याच्या खेळांचे अगणित प्रकार निर्माण झाले आहेत. काही खेळ केवळ नशिबाच्या भरवशावर आधारलेले असतात, तर काही खेळांमध्ये नशिबाबरोबरच खेळाडूच्या कौशल्यालाही वाव असतो. सट्टा किंवा जुगाराचे स्वरूप असलेल्या पत्त्यांच्या खेळात फक्त दैवालाच महत्त्व येते. याच्या उलट ब्रिज, पोकर यांसारख्या खेळांत खेळाडूच्या कौशल्याला प्राधान्य येऊन, त्या प्रमाणात दैवाला गौणत्व येते. पत्त्यांच्या अनेक खेळांमध्ये थोड्याफार प्रमाणात जुगाराचे अंग असले, तरी पैसा कमावण्याचे उद्दिष्ट गौण मानून खेळातच आनंद मानण्याची वृत्ती ठरवल्यास खेळात गोडी उत्पन्न होते. लहान मुलांसाठी असलेले भिकार-सावकार, पाच-तीन-दोन यांसारखे खेळ अत्यंत साधेसुधे सहजसुलभ असतात. त्यांत फारशी गुंतागुंत नसल्यामुळे प्रौढांना  त्यात सामान्यपणे रस वाटत नाही. प्रौढांसाठी असलेल्या रमी, ब्रिज यांसारख्या खेळांमध्ये खेळाडूची तार्किक अनुमाने करण्याची क्षमता, अंदाज बांधण्याची कुवत, निरीक्षण व स्मरणशक्ती, प्रतिपक्षाच्या मानसशास्त्राची जाण इ. गुणांना यश मिळण्याच्या दृष्टीने निर्णायक महत्त्व प्राप्त होते.

  

प्राचीन काळात चिनी लोकांनी पत्त्यांबरोबरच पत्त्यांच्या खेळांचे काही प्रकारही शोधून काढले असावेत, असे अनुमान आहे. कागदी चलनांचे पत्ते पिसून त्यांची वेगवेगळ्या प्रकारे जुळणी करून ते खेळत असावेत. प्राचीन काळातील खेळण्याचे पत्ते हे बव्हंशी आकड्यांचे पत्ते होते. प्राचीन चिनी पत्त्यांच्या खेळांत भारी पत्त्यांनी हलके पत्ते जिंकून घेण्याचे, त्याचप्रमाणे पत्त्यांची जिंकण्यायोग्य जुळणी करण्याचे (विनिंग काँबिनेशन्स) प्रकारही रूढ होते. या दोन तत्त्वांवर अधिष्ठित असलेले अनेक प्रकार आजही पत्त्यांच्या खेळांत रूढ आहेत.

प्राचीन काळातील पत्त्यांचा लोकप्रिय भारतीय खेळ म्हणजे गंजीफा होय. दशावतारी गंजीफांचे अवतार, रंग व चिन्हे पुढे अनुक्रमाने दाखविले आहेत : (१) मत्स्य-काळा-मासा, (२) कूर्म-नारिंगी-कासव, (३) वराह-हिरवा-शंख, (४) मारुती-पांढरा-गदा, (५) वामन-निळा-झारी, (६) परशुराम-तांबडा-परशू, (७) राम-पिवळा-बाण, (८) बलराम-गडद नारिंगी-मुद्गल (फिरवण्याची जोडी), (९) जगन्नाथ-अबाशाई (गडद तांबडा)-कमळाची कळी आणि (१०) कल्की-अबाशाई-तलवार. वर वर्णिलेल्या रंगांबाबत विविधता आढळते. तसेच या वर्णनात विष्णूच्या रूढ व पारंपरिक दशावतारांपैकी काही अवतार बदललेले दिसतात. उदा., नृसिंहाऐवजी मारुती, कृष्णाऐवजी बलराम व बुद्धाऐवजी पुरीचा जगन्नाथ. या दशावतारी गंजीफा पुणे येथील ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’त पहावयास मिळतात. बारा राशींच्या पत्त्यांत बारा राशींची चित्रे असतात. मुसलमानी पत्त्यांत ‘चंग’ (वीणा), ‘मुहर’ (वर्तुळाकार सोनेरी ठिपका), ‘किमाश’ (मोगली पागोटे), ‘बरात’ (हुंडी–लंबचौकोनात भासमान लेखन), ‘ताज’ (मुकुट), ‘रूप’ (पांढरा वर्तुळाकार ठिपका), ‘शमशीर’ (तलवार) व ‘गुलाम’ (साध्या पोशाखातील मनुष्य) यांची चित्रे आढळतात. दशावतारी गंजिफांचे सर्व रंग लाखी असल्याने पत्त्यांना जाडी येते. पत्त्यांच्या पाठी  लाल रंगाच्या असतात. दशावतारी व द्वादश राशींच्या गंजीफा वाटोळ्या, तर मुसलमानी गंजीफा आयताकृती असतात. दशावतारी गंजीफा कमीअधिक जाडीच्या कागदी पुठ्ठ्याच्या, तर मुसलमानी गंजीफा कागदी पुठ्ठ्याच्या किंवा हस्तिदंती आढळतात. हा खेळ आईन-इ-अकबरीतील माहितीनुसार मूळचा मुसलमानपूर्व भारतीय असावा. तथापि या खेळाचे नाव व यात वापरले जाणारे सर्व शब्द अरबी फार्सी आहेत. जसे ‘गंजीफा’, ‘सुर्खा’, ‘सुर्ख्या’ (हुकूम), ‘नातवान तवानी’ (असमर्थ पत्त्यास समर्थ करणे), ‘आखिरी’ (शेवटचे पान जिंकणे) इत्यादी. 

‘अस् नास’ हा पत्त्यांचा एक प्राचीन इराणी खेळ होय. या खेळाचे पोकर ह्या आधुनिक खेळाशी खूपच साम्य दिसून येते. त्यातील पत्त्यांची संख्या, खेळण्याची पद्धती पोकरशी बरीच मिळतीजुळती आहे. त्यावरून हा खेळ पोकरचा पूर्वसूरी असावा. 

आधुनिक काळात पत्त्यांचे अगणित खेळ निर्माण झाले आहेत. त्यांपैकी काही खेळ पत्त्यांच्या उच्चनीच श्रेणीच्या (रँक) कल्पनेवर अधिष्ठित आहेत, तर काही खेळ पत्त्यांच्या विशिष्ट जुळणीच्या (काँबिनेशन) तत्त्वावर आधारलेले आहेत. श्रेणी कल्पनेवर आधारलेल्या खेळात भारी वरचढ पत्ता वा विशिष्ट हुकमाचा पत्ता अन्य हलक्या पत्त्यांना जिंकून तो हात (डाव) जिंकतो. पत्त्यांची श्रेणी सामान्यपणे खालपासून वरपर्यंत दुर्री, तिर्री, चव्वी, पंजी, छक्की, सत्ती, अठ्ठी, नश्शी, दश्शी, गुलाम, राणी, राजा व एक्का अशी धरली जाते. या प्रकारातील ट्रायंफ हा इंग्लिश खेळ सोळाव्या-सतराव्या शतकांत लोकप्रिय होता . आपल्याकडील पाच-तीन-दोन हा मुलांचा खेळ या प्रकाराचे एक अगदी साधे उदाहरण होय.

जुळणीतत्त्वावर आधारित खेळांमध्ये पत्त्यांची विशिष्ट जुळणी वा रचना साधण्याचा प्रयत्न असतो. प्रत्येक पत्त्याला विशिष्ट गुण असतात. पत्त्यांची जुळणी साधत असताना त्यांचे हे गुणात्मक मूल्य विचारात घ्यावे लागते. या प्रकारात पोकर, रमी इ. खेळ  मोडतात. तिसऱ्या प्रकारात श्रेणी व जुळणी या दोन्ही तत्त्वांचा संयोग साधलेला असतो. उदा., पिकेट हा दोन खेळाडूंनी खेळण्याचा ३२ पत्त्यांचा (सत्तीपासून वरचे सर्व पत्ते) प्रकार. या खेळात पहिल्यांदा पत्त्यांचे विशिष्ट गट (ग्रूप) जुळवून गुण मिळविले जातात आणि नंतर या प्रकाराने तयार झालेले हात जिंकून अधिक गुण मिळविले जातात. बिझिक हा खेळही याच तत्त्वावर खेळला जातो. 

सगळे खेळ पत्त्यांच्या एकाच जोडाने खेळता येत नाहीत काही खेळांसाठी पत्त्यांचे दोन जोड आवश्यक असतात. याउलट काही विशिष्ट खेळांसाठी सर्व पत्ते आवश्यक असतात, असेही नाही. रमीसारख्याखेळात कित्येकदा खेळाडूंची संख्या जास्त असल्यास पत्त्यांचे दोन जोड घेतात. पिकेट किंवा बिझिक यांसारखे खेळ सत्तीपासून एक्क्यापर्यंतच पत्ते घेऊन खेळतात. तर पाच-तीन-दोन या खेळात तीस पत्ते लागत असल्यामुळे ठराविक दोन सत्त्या वगळतात व उरलेले सर्व वरचढ पत्ते घेतात.


पत्त्यांना असलेले गुणात्मक मूल्य निरनिराळ्या खेळांत निरनिराळ्या प्रकारचे असते. बऱ्याच खेळांत एक्का सर्वांत उच्च आणि दुर्री सर्वांत कनिष्ठ असते, काही खेळांत एक्का हा एक या संख्येइतका कनिष्ठही ठरतो. एरवी फारसा महत्त्वाचा नसलेला गुलाम हा मार्क या डावात श्रेष्ठ असतो. गुलामाच्या खाली गुणानुक्रमाने नव्वी, एक्का, दश्शी आल्यानंतर राजाराणीचा क्रम लागतो. काही खेळांत राजा, राणी व गुलाम यांना अनुक्रमाने १३, १२ आणी ११ गुण असले, तरी रमीसारख्या खेळांत एक्क्यासकट इतर सर्व चित्रपत्त्यांचे गुण १० असतात. जोकर वा अन्य एखादा विशिष्ट पद्धतीने निवडलेला पत्ता (किंवा त्याच्या विरुद्ध रंगाचे समान पत्ते) यांना विशेषाधिकार असतो.

पत्त्यांच्या खेळांत, एका खेळाडूपासून अनेक खेळाडूंना भाग घेता येईल, असे विविध प्रकार रूढ आहेत. पेशन्स किंवा सॉलिटेअर हा एकाच व्यक्तीने खेळावयाचा प्रकार. त्याचे जवळजवळ ३५० प्रकार रूढ आहेत. दोन व्यक्तींनी खेळावयाचे पिकेटसारखे प्रकार लोकप्रिय आहेत. तीन व्यक्तींचे पाच-तीन-दोनसारखे प्रकार आहेत. चार खेळांडूंनी खेळावयाचे ब्रिज, व्हिस्ट, सात हाती यांसारखे खेळ आहेत. नॅप या खेळात २ ते ६ पर्यंत खेळाडू भाग घेऊ शकतात. रमी या खेळातही खेळाडू जास्ती संख्येने सहभागी होऊ शकतात. ब्रिज, व्हिस्ट, सात हाती यांसारख्या खेळांत चार खेळाडूंपैकी दोन-दोन खेळाडू भागीदार असतात तर काही डावांत प्रत्येक खेळाडू स्वतंत्र असतो अथवा काही डावांत सर्वांपेक्षा जास्त हात बोलणाऱ्या खेळाडूंच्या (बँकर) विरुद्ध बाकीच्या खेळाडूंची फळी तयार होते. बहुसंख्य पत्त्यांच्या खेळांत सर्व खेळाडूंना पत्ते क्रमाक्रमाने पिसावे लागतात. मात्र लाडिससारख्या खेळात पत्ते पिसण्याच्या क्रियेला एक विशिष्ट अर्थ आहे. त्यात एकाच खेळाडूला त्याने बोललेले हात न झाल्यास दंड (पेनल्टी) म्हणून पिसावे लागते आणि त्याच्या व भागीदाराच्या नावावर विशिष्ट दंडगुण चढवले जातात. असे ३२ दंडगुण झाले म्हणजे एक लाडू झाला, असे म्हणण्याचा प्रघात आहे. पिसलेले पत्ते घड्याळकाट्याच्या विरुध्द दिशेने वाटले जातात. वाटण्यापूर्वी वाटणाराच्या डाव्या बाजूच्या खेळाडूने पत्ते काटावयाचीही पद्धत बव्हंशी रूढ आहे. या पद्धतीमुळे पत्ते एकत्र लावून येत नाहीत वा लावता येत नाहीत. 

पत्त्यांच्या खेळांत हुकूम ठरवण्याच्याही अनेक पद्धती आहेत. काँट्रॅक्ट ब्रिजमध्ये पत्ते वाटणारा (डीलर) प्रथम बोली (कॉल) करतो. त्याच्या बोलीवर डावीकडून उजवीकडे क्रमाने तीन खेळाडू चढती बोली करीत जातात. त्यांपैकी सर्वांत जास्त असेल ती बोली पक्की होते व त्या बोलीचे चिन्ह हाच हुकूम ठरतो. बोलीचे बिनहुकमाची बोली (नो ट्रंप) व हुकमाची बोली असे प्रकार असतात. हुकमाच्या बोलीत क्रमाने इस्पिक, बदाम, चौकट व किल्वर असा दर्जा असतो. व्हिस्टमध्ये चार खेळाडूंमध्ये (दोन-दोन भागीदारांचे दोन संघ) प्रत्येकी १३ पत्ते वाटले जातात. पत्ते पालथे वाटतात, शेवटचे पान मात्र उलटवून सर्वांना दाखविले जाते व तो हुकूम ठरतो. प्रत्येकजण जास्तीत जास्त हात करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक हाताला १ गुण असतो. कमीत कमी ६ हात करावे लागतात. आपल्याकडील सात हाती हा खेळही अशाच प्रकारे खेळला जातो. हुकमाच्या व हात करण्याच्या पत्त्यांच्या खेळांत एखाद्या खेळाडूजवळ जी खेळी चालू असेल त्या खेळीचे पान नसले, तर हुकमाचे पान मारून त्याला हात घेता येतो. अशा वेळी हुकमाची दुर्री अन्य चिन्हाच्या एक्क्यापेक्षाही भारी ठरते. ज्या चिन्हाची खेळी असेल, तेच पान सर्वांनी खेळावयाचे असते. खेळीचे पान नसेल, तर इतर चिन्हाचे पान खेळता येते किंवा हुकूम मारून हात घेता येतो. नंतरच्या खेळणाराने भारी हुकूम मारला, तर तो हात त्याचा होतो. अशा प्रकारच्या खेळांत एकाग्रता आणि स्मरणशक्ती यांची आवश्यकता असते. इतरांच्या खेळींवरून आणि बोलींवरून त्यांचा डाव ताडता येतो. झालेल्या खेळावरून कोणते पत्ते कोणाजवळ आहेत, हुकमाच्या पत्त्यांची वाटणी कशी झाली आहे, या गोष्टींचे अंदाज बांधता येतात. असे आकलन जर शक्य झाले नाही, तर खेळ जिंकणे अवघड होते. नॅप (किंवा नेपोलियन) हा खेळ २ ते ६ खेळाडूंनी खेळता येतो. प्रत्येक खेळाडूला पाच पत्ते घेता येतात. आपण किती हात करू शकू, याविषयीचा अंदाज प्रत्येकाने व्यक्त करावयाचा असतो. सर्व म्हणजे ५ हात करता येतील असे वाटल्यास तो नॅप पुकारू शकतो. जो सर्वाधिक हात बोलेल त्याला हुकूम ठरविण्याचा अधिकार प्राप्त होतो. इतर खेळाडू त्याच्याविरुद्ध एक होतात व त्याने बोललेले हात होऊ नयेत म्हणून प्रयत्न करतात. पिकेट हा अठराव्या-एकोणिसाव्या शतकांपासून लोकप्रिय असलेला खेळ आहे. यात सत्तीपासूनची वरची सर्व म्हणचे ३२ पाने घेतात. हा खेळ मुळात दोन खेळाडूंसाठी असला, तरी तीन ते चार खेळाडूंना खेळता येईल असा या खेळाचा प्रकारही रूढ आहे. दोन खेळाडूंमध्ये बारा-बारा पत्ते वाटल्यानंतर उरलेले आठ पत्ते पाच व तीन अशा दोन गठ्ठ्यांत विभागून पालथे ठेवतात. प्रत्येक खेळाडू हातातील पाच पाने काढून ठेवून खालची पाने उचलतो. नंतर तीन पत्त्यांची अशीच अदलाबदल केली जाते. त्यास अनुक्रमे मोठा हात (मेजर हँड) आणि लहान हात (मायनर हँड) असे म्हणतात. दोघांनी हा बदल केल्यानंतर आपण किती हात करू शकू, याचा अंदाज दोघेही प्रकट करतात. या बोलीनंतर नेहमीसारखा खेळ खेळतात. बिझिक हा खेळ दोन पत्त्यांचे जोड घेऊन व सत्तीच्या वरची सर्व पाने, म्हणजे एकूण ६४ पत्ते घेऊन खेळावयाचा आहे. त्यात दोन वा तीन ते चार खेळाडूही भाग घेतात. क्रिबेज या खेळात पत्त्यांची विशिष्ट जुळणी करून गुण मिळवले जातात. प्रत्येक खेळाडूसाठी दोन खुंट्या असतात व त्या विशिष्ट पटावर (क्रिबेज बोर्ड) सरकवून खेळातील गुणांची मोजणी केली जाते. प्रारंभी प्रत्येक खेळाडूला ६ पाने वाटल्यावर प्रत्येकाने २ पत्ते पालथे टाकून जादा हात (क्रिब) करावयाचा असतो व त्याचे गुण पत्ते वाटणाऱ्याला मिळतात.

पत्ते विशिष्ट प्रकारांनी जुळवण्याच्या खेळांमध्ये पोकरसारख्या अत्यंत कौशल्यपूर्ण खेळापासून ते रमीसारख्या अनेक पद्धतींनी खेळता येणाऱ्या खेळांचा समावेश होतो. पत्त्यांच्या जुळणीचे अनेक प्रकार आहेत. उदा., क्रमरचना (सीक्वेन्स), जोड्या (पेअर्स), समान आकड्यांच्या वा चिन्हांच्या तीन वा चार पत्त्यांची जुळणी इत्यादी. रमी या खेळात कितीही खेळाडू भाग घेऊ शकतात. जास्त खेळाडू असल्यास पत्त्यांचे दोन जोड वापरले जातात. पत्ते खेळाडूंमध्ये विशिष्ट संख्येने (१३ किंवा १० किंवा  ७) वाटले जातात. उर्वरित पत्त्यांचा गठ्ठा मध्यभागी ठेवला जातो. प्रत्येक खेळाडूने खेळतेवेळी त्या गठ्ठ्यातील वा नजीकच्या खेळाडूने टाकलेले पान घेऊन स्वतःच्या हातातील पान सोडावयाचे असते. पत्त्यांची विशिष्ट प्रकारे जुळणी करणे, हे या खेळाचे तत्त्व आहे. त्यात क्रमरचना साधली जाते. क्रमरचनेमध्ये एकाच चिन्हाच्या तीन वा चार पत्त्यांचा अनुक्रम जुळवावयाचा असतो. त्याचप्रमाणे या खेळात समान आकड्यांचे वा समान चित्रांचे तीन वा चार पत्ते एकत्र जुळवले जातात. जो खेळाडू आपल्या हातातील पत्त्यांची जुळणी सर्वांत अगोदर जमवतो, तो विजयी ठरतो व उर्वरित खेळाडूंच्या हातांतील जुळणी न झालेल्या सुट्या पत्त्यांचे गुण त्यास मिळतात. हे गुण प्रत्येक पत्त्यास विशिष्ट ठरलेले असतात. बदाम सत्ती या खेळात बदाम सत्ती हातात असणाराने ती खाली मांडून खेळास सुरुवात करावयाची असते. इतरांनी त्या सत्तीच्या खालचे वा वरचे पत्ते क्रमानुसार लावावयाचे असतात. दोन्ही क्रमांकांतील पत्ता नसल्यास दुसऱ्या चिन्हाचा पत्ता लावावा लागतो. शेवटी ज्या खेळाडूच्या हातात जास्त पाने राहतात, तो खेळ हलतो. गुलामचोर या डावात प्रत्येकाने डाव्या हातच्या खेळाडूचे एक पान ओढावयाचे असते आणि जमलेल्या जोड्या खाली ठेवावयाच्या असतात. खेळ सुरू करतानाच एक गुलाम काढून ठेवलेला असल्यामुळे, एक गुलाम सोडून बाकीच्या जोड्या लावतात. शेवटी ज्याच्या हातात गुलाम राहील तो गुलामचोर होतो.

सुखी कुटुंब (हॅपी फॅमिली) नावाच्या खेळाकरिता वेगळे पत्ते लागतात. आई, बाप, मुलगा, मुलगी तसेच डॉक्टर, मोलकरीण, बेकरीवाला इ. कुटुंबांचा संच असलेले पत्ते मिळतात. सवंगड्यांच्या हातातील पाने ओढून कुटुंब जमविणे हा खेळाचा उद्देश असतो. लेक्सिकॉन हा रमीसारखाच एक खेळ आहे. या खेळासाठी तयार मिळणाऱ्या पत्त्यांवर वेगवेगळी अक्षरे असतात. या अक्षरांचे शब्द जुळविणे, हेच खेळाचे उद्दिष्ट असते. (चित्रपत्र ४१).

पहा: गंजीफा पेशन्स पोकर बिझिक ब्रिज रमी.

संदर्भ : 1. Hargrave, C. P. A History of Playing Cards, New York, 1966.

             2. Morehead, A. H. Mott-Smith, Geoffrey, Culbertson’s Card Games Complete, London, 1957.

             3. Roberts Charles, Card Games Up-To-Date, London, 1950.

  

गोखले, श्री. पु. खरे, ग. ह. इनामदार, श्री. दे.


'टारोट' प्रकारातील काष्ठठशाचा जर्मन पत्ता, सु. १६ वे शतक.हाताने रंगवलेला काष्ठठशाचा इंग्रजी पत्ता, १८ वे शतक.हाताने रंगवलेला काष्ठठशाचा फ्रेंच पत्ता, सु. १८३० -४०.जोकरचा पत्तादशावतारी गोलाकार गंजिफा, सावंतवाडी.पत्त्यांची क्रमरचना : चौकट एक्का, राजा, राणी व गुलाम.मुसलमानी आयताकृती गंजिफा, सावंतवाडी.पत्त्यांची श्रेणी : किल्वर दुर्री ते दश्शी.समान जुळणी : चार राजे.