पट्टहंस : हा पक्षी ॲनॅटिडी या पक्षिकुलातील आहे. याचे शास्त्रीय नाव ॲन्सर इंडिकस असे आहे. हा भारतात कायमचा राहणारा नसून हिवाळी पाहुणा म्हणून येतो. हा ऑक्टोबरमध्ये भारतात येतो व मार्च महिन्यात परत जातो. हिवाळ्यात उत्तर भारत व आसाममध्ये हा मोठ्या प्रमाणात आढळतो मध्य भारतात यांची संख्या थोडी असते परंतु दक्षिणेस म्हैसूरपर्यंत हे तुरळक असतात.

पट्टहंस

हा साधारणपणे पाळीव हंसाएवढा असतो. डोके पांढरे मानेच्या काट्यावर (मानेतील पहिला मणका ज्या ठिकाणी असतो त्या जागेवर) दोन आडवे काळे पट्टे मानेच्या दोन्ही बाजूंवर एक पांढरा पट्टा मानेचा मागचा भाग गर्द तपकिरी वरचा भाग राखी करडा उडण्याच्या उपयोगाची पिसे काळी शेपटी फिक्कट करडी मानेचा पुढचा भाग राखी तपकिरी छाती पांढरट तपकिरी शरीराची खालची बाजू पांढरी डोळे तपकिरी चोच पिवळी पाय नारिंगी. शरीर अवजड, मान लांब आणि पाय आखूड व त्यांची पुढची बोटे पातळ कातडीने जोडलेली. नर आणि मादी दिसायला सारखीच असतात. यांचे २० ते १०० पक्ष्यांचे थवे असतात, कधीकधी लहान टोळ्या अथवा जोडपीही असतात.

हा पक्षी रात्रिंचर असून भक्ष्य मिळविण्याकरिता तिन्हीसांजेच्या सुमारास बाहेर पडतो. गहू आणि हरभऱ्याची कोवळी रोपे हे याचे मुख्य खाद्य होय. यामुळे रात्री तो या शेतात आढळतो. दिवसा मोठे तलाव, तळी आणि विशेषतः नद्या यांच्या काठावर त्यांचे थवे विश्रांती घेतात. हे पक्षी सदैव जागरूक असतात. ते अतिशय उंचावरून उडत असतात. उडताना त्यांच्या लांब, सरळ ओळी असतात किंवा A च्या आकृतीप्रमाणे या ओळींची मांडणी असते. याचा आवाज मंजुळ आणि काहीसा ‘आंऽग’ ‘आंऽग’ असा असतो.

एप्रिलपासून जूनपर्यंत मध्य आशिया आणि पश्चिम चीनमध्ये व भारताला जवळ असणाऱ्या तिबेटमध्ये तसेच लडाखमध्ये यांची वीण होते. ४,००० ते ४,३०० मी. उंचीवरील सरोवरांच्या काठावरच्या हिरव्यागार झुडपांखाली खळगा खणून त्यात मऊ पिसे घालून याचे घरटे तयार केलेले असते. मादी दर खेपेस तीनचार अंडी घालते. त्यांचा रंग हस्तीदंती पांढरा असतो. 

  कर्वे, ज. नी.