नवकालवाद : (फ्यूचरिझम). कला-साहित्य क्षेत्रातील एक आधुनिक संप्रदाय. इटलीमध्ये उदयास आलेल्या या संप्रदायाचा कालखंड १९०९ ते १९१६ हा होय. फिलीप्पो मारीनेत्ती (१८७६–१९४४) हा इटालियन कवी या संप्रदायाचा जनक मानला जातो. त्याने Le Figaro या पॅरिसच्या वृत्तपत्रात २० फेब्रुवारी १९०९ रोजी या पंथाचा पहिला जाहीरनामा प्रसिद्ध केला. भविष्यकाळाची व कलेतील नवप्रवृत्तींची निदर्शक अशी ‘फ्यूचरिझम’ ही संज्ञाही त्यानेच रूढ केली. १९१० मध्ये या पंथाच्या चित्रकारांनी आपला ‘तांत्रिक जाहीरनामा’ प्रसिद्ध केला. आधुनिक यंत्रयुगातील गतिमानतेचे आविष्कारण कलेतून साधण्याची नवकालवाद्यांची आकांक्षा होती. यंत्र हे त्यांनी आक्रमक व चैतन्ययुक्त पौरुषत्वाचे प्रतीक मानले. यंत्राचे प्रकटरूप अशा गतीमध्ये त्यांना सौंदर्य दिसले. भरधाव सुसाट वेगाने धावणारी शर्यतीची मोटार ही द विंग्ड व्हिक्टरी ऑफ सॅमोथ्रेस या प्राचीन ग्रीक अभिजात शिल्पाकृतीपेक्षा अधिक सौंदर्यपूर्ण असल्याचा दावा त्यांनी केला. या पंथाच्या प्रणालीत मूर्तिभंजनाचाही एक पवित्रा होता. गतकाळ व गतकालीन सर्व कलापरंपरा त्यांनी ठामपणे नाकारली. गतकालीन सांस्कृतिक संचित जतन करून ठेवणारी संग्रहालये, ग्रंथालये, अकादम्या नष्ट करून टाकाव्यात, असे त्यांचे प्रतिपादन होते. युद्धासारख्या हिंसक व प्रक्षोभक घटनांचा त्यांनी गौरव केला. या दृष्टिने त्यांचे नाते राजकीय क्षेत्रातील ‘फॅसिझम’शी जुळते. नवकालवादी संप्रदायातील चित्रकार विसाव्या शतकातील यांत्रिक जीवनाची गतिमानता आपल्या चित्रांतून व्यक्त करू पाहत होते व ते साधण्यासाठी त्यांनी गतिमान स्वयंचलित वाहने, रेल्वेगाड्या, शर्यतीतील सायकलस्वार, गतिमान अवस्थेतील नर्तक वा कुत्रे, घोडे यांसारखे प्राणी इ. प्रतिमांचा अवलंब केला. प्रत्यक्ष चित्रणात त्यांनी आकारिक विश्लेषण साधणारी घनवादी शैली अनुसरली. नवकालवादी चित्रामध्ये सामान्यतः एखाद्या वस्तूचे तिच्या हालचालींचा क्रम दर्शविणाऱ्या निरनिराळ्या गतिसूचक अवस्थांमध्ये विश्लेषण करून त्या सर्व अवस्था एकाच वेळी एकाच चित्रातून दर्शविल्या जातात. एखाद्या यंत्राचे चित्रण परस्परांत गुंतलेल्या चक्रांची मालिका दर्शवून केले जाते. कित्येकदा परस्परव्याप्त, एकात्म आणि गतिक्रमसूचक केवल आकारांच्या एकत्र जुळणीतूनही गतीचा आभास निर्माण केला जातो वा एखाद्या प्रतिमेच्या एकाच हालचालीची अनेकवार पुनरावृत्ती करूनही गती भासमान केली जाते.

‘स्टेट्स ऑफ माइंड, फर्स्ट् : द फेअरवेल्स’ (१९११)-ऊंबेर्तो बोत्‌चोनी.

नवकालवादी चित्राच्या रंगसंयोजनामध्ये कित्येकदा लखलखीत रंगांचा व बिंदुवादी चित्रणतंत्राचा वापर केल्याचे दिसून येते. ऊंबेर्तो बोत्‌चोनी (१८८२–१९१६), जीनो सेव्हेरीनी (१८८३–१९६६). कार्लो कारा (१८८१–   ) लूईजी रस्सेलो (१८८५–१९४७), जाकोमो बाल्ला (१८७१–१९५८) हे या पंथाचे प्रमुख चित्रकार होत. मार्सेल द्यूशाँने या पंथाच्या तत्त्वप्रणालीचा कौशल्यपूर्ण अवलंब करून काही उत्कृष्ट चित्रे निर्माण केली. बोत्‌चोनीने डेव्हलपमेंट ऑफ अ बॉट्ल इन स्पेस (१९१२) व यूनिक फॉर्म्स ऑफ कंटिन्यूइटी इन स्पेस (१९१३ पहा : मराठी विश्वकोश : खंड २ चित्रपत्र ९) यांसारखी उत्कृष्ट नवकालवादी शिल्पे घडवली. सान्त एलिआ (१८८८-१९१६) या वास्तुशिल्पज्ञाने भावी नगरांची काही रेखाटने केली. नवकालवादी काव्यात औद्योगिक क्षेत्रातील यंत्र-तंत्राधिष्ठित प्रतिमांचा वापर केलेला असतो. तसेच ध्वन्यनुकरण साधण्यासाठी कित्येकदा शब्दांची व व्याकरणाची मोडतोड केलेली दिसून येते. मारीनेत्तीचे Zang-tumb-tuuum हे दीर्घकाव्य व सोफ्फीची याचा Bif § zft l8 हा काव्यसंग्रह हे नवकालवादी साहित्य उल्लेखनीय आहे. इटालियन पंथाच्या प्रेरणेने रशियामध्येही १९१० च्या सुमारास नवकालवादाचा उदय झाला. मल्येव्ह्यिचची काही चित्रे ख्लेब्निकॉव्ह, माय्‌कोव्हस्की, पास्तेरनाक यांच्या काही कविता ही रशियन नवकालवादाची उदाहरणे होत.

संदर्भ : Taylor, J. C. Futurism, New york, 1961.

इनामदार, श्री. दे.