पटावरील खेळ : (बोर्ड गेम्स). विविध आकार-प्रकारांच्या पटांवर सोंगट्या, फासे तसेच इतर साधनांनी खैळण्यात येणारे बैठे खेळ. प्राचीन काळापासून रूढ असलेल्या या खेळांत अनेक प्रकारच्या सुधारणा होत होत आजचे खेळ तयार झाले आहेत. प्राचीन काळी जमिनीवरच पट आखून आणि हाडे, गोट्या, फळांची कवचे वापरून असे खेळ खेळत. अत्यंत प्राचीन खेळांचे पट सर लेनर्ड वुली यांना अर येथील उत्खननात (इ. स. पू. सु. ३००० वर्षे), राजांच्या थडग्यात आढळले.

पटावरील खेळाचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे नशिबाच्या भरवशावर आणि कवड्या फाशांच्या आकड्यांवर अबलबूंन असणारे क्रीडाप्रकार आणि दुसरा म्हणचे बौद्धिक कौशल्याला वाव असलेले क्रीडाप्रकार. बुद्धिचातुर्यावर अधिष्ठित असलेल्या खेळांमध्ये खेळाडूचा चाणाक्षपणा, दूरदर्शित्व, स्मरणशक्ती व कौशल्य हे गुणच जिंकण्याच्या दृष्टीने निर्णायक ठरतात.

ल्यूडो

सॉलिटेअर

अर येथील उत्खननात सापडलेला पट. इ.स.पू.सु. ३०००

पचीसी

साप - शिडी

हलूगा


नशिबावर हवाला ठेवणारे, सोंगट्यांच्या खेळांचे अनेक प्रकार आहेत. ‘बॅकगॅमॉन’ हा सोंगट्यांचा एक प्राचीन खेळ आहे. तो इंग्लंडमध्ये चौदाव्या शतकातही खेळत. बारा पंक्तींच्या खेळात (ट्वेल्व्हलाइन गेम) या खेळाचे मूळ असून तो ग्रीक लोकांमध्ये अगोदर प्रचलित होता व त्यांच्यापासूनच रोमन लोक तो शिकले. सोंगट्यांच्या खेळात पटाच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे सोंगट्या नेण्याची त्वरा करावयाची असते. सोंगट्यांची ही चाल नियमानुसार करीत असताना त्यांना अनेक वेळा माघार घ्यावी लागते किंवा काही वेळा वेगात अंतर काटता येते. ‘साप-शिडी’ सारख्या सर्वपरिचित खेळात क्रमांक घातलेल्या चौकोनांतून सर्वांत प्रथम अंतिम चौकोन गाठावयाची खेळाडूची खटपट चालू असते. त्यात शिड्यांनी व सापांनी काही मार्ग दाखविलेले असतात. या खेळाच्या पटास मोक्षपट असेही म्हणतात. शिडीचा मार्ग उत्कर्षाचा, तर सापाचा अधोगतीचा असतो. सापाचे तोंड दर्शविलेल्या चौकौनात सोंगटी गैली, तर ती एकदम सापाच्या शेपटीपर्यंत मागे ओढली जाते. सोंगटी शिडीच्या पायथ्याजवळ पोहोचली, तर ती शिडीचे टोक गाठते. घोड्यांच्या शर्यतीच्या पटावर शर्यतीच्या मैदानाचा देखावा काढलेला असतो व त्यात दंडशासनाची आणि बक्षिसांची काही ठिकाणे दाखविलेली असतात.

प्राचीन काळी भारतात पटावरील अनेक खेळ प्रचलित होते. सोंगट्या, कवड्या, फासे इ. साधनांनी खेळावयाच्या द्यूत, चतुरंग (बुद्धिबळाचा प्राचीन खेळ) यांसारख्या अनेक क्रीडाप्रकारांचे निर्देश प्राचीन वाङ्‌मयात आढळतात. मोगलकाळात भारतात ‘पचीसी’ हा सोंगट्यांचा खेळ फार लोकप्रिय होता. त्यासाठी अधिक (+) चिन्हाच्या आकाराचा कापडी पट वापरीत. अकबर बादशाहाला ह्या खेळाचा इतका षोक होता, की त्याने आपल्या फतेपूर शीक्रीच्या प्रासादाच्या प्रांगणाच्या एका भागात सोंगट्यांच्या पटासारखी रचना केली होती. जनानखान्यातील सोळा दासी विविध चिन्हदर्शक विविध रंगांचे कपडे परिधान करून सोंगट्यांच्या जागी उभ्या राहत व खेळ चालू असता पडलेल्या दानानुसार हालचाली करीत. १८८० च्या सुमारास हा खेळ इंग्लंडमध्ये नेण्यात आला व तिथे त्यास प्रचलित ‘ल्यूडो’ या आधुनिक इंग्लिश खेळाचे रूप लाभले. ल्यूडो व तत्सम खेळांत प्रत्येक खेळाडू आपल्या जागेतील म्हणजे कोपऱ्यातील चारही सोंगट्या पटाच्या मध्यावर (म्हणजे घरात) नेण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या खेळाडूने पूर्वी व्यापलेला चौकोन जर तुसऱ्या खेळाडूने व्यापला, तर पहिल्याला मूळपदावर परत यावे लागते. ल्यूडो हा खेळ आजही इंग्लंडमध्ये लोकप्रिय असून, ख्रिसमसच्या वेळी मुले तो खेळतात. ‘एकाधिकार’ (मोनॉपली) हा खेळ बराच गुंतागुंतीचा आहे. त्यात एक खेलाडू सावकार बनतो आणि प्रथम तो सर्व सवंगड्यांना सारखे पैसे वाटतो. प्रत्येक खेळाडूचे चिन्ह ठरवितात. पटावर शहरातील विविध वस्तींत विखुरलेल्या निरनिराळ्या किंमतींच्या वास्तू दर्शविलेल्या असतात. खेळाडूची सोंगटी त्या ठिकाणी पोहोचली, तर त्या खेळाडूला त्या वास्तूची किंमत सावकाराला मोजून ती वास्तू स्वतःच्या नावावर करता येते. दुसरा खेळाडू त्या वास्तूत पोहोचला, तर त्याला त्या जागेचे ठरलेले भाडे द्यावे लागते. या वास्तूंचे संचही ठरलेले असतात. एखादा खेळाडू संपूर्ण संचाचा मालक झाला, तर त्याला मूळ वास्तूत नव्या वास्तूंची, त्यांचे सावकाराला मोल देऊन भर घालता येते. तसेच चार घरांचे उपाहरगृहात रूपांतर करता येते व त्याला जास्त भाडे येते. डाव अंगावर आल्यास खेळाडूला आपल्या वास्तू विकूनही टाकता येतात. इतकेच नव्हे, तर त्या गहाणही टाकता येतात. अशा वेळी त्या वास्तूंचे मूल्य सावकाराकडून घेऊन त्यातून देणी भागविता आली, तरी वास्तूंवर मिळणारे उत्पन्नही कमी होते. पटावरील काही जागांवर लॉटरीसारखे लाभ होतात. तर काही ठिकाणी वाण्याचे बिल देणे अशासारखे स्मरण केलेले असते व ते देणे भागवावे लागते. एकच खेळाडू सधन राहिल्यावर हा खेळ संपतो. यास व्यापार हे रूढ नाव आहे.

ज्या खेळांत बौद्धिक कौशल्य दाखवावयास वाव असतो, अशा खेळांत ⇨ बुद्धिबळाचा खेळ अत्यंत लोकप्रिय आहे. या खेळात प्रतिपक्षाची हत्ती, घोडा, उंट, वजीर,  प्यादी अशी विविध मोहरी आपल्या मोहऱ्यांनी मारता येतात व बुद्धीच्या जोरावर अखेर राजावर मात करता येते. इंग्रजी ‘नाइन मेन्स मॉरिस’ किंवा ‘मॉरेलिस’ या खेळात प्रतिपक्षाची माणसे मारता येतात, किंवा आपली माणसे विशिष्ट पद्धतीने ठेवून शत्रुपक्षाच्या क्षेत्रात आक्रमण करता येते. ‘ड्राफ्ट्‍स’ व टिंब-फुली (नॉट्स अँड क्रॉसेस) या खेळांचे तत्त्वही सर्वसामान्यपणे असेच आहे. मॉरेलिस हा खेळ चौदाव्या शतकात लोकप्रिय होता. या खेळाचा उल्लेख शेक्सपिअरच्या मिडसमर नाइट्स ड्रीम या नाटकात आढळतो. ‘पेगॉटी’ हा आधुनिक खेळ साधासुदा आहे. चार खेळाडू आपापले रंगीत ध्वज पटावर रोवण्याचा प्रयत्न आपापल्या पाळीप्रमाणे करतात. ज्या खेळाडूचे पाच ध्वज एका रांगेत प्रथम येतात, तो डाव जिंकतो. या खेळात आपले ध्वज एका रांगेत आणावयाची दृष्टी ठेवीत असताना, इतरांचे एका रांगेत कसे येणार नाहीत, हे धोरण ठेवावे लागते. या खेळाचे टिंब-फुली या खेळाशी साम्य दिसून येते.

पटावरील अनेक प्रकाराच्या खेळांत प्रतिपक्षाच्या जागेत आक्रमण करण्यासाठी योजनापूर्वक हालचाली कराव्या लागतात. प्राचीन काळापासून प्रचलित असलेल्या कोल्हा व हंस (फॉक्स अँड गीस) या खेळात हंसाच्या चार पांढऱ्या सोंगट्या व कोल्ह्याच्या चार काळ्या सोंगट्या पटावर एका रांगेत मांडल्यावर खेळास प्रारंभ होतो. दोघेही परस्परांची फळी मोडण्याचा प्रयत्न करीत असतात. ‘हल्‌मा’ हा खेळ त्यामानाने अधिक गुंतागुंतीचा आहे. त्याच्या पटावर २५६ चौकोन असतात. त्यांत बुद्धिबळाच्या मोहऱ्यांसारखी दिसणारी, लाकडाची छोटी छोटी माणसे असतात. पट कर्णरेषेवर मांडतात. पटाच्या चारही कोपऱ्यांत तेरा अथवा एकोणीस चौकोनांचा विभाग (यार्ड) दर्शविलेला असतो. ही चौकोनांची संख्या दोन किंवा चार खेळाडूंच्या संख्येवर अवलंबून असते. हल्‌मा हा खेळ दोन खेळाडूच खेळत असतील, तर समोरासमोरचे फक्त दोन कोपरे वापरतात. चार खेळाडू असले, तर अर्थातच चारही कोपरे वापरावे लागतात. त्यात सर्व खेळाडू स्वतंत्रपणे खेळतात किंवा दोघे भागीदार होऊ शकतात. आपली सर्व माणसे प्रतिपक्षाच्या विभागात ढकलणे, हाच या खेळाचा उद्देश असतो. जो प्रथम आपल्या सर्व सोंगट्या प्रतिपक्षाच्या विभागात घालील तो विजयी होतो. एका वेळी एक चौकोन किंवा एक घर पुढे सरकणे किंवा एकदम उड्या मारणे, असे खेळांचे दोन प्रकार आहेत. आपल्या सोंगटीच्या कुठल्याही बाजूच्या जवळचा चौकोन मोकळा असेल, तर मागे, पुढे किंवा तिरपी चाल करून त्या जागी सोंगटी ठेवता येते. प्रतिपक्षाच्या सोंगटीच्या दोन्ही बाजूंना रिकामे चौकोन असतील, तर प्रतिपक्षाच्या सोंगटीवरून उड्या मारून ते व्यापता येतात. आपल्या सोंगट्या मांडताना विरोधी बाजूच्या सोंगट्यांवरून सरळ वा नागमोडी उड्या मारत जाता येईल, तसेच प्रतिपक्ष्याच्या सोंगट्यांना अडथळा आणता येईल असे धोरण ठेवणे, यातच खेळाचे सारे कौशल्य सामावले आहे. भागीदार असतील तर ते आपल्या पक्षाच्या सोंगटीला वाट करून देऊन एकमेकांना मदत करू शकतात.


‘तब्ले’ हा सोंगट्यांच्या प्रकारात मोडणारा साधा व मनोरंजक क्रीडाप्रकार आहे. एका फळीला एका ओळीत सारख्या अंतरावर पाडलेली बारा भोके आणि त्या बारा भोकांच्या चार ओळी, असे या खेळाच्या पटाचे स्वरूप असते. पटाच्या भोकावर खुंटीच्या आकाराच्या तांबड्या व हिरव्या रंगांच्या प्रत्येकी बारा सोंगट्या असतात. हा खेळ दोन खेळाडूंनी खेळावयाचा असतो. एकाने तांबड्या आणि एकाने हिरव्या खुंट्या घेऊन त्या खेळाडूसमोरच्या पटाच्या पहिल्या ओळीत बारा भोकांमधून बसवावयाच्या असतात. या खेळास लागणारे फासे म्हणजे वेळूच्या चपट्या, रंगीबेरंगी, लांब पट्ट्या होत. हे फासे कवड्यांप्रमाणे जमिनीवर टाकून जे दान पडेल, त्याप्रमाणे समोरच्या छिद्रांच्या ओळींतील खुंट्या पुढे सरकवत न्यावयाच्या असतात. यात एका खेळाडूच्या विशिष्ट सोंगटीला पडलेले दान, जर प्रतिपक्षाच्या खुंटीवर नेमके पडले, तर ती खुंटी मरते. अशा रीतीने एका खेळाडूच्या सर्व खुंट्या मेल्या, म्हणजे तो कर्जबाजारी झाला, असे समजले जाते.

‘एकाकी’ (सॉलिटेअर) हा एकट्यानेच खेळावयाचा जुना फ्रेंच खेळ आहे. त्याचे अनेक प्रकार प्रचलित आहेत. या खेळाचा शोध पॅरिस येथील बॅस्टीलच्या तुरुंगातील एका कैद्याने लावला, असे मानतात. ३३ खाचा वा खोबणी असलेल्या पटावर एक खाच रिकामी टेवून व इतर खाचांमद्ये गोट्या ठेबून हा खेळ खेळतात. ‘ड्राफ्ट्स’ या खेळाप्रमाणेच या खेळात गोट्यांवरून उड्या मारीतच त्या उचला वयाच्या असतात. एक गोटी ठरलेल्या खाचेतच शिल्लक राहिली पाहिजे, अशी अट असते. या खेळात आडवी किंवा उभी हालचाल करता येते मात्र तिरकी किंवा कर्णरेषेवर करता येत नाही. या खेळात अनेक अडचणी येतात परंतु एकट्या खेळाडूलाच त्या सोडवाव्या लगतात.  ⇨ कॅरम हा खेळ लाकडी बोर्डावर नऊ पांढऱ्या, नऊ काळ्या व एक लाल (राणी) अशा एकोणीस सोंगट्यांनी एकेरी वा दुहेरी प्रकारात खेळला जातो.

पहा : फाशांचे खेळ सोंगट्यांचे खेळ.

संदर्भ : 1. Bell, R. C. Board and Table Games from Many Civilizations, 2 Vols., London, 1969.

2. Falkener, Edward, Games Ancient and Oriental and How to Play Them, New York. 1961.

गोखले, श्री. पु.