नागार्जुन –३ : प्राचीन भारतीय रसायनज्ञ. त्यांचा उल्लेख सिद्ध नागार्जुन असा करतात. त्यांचा जन्म दक्षिण भारतातील कांची नगरीत इ. स. सातव्या शतकात झाला. हे तंत्रशास्त्राचे उपासक होते व त्यांना रसायनविद्या आणि हलक्या धातूचे सोन्यात रूपांतर करण्याची मायुरी विद्या एका तपस्व्याकडून प्राप्त झाली होती. प्रबंध चिंतामणी या ग्रंथावरून ते पादलिप्तसूरी या गुरूंचे शिष्य होते.

भारतातील खनिजांपासून विविध रसायने आणि धातुपाषांपासून (कच्च्या धातूंपासून) शुद्ध धातू तयार करण्याच्या पद्धती त्यांनी शोधून काढल्या. पारा व इतर धातू यांपासून अनेक पारदमेले (पारा आणि त्या त्या धातू यांच्या संमिश्रधातू) त्यांनी बनविली. प्रफुल्लचंद्र रॉय यांच्या हिस्टरी ऑफ हिंदू केमिस्ट्री या पुस्तकात नागार्जुनांविषयी माहिती दिली आहे. सिद्ध नागार्जुन यांनी रसरत्नाकर या नावाचा एक ग्रंथ लिहिला त्यात अनेक रासायनिक प्रक्रिया आणि प्रायोगिक उपकरणे यांसंबंधी माहिती आहे.

सुश्रुतसंहिता ह्या ग्रंथाचे संपादन पुन्हा झाले असावे व ते नागार्जुन यांनी केले असावे, असे विद्वानांचे मत आहे परंतु ते सिद्ध नागार्जुन यांनीच केले, असे नक्की म्हणता येत नाही.

कानिटकर बा. मो. भालेराव, य. त्र्यं.