कुट्टिमचित्रण : (मोझेइक). काच, संगमरवर, दगड, चिकणमाती, विविध खनिजे इत्यादींचे रंगीबेरंगी तुकडे दाटपणे एकत्र जडवून त्यांयोगे भिंत, जमीन वा छत यांचे पृष्ठभाग सजविण्याची कला. हे तुकडे ओले सिमेंट अथवा चुन्याचा गिलावा यांच्या पृष्ठभागावर बसवितात. कुट्टिमचित्रणाचा सर्वप्रथम वापर बहुधा, ख्रि.पू. चौथ्या-पाचव्या सहस्रकांत वास्तूच्या सजावटीसाठी मध्यपूर्वेकडील टायग्रिस व युफ्रेटीस या नद्यांच्या प्रदेशात झाला असावा. ख्रि.पू.सु. ३५०० च्या सुमाराचा कुट्टिमचित्रणाचा एक नमुना अर येथील उत्खननात आढळला आहे. त्यात लाकडावर शिंपा, लाजवर्दी, वालुकाश्म यांचे खडे बसविलेले असून त्याच्या एका बाजूस युद्धावर जाणाऱ्या सैन्याचे व दुसऱ्या बाजूस दरबारी मेजवानीचे दृश्य आहे. याच सुमारास घरगुती तसेच धार्मिक वस्तू, दागदागिने, हस्तिदंती पेट्या, फर्निचर, हार्पसारखी वाद्ये इत्यादींच्या सजावटीत कुट्टिमाचा वापर होऊ लागला. ग्रीकांश काळात ग्रीकांनी व रोमनांनी संगमरवराचे छोटे घनाकार वा चौरस तुकडे (टेस्सेरा) वापरून कुट्टिमतंत्र विकसित केले. उदा. द बॅटल ऑफ इसस (पाँपेई ख्रि.पू. चौथे शतक) यातील शैली इतकी चित्रमय आहे, की अशी कुट्टिमकला चित्रकलेचे अनुकरण करीत होती, हे निःसंशयपणे जाणवते. या काळात जमिनीवरील कुट्टिमचित्रण विशेषत्वाने होत असे. तसेच ते नैसर्गिक संगमरवरी तुकड्यांचे असल्याने त्यात रंगवैपुल्य असले, तरी चकाकी नसे. प्रारंभीच्या ख्रिस्ती कलेत मात्र भिंतींच्या सजावटीत कुट्टिमाचा वापर अधिकाधिक होऊ लागला व माध्यमात रंगीत काच-तुकड्यांचा वापर होऊ लागल्याने त्यास आपोआपच रंगवैविध्य व चकाकी प्राप्त झाली. प्रारंभीच्या ख्रिस्ती काळातील भूमिगत थडग्यांच्या भिंतींवरील कुट्टिम-सजावटीचे अनेकविध नमुने रोममध्ये उपलब्ध आहेत. बायझंटिन कालखंडात कुट्टिमचित्रणाचा अत्युच्च विकास घडून आला. चर्चवास्तूंच्या कुट्टिम-सजावटीचे नमुने साधारणत: चौथ्या शतकापासून आढळतात. विशेषत: रोम,राव्हेन्ना, कॉन्स्टॅंटिनोपल (आधुनिक इस्तंबूल), व्हेनिस, सिसिली, ग्रीसमधील डॅफनी व सेंट ल्यूक या ठिकाणी उत्कृष्ट कुट्टिमचित्रे आढळतात. सान कोस्टांझा, रोम या चर्चमधील द्राक्षासवनिर्मितीची कुट्टिमदृश्ये, विशेषतः द्राक्षवेलींचे भौमितिक रेखन व द्राक्षे गोळा करणाऱ्यांचे प्रतिमारेखन, उल्लेखनीय आहे. गाला प्लासिडीआ, राव्हेन्ना येथील द गुड शेफर्ड (पाचवे शतक) या चित्रात अर्धवर्तुळाकार जागेत ख्रिस्ताचे प्रतीकरूप मेंढपाळ आणि मेंढ्यांचा कळप दर्शविला आहे. राव्हेन्नामधीलच सान व्हायतल चर्चमधील एम्प्रेस थिओडोरा अँड अटेंडंट्‌स (सु. ५४७)आणि सान आपोलिनेर नूव्हो येथील फिमेल सेंट्‌स अँड द मॅगी (सु. ५६८) ही चित्रे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. बायझंटिन शैलीचा आणि त्यातील सोनेरी चकाकीच्या पार्श्वभूमीचा प्रभाव कॉन्स्टॅंटिनोपलच्या कुट्टिम कलेवर दीर्घकाळ होता. व्हेनिस येथील सेंट मार्कच्या चर्चमधील कुट्टिमचित्रांवर पौर्वात्य छाप जाणवते. इटलीत भित्तिचित्रांमुळे कुट्टिमचित्रण निष्प्रभ ठरले. तथापि यूरोपातील चर्च-वास्तूंच्या सजावटीत कुट्टिमकलेस कॉन्स्टॅंटिनोपालचा पाडाव होईपर्यंत (१४५३) प्रमुख स्थान होते. अकराव्या-बाराव्या शतकांतील कुट्टिमचित्रात सिसिलीमधील मॉन्‍रेआले येथील ख्रास्ट इन मॅजेस्टी (११७४–९०) तसेच ग्रीसमधील डॅफनी येथील ख्रास्ट एंटरिंग जेरूसलेम (अकरावे शतक) ही चित्रे विशेष महत्त्वाची आहेत. मध्ययुगीन इटलीत जमिनींच्या सजावटीत कुट्टिममाध्यमांचा वापर सर्वसामान्यत: रूढ होता. विविधरंगी संगमरवरी तुकड्यांचे भौमितिक आकृतिबंध हे त्याचे वैशिष्ट्य, मुस्लिम देशांत कुट्टिमचित्रणाचा एक विशेष प्रकार रूढ होता. पर्शियातील वास्तूंचे बहिर्भाग छोट्या छोट्या चौरस फरशी-तुकड्यांच्या एकत्र जडणीतून सजविले जात. त्यात भौमितिक आकृतिबंध व विशेषतः अरबी अक्षरांसारखे आकार यांना प्राधान्य होते. भारतात कृट्टिम सजावटीचा वापर वास्तूपेक्षा शिल्पांच्या जडणीत विशेषत्वाने झाला. उदा., उदेपूर राजवाड्यातील मयूरशिल्प. यूरोपीय प्रबोधनकाळाच्या उदयानंतर यूरोपातील कुट्टिमकलेस उतरती कळा लागली. चित्रांच्या अनुकरणापुरतेच तीस स्थान उरले. मात्र एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आंतोन्यो गॉदी (१८५२–१९२६) या स्पॅनिश वास्तुशिल्पज्ञाने आपल्या इमारतींत मृत्स्ना व काच यांच्या कुट्टिम सजावटीचा नावीन्यपूर्ण व कल्पक वापर केला. उदा., बार्सेलोना येथील ग्युएल पार्क (१९००–१४).कुट्टिममाध्यमाद्वारा अतिवास्तववादी आकृतिबंध साधणे हे त्याचे वैशिष्ट्य. इंग्लंडमध्येही बऱ्यीस अनऱ्येअप (१८८३–१९६९) याच्यामुळे या कलेचे पुनरुज्जीवन झाले. भव्य प्रमाणातील वास्तुशिल्पीय कुट्टिमचित्रणाचे उदाहरण मेक्सिको येथील विद्यापीठाच्या ग्रंथालय वास्तूत (१९५३-५४) आढळते. कुट्टिममाध्यमाच्या विविध घटकांतील (उदा., पृष्ठ, रंग, आकार इ.) दृक्‌वैशिष्ट्यांचा अनेक प्रकारे आविष्कार करण्यास अद्याप पुरेपूर वाव असल्याने आजच्या कलावंतांना कुट्टिममाध्यम विशेष प्रेरक ठरू पाहत आहे कारण आंद्रे माल्‍रो या प्रसिद्ध फ्रेंच विचारवंताने आपल्या द मेटॅमॉर्फसिस ऑफ द गॉड्‌स  या ग्रंथात म्हटल्याप्रमाणे कुट्टिमकारांनी इंद्रियगोचर अवकाशकल्पनेला वेगळे वळण दिले. (चित्रपत्र ९).  

संदर्भ : 1. Anthony, E.W. A History of Mosaics, Boston, 1935. 

    2. Berry, John, Making Mosaics, London, 1966. 

इनामदार, श्री. दे.


१ 'ख्राइस्ट्स एन्ट्री इंटू जेरूसलेम', सान मार्को, व्हेनिस, १२ वे शतक. २ उदेपूर राजवाड्यातील मयूरशिल्प, भारत. ३ 'एम्प्रेस थिओडोरा अँड अटेंडंट्स' : अंशदृश्य, सान व्हायतल, राव्हेन्ना, सु. ५४७. ४ 'द गुड शेफर्ड', गाला प्लासिडीआ, राव्हेन्ना, ५ वे शतक. ५ 'ब बॅटल ऑफ इसस' : अंशदृश्य, मूळ ग्रीक चित्राची (इ.स.पू.सु. ३१५) रोमन कृट्टिम-प्रतिकृती, पांपेई, इ.स.पू.सु.५०. ६ 'ग्युएल पार्क' : अंशदृश्य, वार्सेलोना (१९०० - १४) -- आंतोन्यो गॉदी. ७ अर येथील उत्खननात सापडलेला कुट्टिमचित्रणाचा नमुना, इ. स. पू. २४५०. ८ सान कोस्टांझा, रोम येथील कुट्टिम-सजावटीचा नमुना, ४ थे शतक.