डॅसियूर : स्तनि-वर्गाच्या मार्सुपिएलिया (शिशुधानी) गणातील डॅसियूरिडी कुलातील प्राणी. हे फक्त ऑस्ट्रेलिया, न्यू गिनी आणि टॅस्मेनियामध्येच आढळतात. डॅसियूरिडी कुलात १९ वंश आणि सु. ५० जाती आहेत. डॅसियूर दाट अरण्यात आणि सापेक्षतेने उघड्या सपाट प्रदेशात राहतो. याच्या काही जाती वृक्षवासी आहेत. भूचर जातीही झाडावर चढू शकतात.

येथे दिलेले वर्णन ऑस्ट्रेलियाच्या पूर्व विभागात आढळणाऱ्या डॅसियूरस कोल या जातीचे आहे. याचा शरीराची (डोक्यासह) लांबी ३५–४५ सेमी. आणि शेपटीची २१–३० सेमी. असते. नराचे वजन सु. १·१३ किग्रॅ. आणि मादीचे सु. ०·६८ किग्रॅ. असते. याचा रंग हिरवट करडा तपकिरी किंवा काळा असून अंगावर पांढरे ठिपके असतात. तपकिरी रंगाचे प्राणी सामान्यतः जास्त आढळतात. याच्या डोक्यावरील पांढरे ठिपके अस्पष्ट असतात. मात्र शेपटीवर ठिपके नसतात, पण बहुधा तिचे टोक पांढरे असते. शरीराची खालची बाजू व पाय याचा रंग सामान्यतः फिकट असतो. अंगावरचे केस मऊ, दाट आणि आखूड असतात.डॅसियूर निशाचर असून दिवसा झाडाच्या ढोलीत किवा खडकांतील मोकळ्या जागांत झोपून राहतात.

डॅसियूर (डॅसियूर कोल)

झोपण्याची जागा आतून गवताने किंवा झाडाच्या सालींनी मढविलेली असते. झोपताना ते शरीराचे चेंडूसारखे वेटोळे करून कान दुमडून घेतात.

लहान ससे, उंदीर, पक्षी, लहान सरपटणारे प्राणी, बेडूक, मासे, प्राण्यांची मढी, किडे वगैरेंवर हे उदरनिर्वाह करतात. भक्ष्याच्या मानेचा चावा घेऊन हे त्याला मारतात आणि एखाद्या सुरक्षित जागी नेऊन ठेवतात आणि यथावकाश ते खातात.

मादीच्या पोटावर पिल्लांकरिता एक उथळ पिशवी (शिशुधानी) असते व तिच्यात सहा किंवा आठ स्तन असतात. मादीला दर खेपेस १८–२४ पिल्ले होतात, पण त्यांपैकी फक्त ४–८ जगतात. पिल्ले सु. आठ आठवडे मादीचा स्तनाग्रांना चिकटलेली असतात. या काळात ती सर्वस्वी आईच्या दुधावरच अवलंबून असतात. ११ आठवड्यांनी त्यांचे डोळे उघडतात व १५ आठवड्यांनंतर ती पिशवीबाहेर येऊन बागडू लागतात व मांस खाऊ लागतात पण त्यांना मधूनमधून आईचे दूध लागतेच. चार-साडेचार महिन्यांची झाल्यावर ती पूर्णपणे स्वतंत्र होतात. त्यांना पकडून ठेवल्यास ती सहज माणसाळतात.

यार्दी, ह. व्यं.